मदार

काय होता निरोप वाऱ्यावर?
पान हलते अजून झाडावर...

शब्द साधा किती खुलून दिसे
अर्थ थोडा वयात आल्यावर

पाखरांचा बघा रुबाब जरा
नभ जणू तोलतात पंखावर!

टाळतो देवळात जाणे मी...
(ताण येतो उगाच आत्म्यावर)

हात अश्रूंत चिंब भिजले जे
या जगाची मदार त्यांच्यावर

(अन्यत्र प्रकाशीत)