मारुती

श्रीमारुतीरायाचा जन्म केसरीनामक महाप्रतापी वानरापासून त्याची स्त्री जी महासती अंजनी हिच्या पोटी झाला. हा वायुदेवाच्या प्रसादाने झाला म्हणून त्याला वायुपुत्र मारुती असे म्हणतात. तो महाबली आहे, बुद्धिमान आहे, रणनीती कुशल आहे, तो चिरंजीव आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तो श्रेष्ठ असा रामभक्त आहे, रामदूत आहे. तो भक्तांचे सर्व क्लेश दूर करून त्यांचे रक्षण करतो. अशा या मारुतीची रामायणातील एक कथा अशी आहे. समुद्रोल्लंघनाचा समय प्राप्त झाला तेव्हा १०० योजने समुद्राचे उड्डाण करून सीताशोध लावून कोण परत येईल असा प्रश्न निघाला असता कोणीच पुढे येईना. तेव्हा जांबुवंताला मारुतीचे स्मरण झाले व त्याने मारुतीच्या पराक्रमाचे वर्णन सुरू केले. जांबुवंताच्या या उत्साही वाणीने मारुतीला स्वपराक्रमाचे स्मरण झाले. त्याने ब्रह्मांड भेदणारा सिंहनाद केला व रामाचे नाव घेऊन उड्डाण केले असे रामायणात आहे. मारुती हा सर्वगुणसंपन्न आहे. परंतु त्याला त्याच्याजवळ असलेल्या गुणांची, शक्तिची जाणीव करून द्यावयास हवी. त्याच्याजवळ असलेली सुप्त शक्ती जागृत करावयास हवी. त्याल चेतावणी दिल्याशिवाय तो कार्यरत होत नाही.

मारुती हा शंकराचा अवतार आहे. "ध्वजस्तंभावरी वानरु । तो हा शंकरु॥" असे ज्ञानदेव म्हणतात. शंकर हा सदैव रामनाम घेत बसलेला आहे. रामरक्षा स्तोत्रात म्हटले आहे "राम रामेति रामेती रमे रामे मनोरमे । सहत्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने॥" (शिव पार्वतीस सांगतात - हे सुवदने , राम राम राम राम असा नामोच्चाराने मी मनाला आनंद देणाऱ्या श्रीरामाच्या ठिकणी रममाण होतो. श्रीरामाचे नाव हे (विष्णूच्या) सहस्रनामाची बरोबरी करणारे आहे. म्हणूनच शिवावतार मारुती हा नित्य रामनामात मग्न आहे. रामाशिवाय दुसरे काही त्याला दिसत नाही. कळत नाही). लंकाविजयानंतर जेव्हा राम सीतेसह अयोध्येत परत येतात तेव्हा मारुतीचा पराक्रम लक्षात घेऊन सीतामाई त्याला आपल्या कंठातील मौल्यवान मोत्याचा हार देऊन सत्कार करते. मारुती मात्र प्रत्येक मोती फोडून त्यात राम आहे कां असे बघत सर्व मोत्यांचा चुराडा करतो. मारुतीची ही रामभक्ती अनन्य आहे. स्वतःची छाती फाडून त्यात रामाचा वास आहे हे सर्वांना दाखवून देतो. तसेच मारुतीला स्वतःची स्तुती बिलकूल आवडत नाही. लंकेतून परतताना अंजनीच्या तपश्चर्येच्या डोंगराजवळ येऊन रामादिकांनी अंजनीला नमस्कार केला. त्यावेळी "तिच्यापाशी माझी स्तुती करू नका. " असे मारुतीने मुद्दाम सांगीतले.

मारूतीला स्वतःची स्तुती नको आहे. स्वतःचा गौरव नको आहे. रामनामातच त्याची मनापासून आवड आहे. रामाच्या ध्यानात तो सदासर्वकाळ गढून गेलेला आहे. रामाशिवाय या जगात काही नाही असा त्याचा दृढविश्वास आहे. तो कायम रामरुपी कोशात अडकलेला आहे. त्याच्याजवळ करुणा आहे. ती करूणा वाहती होऊ द्या, त्या करुणेला पूर येऊ दे. मारुतीला कळू दे की रामाचा एक भक्त आलेला आहे आणि तो रामनाम घेत आहे. जगात जिथे जिथे रामकथा सांगीतली जाते तिथे तिथे मारुती हा कोणत्या तरी रुपात श्रवणास हजर असतोच असा अनेकांचा समज आहे. समर्थ रामदासस्वामी हे रामकथेचे निरुपण करत असताना तिथे मारुती हा एक वृद्ध व्यक्तिच्या रुपात श्रवणास येत असे असा दाखला आहे. तेव्हा रामनामाचा सतत जप करा, रामाच्या नावाची गर्जना करा. ती ऐकताच मारुती सुप्तावस्थेतून जागा होईल आणि त्याची करुणादृष्टी तुमच्यावर पडली की तुमची मनोकामना निश्चित पूर्ण होईल यात शंका नाही.

_नारायण भु. भालेराव