तारेवरची कसरत

मराठी असे आमुची मायबोली असे कवी मराठीचा गौरव करतो. माझा मराठाचि बोलू कौतुके । अमृतातेही पैजा जिंके । ऐसी अक्षरे रसिके मेळवीन ॥ असे ज्ञानदेव अभिमानाने म्हणतात. अशी आपली मराठी भाषा समृद्ध आहे, संपन्न आहे. मराठी भाषेत एका शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात. त्याची ही थोडीशी झलक.

प्रथम तार हा शब्द घ्या. तार हा शब्द प्रथम जेव्हा उच्चारतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येते ती तांब्याची तार, चांदीची तार किंवा इतर धातूची तार. तांब्याची तार विद्युत उपकरणात वापरतात. चांदीची तार दागिने घडविण्यात उपयोगी पडते. तसेच सोन्याची तार, मिश्रधातूची तार. हा झाला तार या शब्दाचा एक अर्थ. पूर्वीच्या काळी तातडीचा निरोप पाठविण्यासाठी टपाल खात्यामार्फत तार पाठविली जात असे. त्याला टेलेग्राम असे म्हणत. हा टेलेग्राम साधा किंवा तातडीचाही असे. हा झाला तार या शब्दाचा दुसरा अर्थ. आपण स्वयंपाकात भेंडीची भाजी करतो. ही भाजी करताना पाण्याचा वापर केला तर त्या भाजीत चिकट असा द्रवपदार्थ उत्पन्न होतो. त्याला भेंडीच्या भाजीला तार आली असे आपण म्हणतो. ही तार आलेली भेंडीची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही. हा तार या शब्दाचा तिसरा अर्थ. एखादा माणूस दारू पिऊन बरळू लागला की आपण त्यास उपहासाने तारेत बोलतोस असे म्हणतो. तारेत बोलतो म्हणजेच दारुच्या नशेत बोलतो. हा झाला चौथा अर्थ. एखाद्याने उच्च स्वरात गाणे म्हटले किंवा आवाज दिला की आपण म्हणतो , तो तार स्वरात गातो. हा झाला पाचवा अर्थ. संस्कृत भाषेत तार या शब्दाचा अर्थ आहे ओंकार किंवा प्रणव. तारं इतिप्रणवं अशी त्याची व्याख्या आहे. हा झाला सहावा अर्थ. तार या शब्दाचा क्रियापद म्हणून वापर केला की त्याचा अर्थ रक्षण कर असा होतो. देवा मला भवसागरातून तार, देव तारी त्याला कोण मारी असे वाक् प्रचार आहेत. हा आहे सातवा अर्थ. एकमेकांची मते किंवा मने जुळली की त्यांच्या तारा जुळल्या असे म्हणतात. हा आठवा अर्थ. तरभाव व तमभाव म्हणजे तारतम्य. बोलण्या चालण्यात प्रत्येकाने तारतम्य बाळगले पाहिजे. हा आहे तार शब्दाचा नववा अर्थ. अशा प्रकारे तार या शब्दाचे अनेकविध अर्थ निघतात.

तार या शब्दाचे वाक्यात अनेक उपयोग केलेले दिसतात. तार हा शब्द जोडून विविध नवीन शब्द, रचना निर्माण झाल्या. सतार हे एक तंतुवाद्य आहे. पं. रविशंकर सतारवादनात प्रख्यात आहेत. कतार हे गाव अरब देशात आहे. जरतारी वस्त्र उत्सवप्रसंगी वापरतात. भक्त सूरदास व मीराबाई एकतारीवर भजन करीत. सुधारसाला एकतारी पाक लागतो. भ्रतार म्हणजे नवरा. दातार, सत्तार, अत्तार ही उपनामे आहेत. तारे हे आडनाव प्रसिद्ध आहे. तारापूरला अणुशक्तिकेंद्र आहे. उतार असाही एक शब्दप्रयोग आहे. डोंगर उतारावर भातशेती करतात. एखाद्या रोगावर उतारा असतो. ही कुणी छेडिली तार असे एक कवी म्हणतो. तार पासून तारक म्हणजे रक्षणकर्ता. तारकमंत्र प्रसिद्ध व प्रभावी आहे. तारका म्हणजे आकाशी असलेल्या तारक किंवा तारा. सिनेतारका लोकांना आकर्षित करतात. अनेक तारांच्या समूहाला तारकापुंज म्हणतात. तार पासून तीर व तूर. तीर म्हणजे काठ. नदीचा तीर. तूर हा एक डाळीचा प्रकार. दारू पिऊन आलेल्याला तारवटलेला म्हणतात. तारांकित करणे म्हणजे विशेष उल्लेखणे. तारांकित हॉटेल्स असतात. आकाशातील तारकासमूहाला तारागंण म्हणतात. तार पाठविण्याचे यंत्र म्हणजे तारायंत्र तारीफ म्हणजे स्तुती. तारू म्हणजे बोट अथावा नाव. कसे हाकारू । शीडावीण दुबळे तारू॥ सातारा हे छत्रपतीचे गाव. तारुण्य म्हणजे यौवन. तारीख म्हणजे दिनांक. भगवान कृष्णाला तारणहार म्हणतात. कोंबड्याला तुरा असतो. तीर म्हणजे बाणसुद्धा. जसे नथीतून तीर मारणे. तराणा हा संगीतातील एक प्रकार. तारा म्हणजे नक्षत्र. ध्रुवतारा अढळ आहे. तारवरून अवतार हा शब्द आला. तो तरातरा निघून गेला असा शब्दप्रयोग आहे. तिरुपती हे देवस्थान प्रसिद्ध आहे. तिरू म्हणजे लक्ष्मी. तोरो हे एक आडनाव. तारण म्हणजे अनामत रक्कम. असा आहे तार शब्दाचा विस्तार.

अकलेचे तारे तोडी । शब्दांची छकले उडवी । घटकेची मौजभारी । आनंदा बरकत येई ॥

_नारायण भु. भालेराव