एक (हरलेली) निवडणूक

विधानसभेच्या निवडणुका संपल्या. पक्ष, अपक्ष, बंडखोर, स्वाभिमान, जात, भाषा, अहंकार, स्वार्थ या सगळ्या आघाडीवर लढलेल्या या युद्धाचा पूर्ण विराम नुकताच झाला. सामान्यपणे निवडणुकांचे निकाल लागल्यावर हर्ष अथवा दुःख या बाजूला कलणारे मराठी मन यावेळेस फक्त भकास झाले. नाशकातल्या किंवा  त्र्यंबकेश्वरातल्या एखाद्या पडक्या वाड्या कडे पाहताना होते तसे, निव्वळ भकास.

आज सतरा-अठरा वर्ष झाली आमची पिढी मतदान करते याला. आम्ही सगळी मित्र-मंडळी तशा भगव्या पठडीतील, किंचिताशी उजव्या विचारसरणी कडे झुकणारी. याला कारण म्हणजे बहुदा आम्हाला मिळालेला निवडणुकीचा अधिकार आणि भगव्या  लाटेचा उगम सारख्याच काळातला. वाजपेयी, (उमेदीतले) अडवणी, साध्वी ऋतंभरा, आचार्य धर्मेंद्र या सगळ्या महान आत्म्याच्या विचारांनी भारावून जाण्याचे आणि हिंदुत्व-वादी असल्याचा अभिमान असल्याचे ते सुरवातीचे दिवस. हिंदुत्वाचा झेंडा मिरवणाऱ्या पक्षांच्या हजारोंच्या सभेतले एक श्रोते आम्ही. सभांच्या शेवटी मुठी वळून  "गर्व सें कहो हिंदू है"  अशी आरोळी देताना तेजाळलेले वैगरे वाटण्याचे ते दिवस.

हळूऱ्हळू भगव्या प्रेमा बरोबर भुमिपुत्र आणि मराठी अस्मिता हे मुद्दे सुद्धा मनाला भावू लागले. याला कारण म्हणजे मोठे साहेब. खांद्या वरती लपेटलेली भगवी शाल आणि एक हात कमरेवर रोवून लाखोंच्या सभेला हसवणारी, डोलवणारी, चेतवणारी आणि कायम शाल-जोडीतली  हाणणारी ठाकरी-वाणी लाखो सैनिकान सारखी आम्हाला अति-प्रिय होत गेली. मराठी भूमी पुत्राची आणि भगव्या हिंदुत्वाची सांगड घालत सेनेच्या चाललेल्या राजकारणाला आम्ही नेहमी मतांची साथ देत गेलो. निवडणुका मागे निवडणुका होत गेल्या. जय-पराजय होत गेले  पण आमची निष्ठा  कायम राहिली, किंबहुना  वाढतच गेली. वर्षानू-वर्ष  भक्ती भावाने मतदानाला जाताना मनात कधी गोंधळ झाला नाही.   चिन्हांच्या प्रचंड भाऊ गर्दीत आपले चिन्ह शोधताना फारसा विचार कधीच करवा  लागला नाही.   कधी किंचित दुसरा विचार करावासा वाटला तरी पर्याय न्हवता आणि मुख्य म्हणजे इच्छा पण न्हवती...
 
पण काळ पुढे सरकत गेला.  सूत्रे पुढच्या पिढीच्या हाती गेली. दुहीचे आणि भाऊबंदकीचे बीज मुंबईच्या रस्त्यावर फोफावत गेले. अनेक चुका होत गेल्या. प्रत्येक फुटी बरोबर मराठी मन हळहळत गेले, भरोसा उडत गेला. आणि कालच्या निवडणुकीत आम्हाला नवा पर्याय सापडल्या सारखा वाटला . साहेबांवर निष्ठा असणाऱ्या आमच्या सारख्या अनेकांनी, साहेबां सारख्याच भासणाऱ्या  नव्या पर्यायाला संधी देण्याचा विचार केला. साहेबांची माफी मागत अनेक निष्ठावान हातांनी पहिल्यांदाच एका नव्या चिन्हाला आपलेसे केले. अर्थात चूक बरोबर काळच ठरवेल, पण एका नव्या अध्यायाची सुरवात झाली.

वाजत-गाजत निकाल जाहीर झाले. या वेळेला निकालांचा मूड काही वेगळाच होता. पहिल्यांदाच सेना-भवनच्या भगव्या अंगणात नवा झेंडा नाचत होता, अनेक मराठी बाले-किल्ले ढासळले, बहुतेकांना तडे गेले. दोन मराठ्यांच्या भांडणात नेहमी सारखा तिसरा इतर भाषीय काठावरून विजयी हसत गेला. मराठी माणसाने खंजीर खोपासल्याचे हंबरडे फुटत होते. विश्वासघात केल्याचे रडगाणे अनेकजण गात होते. पण ही परिवर्तनाची नांदी होती? अर्थात याचे उत्तर काळच देणार. तो पर्यंत मराठी माणूस असाच दोन्ही दरडीवर अस्थिर उभा राहून अस्तित्वाची लढाई लढत राहणार, नवी पायवाट सापडे पर्यंत. या अवघड प्रवासात  मनात एकाच प्रार्थना असेल, महाराजान पासून चालत आलेल्या आणि मराठी हित  रसातळाला नेणाऱ्या भाऊबंदकीच्या अप्रिय इतिहासाची पुनरावृत्ती न होऊ देण्याची . अन्यथा या वेळेस क्षीण मराठी अस्तित्व पूर्णविरघळून जाईल, अथवा कदाचित उरेल फक्त भांडी-घासण्या पुरते... मुंबई पासून गडचिरोली पर्यंत.