सांगड

विश्वामध्ये सर्वात जिज्ञासू प्राणी जर कोण असेल तर तो मानव! त्याच्या जिज्ञासेतून विज्ञान जन्माला आले. 'विज्ञान' म्हणजे एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान! विज्ञान म्हणजे शोध, नूतनता! आजचं विज्ञान हे प्रगतीचं शिखर सर करतोय. दशावतारातील वामनानं जसं तीन पाउलात सारं त्रिभुवन व्यापलं, तसंच 'विज्ञान' या तीन अक्षरांनी सारं भौतिक विश्व व्यापून टाकलंय. आपल्या बुद्धीच्या बळावर माणसाने विज्ञानाची निर्मिती केली आणि आपल्या सुखासाठी त्याला यथेच्छ राबविले व राबावीत आहे. आज मात्र अशी स्थिती झालीय की, ज्या मानवाने विज्ञानाची निर्मिती केली तोच या विज्ञानाच्या हातातलं नकळतपणे एक बाहुलं बनलाय. त्याने निर्माण केलेल्या साधनांच्या उपभोगात तो मग्न झालाय. नुसता मग्नच नाही तर त्याच्या अधीन झालाय. अन जेथे अधीनता, परस्वाधीनता तेथे अस्थैर्य, अशांतता व बैचैनीचा उगम! आज माणसाच्या मनाला स्थैर्य राहिलं नसल्याचे चित्र आपल्यापुढे दिसतंय. विज्ञानाची ज्या वेगानं प्रगती होतेय त्याच वेगानं हिंसा, अनिती व अशांतता फोफावत असल्याचं आपण पाहतोय. अन हाच समाज व राष्ट्रहिताच्या काळजीचा व चिंतनाचा एक विषय बनतोय.

या साऱ्यांचं महत्त्वाचं कारण म्हणजे विज्ञान युगात धर्माचं अधिष्ठान किंवा धर्माचा अंकुश राहिलेला नाही. माणूस भरकटत चाललाय. मानवाच्या सफल आणि कल्याणकारी जीवनामध्ये धर्माचा वाटा फार मोठा आहे. तसं पाहता धर्माचा अर्थ एका वाक्यात नमूद करणं अगदी अवघड. पण सरळ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर धर्म म्हणजे संस्कार, सदाचार, विवेक! ही सारी धर्माचीच अंगे आहेत. सदविवेक ही धर्माची परिणिती आहे. धर्मामुळे माणूस विवेकसंपन्न होऊन त्याद्वारे त्याच्याकडून सत्कार्य घडत असते. उदाहरण पाहायचं झालं तर शास्त्रज्ञांनी अणूचा शोध लावला. विज्ञान जगतातला फार मोठा व महत्त्वाचा शोध! या शोधामुळे Atomic Energy म्हणजेच अणू-विद्युतशक्ती प्रचंड प्रमाणात निर्माण होते व तिचा वापर औद्योगिक उत्पादन, शेती उत्पादन, रेल्वे, घरी लाइट व इतर विद्युत उपकरणांसाठी होत असलेला आपण पाहतोय व त्याचा उपभोगपण घेतोय.

पण याच अणूच्या संशोधनाने प्रचंड अशी विनाशकारक शक्तीसुद्धा निर्माण होते ज्याला आपण Atom bomb म्हणतो व जो मानवी संहारास कारणीभूत होऊ शकतो. जपानची हिरोशिमा-नागासाकी ही बॉम्बच्या साहाय्याने उध्वस्त झालेली शहरे आपल्यासमोरची जिवंत उदाहरणे आहेत. आजही अनेक देश याच भीतीखाली वावरताना दिसत आहेत.

या वरून आपण असं पाहतो की, विज्ञान निर्मितीचा प्रस्तुत उदाहरणाप्रमाणे दोन प्रकारे वापर होऊ शकतो. एक मानवसंहारक ऍटमबॉम्ब तर दुसरी मानवकल्याणकारक ऊर्जानिर्मीती. जर सदविवेकाची साथ असेल तर आपला कल ऊर्जा निर्मितीकडे म्हणजेच पर्यायाने मानव कल्याणाकडे जाईल पण या विज्ञाननिर्मितीला जर असंस्कृत, शोषणयुक्त अशा कुविचारांची साथ असेल तर मानव संहारक बॉम्बकडेच वळेल; प्रसंगी किंचितशा चुकीमुळे, अविवेकामुळे, इतरांबरोबर आपलाही घात होऊन आपली स्थिती सुवर्णप्रिय मिडास राजासारखी होईल.

मिडास नावाच्या राजाला सोनं फार आवडायचं. आपण जिथं हात लावू त्याचं सोनं व्हावं असं त्याला मनापासून वाटायचं. त्यासाठी तपश्चर्या करून त्यांनी देवाला प्रसन्न करून घेतलं. देव म्हणाला, "वत्सा, बोल तुला काय हवंय?" राजा म्हणाला,  "देवा, मी हात लावेल त्याचं सोनं व्हायला हवंय."  देव शांतपणे म्हणाला, "राजन्, पूर्णपणे विचार करून हा वर माग." राजा अधीर होऊन म्हणाला,  "देवा मी पूर्ण विचाराअंतीच हा वर मागतोय." राजाचा हट्ट पाहून देव 'तथास्तु' म्हणून अंतर्धान पावला. राजा आनंदाने बेभान होऊन ज्याला त्याला हात लावीत सुटला. हात लागेल ते सोन्याचं होत होतं. महालात जाऊन राजकन्येला हे सारं दाखवावं म्हणून हात धरला तर ती सोन्याचा पुतळा बनली. जेवणाच्यावेळी अन्नाचा घास उचलला त्याचे सोने झाले. जगणेच कठीण झाले. शेवटी पश्चातापदग्ध व लोभी राजाचा दुःखातच अंत झाला - ऐहिक उपभोगासाठी धडपड करताना व त्याचा आस्वाद घेताना संस्कार, विवेकाचं भान नसेल तर ते नाशाचे कारण होऊ शकेल व जीवन सुखमय होण्याऐवजी क्लेशकारकच होईल याची जाणीव आज माणसाला होणे आवश्यक आहे.

विज्ञान हे निश्चितच मानवाला सुख-समृद्धीकडे नेण्याचं साधन आहे, पण त्याचा उपयोग मात्र धर्म-संस्कार प्रणीत 'विवेकानं' करणं आवश्यक आहे. विज्ञान हे मानवाची ऐहिक प्रगती करतं तर धर्म मानसिक क्रांती घडवितं. थोडक्यात धर्माशिवाय ज्ञान म्हणजे मुठीवाचून तलवार, जी प्रसंगी आपलाच हात कापते तर विज्ञानावाचून धर्म म्हणजे पुढे तलवारीचं पातं नसलेली नुसती मूठ!  पात्याशिवाय लढणार कसे? मग अज्ञानाचं व अंधश्रद्धेचं खूळ फोफावू लागेल. यशस्वी जीवनाच्या रणांगणावर 'विज्ञान व धर्म' यापैकी एकाशिवाय दुसरं निरुपयोगीच ठरेल.

तेव्हा २१ व्या शतकाचे स्वागत करताना भगवान महावीर, संत ज्ञानेश्वर व राष्ट्रपुरुष विवेकानंद यांना अभिप्रेत असलेली विश्वशांती व राष्ट्रउभारणी केवळ 'धर्म व विज्ञान' यांची सांगड घालूनच होऊ शकेल याची जाणीव ठेवून वाटचाल करणं हिताचं होईल, नव्हे ती आजची गरज आहे.

===========

---- सौ. माधुरी शहा, सोलापूर.

===========

हा लेख माझ्या आईने काही वर्षांपूर्वी सोलापूरच्या स्थानिक दैनिकासाठी लिहिला होता. तो येथे प्रसिद्ध करीत आहे. हाच लेख दुवा १ या ठिकाणी सुद्धा उपलब्ध आहे.