दगडधोंडे

जगाच्या आरंभी आदिमानवाने एक दगड डोंगर उतारावरून घरंगळत खाली येताना पाहिला. त्याला जिज्ञासा निर्माण झाली आणि या जिज्ञासेतूनच शास्त्रज्ञ निर्माण होऊन चाकाची म्हणजेच चक्राची उत्पत्ति झाली. त्यानंतर यंत्राची आणि औद्योगिक प्रगतीची सुरवात झाली. सर्व औद्योगिक क्रांतीचा जनक असा हा दगड सर्वश्रेष्ठ आहे.

मोठा दगड म्हणजे धोंडा. दगडधोंडे या सामासिक शब्दात दोन शब्दांचा समावेश आहे. दगड आणि धोंडा. दगडधोंडे असलेला प्रदेश म्हणजेच डोंगराळ प्रदेश-खडकाळ प्रदेश.  सपाट प्रदेशात दगडधोंड्याचे प्रमाण कमी असते. महाराष्ट्रातल्या सह्याद्रिच्या परिसरात दगडधोंडे विपुल प्रमाणात दिसून येतात. रस्ता करताना दगडधोंडे बाजूला करावे लागतात. डोंगराळ प्रदेशात आणि विशेषतः घाटात, कडीकपारीत दगडधोंडे दिसतात. घाटात पावासाळ्यात डोंगराच्या उतरणीवर दगडधोंडे खाली पडतात आणि रहदारीस अडथळा निर्माण होतो.

दगडामध्ये वेगवेगळे प्रकार दिसून येतात. ठिसूळ दगडातून मुरुम तयार होतो. काळा कुळकुळीत दगड इमारतीच्या बांघकामात तसेच विविघ मूर्ती बनविण्यात उपयोगी पडतो. पांढरा शुभ्र दगड म्हणजे स्फटिकाचा दगड. याचा उपयोग मूर्ती व कोरीव कामात होतो. ताजमहाल संगमरवरी दगडापासून निर्माण झाला. विविध प्रकारचे रंगीबेरंगी दगड सापडतात. कुरुंदाच्या दगडापासून जाते तयार होते. पूर्वीच्या काळी जात्यावर दळण दळीत. राजस्थानात लाल रंगाचा दगड मिळतो. हा दगड इमारतीच्या बांधकामाला उपयोगी पडतो. मौल्यवान दगडात माणिक, पाचू, पुष्कराज , हिरा, नीलमणी यांचा समावेश होतो. या खड्यांचा ग्रहताऱ्याशी संबंध जोडून ज्योतिषशात्रात गूढता निर्माण झाली. हे मौल्यवान खडे म्हणजेच रत्ने खाणीत सापडतात. मौल्यवान रत्नांची किंमत फार मोठी असते. कोहीनूर हिरा प्रसिद्ध आहे. खाणीत सापडलेल्या हिऱ्याच्या खड्याला पैलू पाडतात तेव्हा त्याची शोभा आणि किंमतही वाढते. दगडांचे विविध प्रकार जमविण्याचा काहीजणांना छंद असतो. दगडधोंडे पायाखाली तुडविले जातात तर मौल्यवान दगड म्हणजेच हिरा हा मुकुटात विराजमान होऊन मस्तकावर शोभून दिसतो. काही दगड शिलालेखाच्या रुपात अवतीर्ण होऊन प्रतिष्ठा मिळवून जातात. माणूस हा सुद्धा एक दगडच. त्याल पैलू पाडल्यावर तो चमकतो आणि विविध गुणांनी प्रतिष्ठित होतो.

दगडाचे एक शात्र आहे. त्याला जिऑलॉजी असे म्हणतात. त्या शास्त्रानुसार ज्वालामुखीच्या लाव्हारसापासून खडकांची उत्पत्ती झाली. लहानमुलांची शाळेतील पाटीपेन्सिल आणि शहाबादी फरशी हे दगडाचे प्रकार.

ग्रामीणभागात दगडू, धोंडू अशी मुलांची नावे ठेऊन दगडाला खरोखर प्रतिष्टाच प्राप्त करून दिलेली दिसते. दगडू व धोंडू हे मोठेपणी दगडोजी आणि धोंडोपंत होतात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांचे नाव विलासराव दगडोजी देशमुख असे आहे. धोंडूबाई कुलकर्णी या विख्यात गायिका आहेत. धोंडूमामा साठे व धोंडो केशव कर्वे प्रसिद्ध होते. कर्तबगारीमुळे दगडूचा दगडूशेट बनतो आणि देवाच्या अगदी सन्निध जाऊन भक्तगणांच्या गळी उतरतो. दगडूशेट गणपती सर्वत्र प्रसिद्ध होऊन सर्वतोमुखी झाला.

अमेरिकेने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. तेथून आणलेला एक दगड "नासा" च्या अवकाशकेंद्रात विद्यमान आहे. अश्म म्हणजे दगड असे संस्कृतात आहे. अश्मा म्हणजे दगडाचा खडा. यामध्ये मृतात्म्याचे अस्तित्व असते असा समज आहे. दगडफेक करून मालमत्तेचे नुकसान करता येते तसेच एखाद्याच्या डोक्यात धोंडा घालून त्याच घातही होतो. गलोलीने दगड मारून अचूक वेध साधता येतो. दगडाला ना चव ना ढव! पण मसाल्यात चवीसाठी दगडफूल नावाची वस्तू वापरली जाते. दगडाचा आणि फुलाचा काही संबंध आहे कां? एक कोमल आणि एक कठीण ! धोंड्याला मोठेपणाचा मान आपोआप चालून आला. धोंड्याचा महिना म्हणजे कालगणनेत आधिक महिना पवित्र मानतात. प्रवासात मैलाचा दगड हा आपल्याला किती अंतर कापले याची जाणीव करून देतो आणि भानावर आणतो. शेतातील बांधावर असणारा खुणेचा दगड सीमेचे उल्लंघन होऊ न देण्याची खबरदारी घेतो. कर्तव्याची जाणीव करून देणारा हा दगड आहे. इतिहासाची त्याला खडान् खडा माहिती आहे म्हणजे बारिकसारीक गोष्टी माहित आहेत. त्याने खडा टाकून पाहिला म्हणजे त्याने अंदाज घेतला.

इमारतीच्या पायापासून ते देवादिकांच्या मूर्तीपर्यंत दगडाचा मुक्तसंचार आहे. वानरसेनेने रामनाम घेऊन समुद्रात दगड सोडले. ते तरंगले व सेतू तयार झाला असे रामायणात आहे तेव्हापासून दगड हा तारक ठरला. गिरनार पर्वतावर दत्तगुरुंच्या अश्मपादुका म्हणजे दगडातील पादुका आहेत. पंढरपुरात पांडुरंगाची मुर्ती व नामदेवाची पायरी ही भाविकांची श्रद्धास्थाने. दोन्हीही दगडाच्याच. भाविक तेथे नतमस्तक होतात.

_नारायण भु. भालेराव