मौन

मौन म्हणजे न बोलणे. काहीजण मौन हे व्रत म्हणून अंगिकारतात. मौनामध्ये मनोनिग्रह दिसून येतो, मनःसंयम प्रत्ययास येतो. मनःशक्तिची वाढ होते आणि मानसिक ताणतणाव नाहिसा होतो. मौन हे एक व्रत आहे. वाणीला विवेकाचा स्पर्श घडावा म्हणून विचारपूर्वक वैखरीला दिलेला तो अल्पकालीन विराम असतो. हटातटाने ओठ घट्ट मिटून मनातून पोसला जाणारा तो अहंभाव नसतो. आत्मपरीक्षणासाठी, मननचिंतनासाठी आपण आपल्याच अंतर्यामी निर्माण केलेले ते अवकाश असते. आपल्या बोलण्याला बोलता बोलता मलिनता येण्याची शक्यता फार असते.

महात्मा गांधी आठवड्यातून किमान एक दिवस मौन धारण करीत. अनेक मुनी व योगसाधक सूर्यास्तानंतर बोलत नाहीत, संत मेहेरबाबा जन्मभर बोललेच नाहीत. सतत संपर्कामुळे मनाला येणारी व्यग्रता कमी व्हावी यासाठी केलेली शब्दांची काटकसर म्हणजे मौन. मौनामुळे मनाला अंतर्मुखता प्राप्त होते. एखाद्या विषयाचे सलगपणे चिंतन करता येते. पूर्वी घेतलेले निर्णय , केलेली विधाने , आलेले संबंध यांची आलोचना करता येते. नवे काही मनाशी योजता येते. मननचिंतनासाठी आवश्यक ती स्वस्थता लाभते. जनसंपर्काला थोडा विसर पडतो. मौनाचा काळ हा काही तासापासून काही दिवसापर्यंत असू शकतो. हा काळ नियमित राहिला तर मनाला विधायक वळण लागते.

संशोधक , तत्त्वचिंतक अभ्यासक हे अभावितपणे मौनाचे पालन करतात. पण मौनाचे खरे रहस्य हे की आपली नित्य दिनचर्या काही काळ खंडित होते. आपल्या वर्तनप्रवाहाची गती कमी होते. मनाला एक प्रकारची अलिप्तता, तटस्थता, निर्लेपता प्राप्त होते. एक संपन्न साक्षित्व आतून अवतीर्ण होते.

महायोगी श्री अरविंद सलग चाळीस वर्षे आपल्या विचारगुंफेत मौनावस्थेत राहिले. पण याच काळात हजारो पृष्ठांचे साहित्य त्यांच्या लेखणीतून प्रकटले. त्यांनी बोलणे सोडले तरी अभ्यासकांना पत्राद्वारे मार्गदर्शन केले. त्यांना येणाऱ्या अनुभूतीचे रक्षण घडले ते मौनामुळे.

मौन म्हणजे काया-वाचा-मनाने शांत राहणे. ओम शांती हा मंत्र ही मौनाची प्रस्तावना असते. मौन हीच मनःशांती असते. आजकालच्या गर्दीची व वेगवान जीवनाची अनावरता कमी करण्यासाठी एखादा भोंगा वाजवून मौनाची सूचना द्यावयास हरकत नाही.

मौनात योगसाधनेतील 'प्रत्याहार' ही प्रक्रिया सहज घडून जाते. त्यानंतर विचारसमधी लागल्याशिवाय कशी राहील ?

'तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाची वाद आपणासी ।'  मौनातच असा संवाद घडू शकतो. चाळ खूप आवाज करतात म्हणून त्यांना पायांचा आश्रय घ्यावा लागतो. मुकुट मौन धारण करतो म्हणून त्याला मस्तकावर धारण केले जाते.

_('वेध वामनाचा' पृष्ठ ४४५-४४६ या लेखकाच्या (नारायण भु. भालेराव) पुस्तकावरून संग्रहित)