परत न मिळालेले अंक

काही वर्षांपूर्वी मी एका मासिकात मुद्रितशोधक या नात्याने काम करीत होतो.

मासिक नवीनच होते. संपादकांना मासिकाच्या जाहिरातीसाठी एखाद्या जाहिरात कंपनीची गरज होती. माझ्या नात्यात एकाची प्रसिध्द जाहिरात कंपनी होती. अजूनही आहे. मी संपादकांना तिच्याशी संपर्क साधायला सांगितला. संपादक त्या कंपनीत गेले, मासिकाची माहिती सांगितली, तेथील विपणन अधिकारी मुलीने पाच अंक पाहायला म्हणून ठेवून घेतले आणि 'नंतर चर्चा करु' अशा आशयाचे बोलणे झाले.
कंपनीला मराठी मासिकात बहुधा लाभ दिसला नाही आणि म्हणून तिने काही प्रतिसाद दिला नाही.
संपादकांना याचा अंदाज होताच. प्रतिसाद न आल्याला त्यांची काही हरकत नव्हती. त्यांनी कंपनीला पाहायला म्हणून ठेवून घेतलेले अंक परत द्या, अशी विनंती केली. अधिकारी मुलीने 'अंक नाहीत' असे सांगितले.
संपादकांनी मला त्या नातेवाईकाशी संपर्क साधून अंक परत द्यायला सांगा, अशी विनंती केली. मी त्याला दूरध्वनी केला व त्या अंकांबद्दल विचारणा केली. त्याने दिलेल्या उत्तराचा आशय असाः
संपादकांना सांग, ते अंक परत बिरत मिळत नसतात. आम्ही अशा अनेक गोष्टी पाहायला म्हणून घेतो. अंकही तसे जुनेच होते. आम्ही ते चोरलेले नाहीत. गेले असतील कुठेतरी रद्दीत. एवढ्या बारक्या गोष्टींचा विचार हल्ली कोणीही करीत नाही.
संपादकांच्या कानावर मी ही गोष्ट घातली. उद्विग्न होऊन त्यांनी काढलेल्या उद्गारांचा आशय असा होताः 
मी मासिक काढण्यासाठी जिवाचे रान केलेले आहे. एका अंकाची किंमत तीस रुपये होती. पाच अंकांचे दीडशे रुपये होतात. मी जुनेच अंक पाहायला दिले होते, त्यामुळे माझे जबरदस्त नुकसान झाले आहे अशातला भाग नाही पण माझ्यासाठी अंक परत मिळणं, ही महत्त्वाची गोष्ट होती. निव्वळ महत्त्वाची गोष्ट नाही तर घेतलेले अंक परत देणे हे त्या कंपनीचेही कर्तव्य होते.  
   
घटना एकच. दोन भिन्न स्तरांवरील व्यक्तींचे दोन दृष्टिकोन.
कोट्यवधींचे व्यवहार करणाऱ्या कंपनीसाठी जुने अंक म्हणजे दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट होती.
बऱ्यापैकी पैसे राखून असणाऱ्या पण कंपनीपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या संपादकांच्या दृष्टीने अंकांना मोल होते.
काय वाटते?
प्रत्येक मोठी कंपनी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करते?