मुंबई सर्वांचीच, तर कमावून झाल्यावर मुंबई सोडून का जातात?

मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी. देशाच्या निरनिराळ्या कोपऱ्यांतून लोकांचे लोंढेच्या लोंढे इथे नशीब आजमावण्यासाठी येतच असतात. "मुंबईचा गुणच असा की इथे कुणी उपाशी राहत नाही. काही ना काही काम मिळून जातं." हेच तत्त्व मनाशी बाळगून ’तो’ही मुंबईत येऊन थडकतो. आधीच गावाहून मुंबईला आलेल्या मित्राकडे काही दिवस काढतो. मग नोकरीच्या जाहिरात पाहता पाहता त्याला एक चांगल्या नोकरीची जाहीरात दिसते. त्याला कौतुक वाटतं, "हिंदी वर्तमानपत्रात महाराष्ट्रातल्या नोकरीची जाहीरात! "

त्याचं नशीब असं की पडेल ते काम करायची तयारी असल्याने नोकरी त्यालाच मिळते. त्याच्या शेजारचा मराठी मुलगा अजूनही बेकार असतो. कारण त्याच्या मराठी वर्तमानपत्रात ही जाहिरात आलेलीच नाही. काही काळाने पैसा हाता खुळखुळतो. हीच आपल्या कुटुंबाला बोलावून घेण्याची वेळ आहे, असं वाटतं. घराची शोधाशोध होते. भाड्याचं का होईना पण छानसं घर मिळतं. घरवाली, आई, वडील यांनी घर कसं भरलेलं वाटतं. त्यात एक-दोन, कधी कधी तीन-चार मुलं झाल्यावर तर घराचं गोकूळच होतं. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात आयुष्य कसं सरतं तेच कळत नाही.

मुलं मोठी होतात. मुंबईतच! कुणाला चांगल्या ऑफिसात नोकरी मिळते, कुणी शिक्षण कमी म्हणून छोटं मोठं जे काम मिळेल, त्यात पैसा कमवत असतं. पण प्रत्येकाने आपलं छान बस्तान बसवलेलं असतं मुंबईत. आईवडील ईहलोकी गेलेले असतात. मग हळूहळू वाटू लागतं, "आहे काय या मुंबईत? नुसती गर्दी, प्रदूषण, रोजच्या मारामाऱ्या! आता मुलांना त्यांचा रोजगार मिळालाय. आईवडीलांची जबाबदारी संपलीय. गावी राहून आरामात राहण्याइतकी पूँजी जमा झालीय. कधी वाटलंच मुंबईला यावंसं तर पोरं राहतातच इथे. येऊ केव्हाही!" मग घरवालीसह गावचा रस्ता धरला जातो.

गाव पण त्यांचीच वाट पाहत असतं. "मुंबईला गेला आणि कमवून आला" म्हणून गावकरी त्याच्याकडे कौतुकाने पाहतात. कधीतरी एकदा मुंबईला त्याच्याकडे पाहूणा म्हणून उतरलेले गावकरीही त्याच्या कौतुकात सामिल असतात. "फिर मुंबईमेंही क्यों नही रहते? " असं विचारल्यावर मात्र मग तो म्हणतो, "नही भाई, कमाने के लिए मुंबई ठीक है, लेकीन मुंबईसे अपना गाँव ही भला है।" गाव त्याच्या उद्गारांनी धन्य धन्य होतं.