काडी

जरासंधाच्या वधाच्या वेळेची हकीकत आहे. जरासंधाला मृत्यू नसतो कारण त्याच्या शरीराचे तुकडे झाले तरी त्याला मिळालेल्या वराने ते एकत्र येत व जरासंध पुन्हा जिवंत होत असे. त्यामुळे तो अजिंक्य असे जरासंध म्हणजे जरा नावाच्या राक्षिशीणे जोडलेला तो जरासंध. भीमसेन जरासंधास द्वंद्वाचे आव्हान देतो. दोघे समोरासमोर उभेन राहतात. श्रीकृष्ण तेथेच हजर असतो. भीमाने द्वंद्वात जरासंधात ठार मारले व त्याच्या शरीराचे तुकडे केले. ते तुकडे एकत्र येऊन जरासंध पुन्हा जिवंत झाला. असे पुन्हा पुन्हा झाले. हे पाहून श्रीकृष्णाने एक युक्ती भीमास सांगीतली, श्रीकृष्णाने एक काडी हातात घेऊन ती मोडून त्याचे दोन तुकडे केले आणि ते दोन तुकडे दोन विरुद्ध दिशेला फेकून दिले. हे पाहून भीमाला त्यातील रहस्य समजले. त्याने जरासंधाला मारून त्याच्या शरीराचे दोन तुकडे दोन विरुद्ध दिशेला फेकून दिले. ते तुकडे एकत्र येऊ शकले नाहीत आणि अशा रितीने अजिंक्य जरासंधाच वध झाला. एका साध्या काडीचा उपयोग करून श्रीकृष्णाने जरासंध वधाची युक्ती सांगीतली. अशी ही किरकोळ काडी म्हणजे काय आणि ती कशी उत्पन्न झाली?

जमिनीत बीज रुजते , बीज अंकुरते, रोप वाढते आणि त्याचा मोठा वृक्ष होतो. वृक्षाला फांद्या, पाने , फुले येतात व बहरतात. कालांतराने फुले काढली जातात. फांद्या वाळतात व त्याच्या काटक्या किंवा काड्या होतात. त्या वृक्षापासून अलग होतात व गळून जमिनीवर पडतात. हा निसर्गाचा क्रम अखंड चालू असतो. अशी आहे काडीच्या निर्मितीची कहाणी.

काडी म्हणजे काटकी. ती लहान व किरकोळ. तिला महत्त्व ते कितीसे असणार ? गरीब लोक खेड्यापाड्यात जंगलात काड्याकाटक्या गोळा करतात. त्याचा इंधन म्हणून उपयोग करतात. काडी वृक्षावर असताना फळाफुलांना धरून असते. त्यांचा सांभाळ करते. काडी वृक्षापासून अलग झाल्यावर सुद्धा आपली समर्पण वृत्ती सोडत नाही. इंधनाच्या रुपात ती उपयोगी पडते.

औदुंबर, पिंपळ आणि वटवृक्ष यांच्या काटक्यांना समिधा म्हणतात. समिधा यज्ञनारायणाला समर्पित होतात. समर्पित जीवन हाच काडीचा स्थायीभाव आहे.

तो काडीपैलवान आहे म्हणजे शरीराने किरकोल आहे. त्याला काडीचे महत्त्व नाही म्हणजे त्याला काही किंमत नाही. त्याने काडीमोड घेतला म्हणजे घटस्फोट घेतला. त्याने कामात काडी घातली म्हणजे कामात अडथळा आणला. बुडत्याला काडीचा आधार अशी एक म्हण आहे. खेडेगावात चहापाणी, पानतंबाखू तसेच काडीबिडी असे वाक् प्रचार आहेत. काडीपेटी, आगकाडी अशाही वस्तू आहेत. काडीमात्र म्हणजे तिळमात्र. काडी लावणे म्हणजे भांडण लावणे. काडी ओढणे म्हणजे काडी पेटविणे. त्याचा माझा काडीचा संबंध नाही म्हणजे काहीही संबंध नाही.

काडीला संस्कृतात काष्ठ असेही म्हणतात. काष्ठाचा इंधन म्हणून वापर करतात. काडीचा मोठा भाऊ काठी. काठीला यष्टी असेही म्हणतात. शरीरयष्टी असा शब्दप्रयोग आहे. शुष्लकाष्ठ म्हणजे कटकट , ब्याद. काठीला दंड असेही म्हणतात. दंड याचा दुसरा अर्थ शिक्षा. दण्ड देणाऱ्याला दण्डी म्हणतात. तसेच दण्डवत म्हणजे नमस्कार. काठीप्रमाणे एकदम खाली पडणे म्हणजे दण्डवत, म्हणजेच साष्टांग नमस्कार. दण्डवते हे एक आडनाव आहे. काठीला गाठोडे बांधणे असाही वाक् प्रचार आला. काठी याचा अन्य अर्थ काठावर. इंद्रायणी काठी देवाची आळंदी !  काडीचिराईत हे एक आयुर्वेदीय औषध आहे. काडीला कांडी जवळची आहे. खडूची कांडी, जादूची कांडी वगैरे. काठी ही आधारासाठी वापरतात. जसे म्हातारपणाची काठी. यष्टी म्हणजे शरीर तसेच कुडी म्हणजे शरीर. कुडीतून प्राण गेला असे म्हटले जाते.

काडी ही अगदी क्षुल्लक वस्तू , तिचा प्रभाव तो कितीसा असणार ? कल्पना करा, पुराच्या प्रवाहात एक काडी वाहते आहे. ही काडी एका झुडुपाला चिकटून अडकून राहिली. आता पाण्याचा प्रवाह तिला वळसा घालून जात आहे . काडी ही 'काडीमात्र' चीज. तिचे वजन ते कितीसे असणार? केवढे सामर्थ्य तिच्यात आहे. प्रचंड प्रवाह तिला वळसा घालून जात आहे. काडीच्या 'चिकटून राहण्यात' हे सामर्थ्य आहे. या जीवन प्रवाहात सामान्य माणूस एका चोखंदळपणे निवडलेल्या तत्त्वाला चिकटून राहिला तर काळाचा ओघही बदलण्याची शक्यता संभवते.

_ नारायण भु. भालेराव