मराठी माणसाने खंजीर खुपसला

बाळासाहेबांनी 'मराठी माणसाने खंजीर खुपसल्याचे' सांगीतले अन वाईट वाटले.

काही दशकांपुर्वी शिवाजी मैदानावर लाखालाखाच्या सभेत गरजणारा वाघ मराठी माणसासाठीच गरजायचा.

महाराष्ट्रात एक प्रादेशिक पक्ष म्हणून तो मोठा झाला त्यांच्यामुळेच. भाजपबरोबरची युती निदान शिवसेनेकडून तरी फारशी ताणली गेली नाही.

एकदा सरकारही स्थापन करायला मिळाले. मुंबईत मराठी माणसाला वडापावच्या गाड्या काढून देण्यापासून ते अपघातात त्वरीत मदत व रक्तपुरवठा करण्यापासून ते मराठीच्या मुद्यांवर भांडण्यापर्यंत शिवसेनेने सर्व काही केले.

हे सगळे करताना करोडोंच्या भ्रष्टाचाराचे आरोप जरूर झाले. लोक हेही बोलायला लागले की उद्धवने काहीच फारसे केले नव्हते, शिवसेनेचे खरे काम केले राजने!

पण करोडोंचे आरोप झालेल्या काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी यांच्याहून शिवसेना वेगळी असेल अशी अपेक्षा धरण्यात अर्थ नाही.

राजने उद्धवपेक्षा जास्त काम केले असले तरीही पक्ष उभारला बाळासाहेबांनी!

आज ज्या मुद्यावरून राजचे गुंड आमदार विधानसभेत मारामारी करतात, त्याच मुद्यांवर शिवसेना अडून बसायची.

मग या राजसाहेबांनी पक्ष सोडला का म्हणे? आमच्या मनात नाही येत की स्वार्थासाठी सोडला असेल, कारण ते तर मराठीसाठी मारामाऱ्या करणारे लोक!

हॉस्पीटलमध्ये छगन भुजबळ भेटायला आले तेव्हा पुर्वीचे झालेले सगळे जहरी वाद आठवून बाळासाहेबांच्या डोळ्यात पाणी आले. मग भुजबळही रडले.

कित्येक दशके मराठी माणसासाठी गर्जना करणारा वाघ आता म्हातारा झाला आहे. तो भावनिक होणे साहजिक आहे.

ज्यांना आजवर शिकारी मिळवून दिल्या ते आता विचारतही नाहीत म्हंटल्यावर काय होणार?

शिवसेना कधीच निष्पाप पक्ष नव्हता, पण राजला मत देण्यात मात्र मराठी माणूस चुकला असे मलाही वाटते.

राज ठाकरे ही काही वाईट व्यक्ती नसणार, पण काहीही झाले तरी 'तेच सगळे मुद्दे असूनही' सेना सोडणे हाच खरा तर मराठी माणसाचा घात आहे.

आपले मत?