पोकळी

जी सर्व अर्थाने सार्वभौम आदिशक्ती आहे , तिने हे विश्व निर्माण केले आहे. ती लिंगभेदाच्या पलीकडे आहे. स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकी ही भाषा मानवी व्यवहारासाठी आहे. म्हणून 'तो ईश्वर' असे संबोधण्याने तो पुल्लिंगी होत नाही. त्याचप्रमाणे 'ती आदिशक्ति' म्हणण्याने ईश्वर स्त्रीलिंगी होऊ शकत नाही. म्हणून ईश्वर ही जी शक्ती ती मानवी असूच शकत नाही. ती शक्ति काय आहे, कशी असेल, हे मानवीतर्क जाणून घेण्यास तोटके पडतात. पण ती आदिशक्ती ज्या रुपाने आपल्यापुढे उभी राहते, दिसते व अनुभव येतो. त्यावरून महान विचारवंतानी त्याची दोन रुपे सांगीतली. एक रुप 'सगुण साकार' म्हणजे गुणासहित व दुसरे रुप 'निर्गुण निराकार' म्हणजे अनिर्वचनीय.

आता पोकळी , मोकळी रिकामी जागा अर्थात 'स्पेस'(space) म्हणजे काय ते समजून घेऊ. यात प्राणवायु, हायड्रोजन , कार्बनडायऑक्साईड , ओझोन , इथर, लेसरकिरण वगैरे आणखीनही काही असेल. त्याच प्रमाणे आपली काही टन वजनाची आधुनिक विमाने आकाशात उड्डाण करतात. चंद्रावर , मंगळावर याने जातात आणि ती पुन्हा तिथे स्थिर होतात. कां? जागा आहे म्हणून. या जागेला तुम्ही इतर शब्दांनी पण ओळखू शकता. जसे आकाश वगैरे. जागा आहे असे आपण म्हणतो, म्हणजे तिचे अस्तित्व मानतो. आणि हे जे आस्तित्व तीच आदिशक्ति. अस्तित्व म्हणजे ईश्वर , हे जगमान्य व सर्वमान्य तत्त्व मानले गेले आहे. याबद्दल सर्व विद्वत लोकांची एकवाक्याता आहे म्हणून या सृष्टीकर्त्याचे आणि सृष्टीचे आपल्याला सर्व चमत्कार वाटतात. आदिशक्तीने निर्मिलेल्या सर्वच गोष्टी आश्चर्यकारक आहेत हे निर्विवाद. हा सर्व खेळ आहे. ही सर्व त्या शक्तीची लीला आहे. पण त्याच्या पाठीमागे काही योजना आहे काय, याचा आपण विचारच करू शकत नाही आणि उगीच करू पण नये.

मागील परिच्छेदात 'सगुण निर्गुण' काय आहे त्याचा उल्लेख केला. पण सगुणाविषयी आणखीन थोडासा खुलासा करू या. सर्व अवतारी पुरुष त्या शक्तीची सगुण रुपे आहेत. त्यांच्या पाठीमागे दुनिया अक्षरशः वेडी झाली आहे. पण निर्गुणाच्या पाठीमागे लोक वेडे होत नाहीत. कारण लोकांना त्यांच्या दृष्टीला काही समोर दिसायला हवे - वस्तू किंवा व्यक्ति. सर्व संतमंडळीचे अपवाद सोडल्यास व त्याचप्रमाणे काही शहाणे विद्वज्जन सोडल्यास इतर सर्व सगुण भक्ती करणारे शंभर टक्के अज्ञानी असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक वस्तुमात्र व व्यक्ति, जी ज्या स्थितीत असते, दिसते, ती सगुणसाकारच असते. पण निर्गुण ही अशी स्थिती आहे. की जिचा अनुभव प्रत्यक्ष येतो, पण आपल्या कातडी डोळ्यांना दिसत नाही. ज्या प्रमाणे 'हवा' असते, भासते, तिचा सर्व परीने अनुभव येतो, म्हणून ती निर्गुण त्याचप्रमाणे प्रेम , ममता या भावनांचे अस्तित्व आपल्यात जाणीव निर्माण करते. याचा अनुभव सर्वांना आहे. हे भाव किंवा या भावनावर सर्व मानवी संसाराचे व्यवहार अबाधित चालले आहेत. निर्गुणाचा किती उपयोग आहे, महत्त्व आहे , ते ज्याचे त्यानी पडताळून पाहावेत. निर्गुण निराकार जी ममता, प्रेमभाव ती आपल्या समजुतीस येते, अनुभवास येते. म्हणून ज्ञानराज म्हणतात की ' सगुण म्हणू कां निर्गूण रे '. ते दोन्ही एकच आहेत.

निर्गुणाच्या सतत सान्निध्यात सगुण उठावदार दिसते. त्या सगुण ताजमहालाकडे पहा. त्याच्या अवतीभोवती उंची आहे. पौर्णिमेच्या चंद्राच्या रुपेरी चांदण्यात डोळे भरून अनेक तास ज्यांनी ताजमहाल पाहिला असेल त्यांना ही कल्पना सुद्धा शिवली नसेल की सगुण सौंदर्याचा ताजमहाल निर्गुणाच्या आल्हाददायक वातावरणात पाहत आहोत. दुसरी गोष्ट अशी की आपले जगातले सर्व व्यवहार म्हणजेच संसार 'सगुण-निर्गुणाच्या' सतत सान्निध्यात , सहवासात अहोरात्र चालू असतात. आपण कार्य करीत असतो, पण मानव जातीचा चमत्कार असा की ती फक्त सगुणाकडेच पाहते. सगुण निर्गुणाचा संबंध फक्त अध्यात्मापुरताच नाही तर त्याचा खरा अर्थ जीवनात पहिला हवा. जगभर सगुणाची स्तुती ऐकून ऐकून कान विटले आहेत. सगुणाबरोबर निर्गुणाचा जयजयकार, जयघोष व्हायला पाहिजे.

थोडक्यात, सर्वत्र ईश्वर म्हणजेच सर्व आदिशक्तिचे स्वरुप. रिकामी जागा हे त्याचे निर्गुण रुप आणि या निर्गुणातून तो जेव्हा 'साकार' होतो, तेव्हा सगुण होतो म्हणजे शेवटी तोच.

_नारायण भु. भालेराव