हिंदी न्यूज चॅनल चा "मराठी बाणा"

वाचकहो,

नुकतेच घडलेले विधानसभेतील (अबू आझमी प्रकरण) नाट्य आपल्यापैकी बहुतेकांनी तमाम हिंदी न्यूज चॅनल वरून पाहिलेच असेल. त्याचप्रमाणे इतर अनेक मराठी भाषेशी आणि मराठी माणसाशी निगडित कार्यक्रमही पाहिले असतील. हिंदी न्यूज चॅनल दिग्दर्शित बहुरंगी अनेक अंकी नॉन्स्टॉप मराठी भाषा आणि मराठी माणूस नालस्ती कार्यक्रम. विनोदाचा भाग सोडला आणि नीट विचार केल्यावर काही गोष्टी 
खूपच खटकल्या. त्या मांडाव्याश्या वाटल्या म्हणून हा खटाटोप.
कोणी मराठी नेता, नगरसेवक अथवा असा कोणीही मराठी माणूस जो मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी काही परखड अशी मते मांडतो तेव्हा तो घटनेला सोडून बोलतो, निव्वळ असत्य बोलतो, देश तोडतो, राष्ट्रभाषेचा अपमान करतो, राजकारण करतो (हा मुद्दा थोडा का होईना पण पटतो), लोकशाहीला मारक बोलतो, माणुसकीला मारक बोलतो, प्रक्षोभक बोलतो, समाजात अशांतता पसरवतो, दहशतवादी असतो, भारतीय नसतो, गुंड असतो, कायद्याच उल्लंघन करतो आणखी काय नि काय हिंदी न्यूज चॅनल अतिशय रंगवून संपूर्ण देशातच नव्हे तर जगात अगदी अभिमानाने दाखवीत सुटतात. त्यामुळे भारतातील इतर राज्यात मराठी माणसाची आणि मराठी भाषेची प्रतिमा फारच उजळून निघत असणार यात काहीच शंका वाटायला नको नाही का? खरोखरच मराठीचा मुद्दा मांडणारा हा दहशतवादी वगैरे असतो का? राजकारण नक्की करत असेल हो, पण राजकारण कोण करीत नाही ते सांगा ना. मुख्यत्वेकरून मुंबई मध्ये हे हिंदी न्यूज चॅनल हा मुद्दा फारच लावून धरतात. ते अस का करतात या तपशिलात फार शिरण्याची गरजच नाही. सर्वसाधारण माणसाला समजायला हे फार कठिण नाही. मराठी भाषेच्या राजकारणाची महाराष्ट्रात परंपराच आहे असे ठणकावून सांगणारे आणि मराठीचा मुद्दा मांडणारा हा दहशतवादी असतो असंही म्हणणारे सहिष्णुतेचा पुरस्कार करतात असे म्हणायचे का?
दुसरे असे की हिंदी न्यूज चॅनल वाल्यांना जया बच्चन यांचा खुला मराठी द्वेष, अबू आझमी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तसेच २५ वर्षे मुंबई-महाराष्ट्रात राहूनही मराठी बोलता न येणे आणि विधानसभेत मराठीत बोलायची विनंती केल्यावर चप्पल उगारणे, इतके सगळे झाल्यानंतरही समाजवादी पार्टीतर्फे त्यांचा जाहीर सत्कार होणे, उत्तर प्रदेश आणि बिहार मधल्या नेत्यांची महाराष्ट्राच्या नेत्यावर तसेच राजकारणावर केलेली बेताल आणि उद्धट वक्तव्ये या सगळ्यात काहीही घटनाबाह्य, लोकशाहीला मारक, देशाच्या एकतेला मारक, मुजोर, प्रक्षोभक, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न अस काहीही वाटत नाही का? आणि जर वाटत असेल तर मराठीच्या नावाने शंख फुंकण्यासारखी तत्परता या गोष्टीत का दाखवली जात नाही? निदान संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा साधा उल्लेख देखिल कुठल्याही हिंदी न्यूज चॅनल वाल्यांनी केलेला आठवत नाही. उत्तर प्रदेश दिन आणि छटपूजा मात्र हे कधीही विसरत नाहीत. अशा वेळी कुठेतरी पक्षपातीपणा होतो आहे असे वाटल्याशिवाय राहत नाही. आपण नक्की लोकांना काय दाखवतो आहोत, त्याचा नक्की लोकांच्या, समाजाच्या मनावर काय परिणाम होत असेल, परिस्थिती आपल्या अशा दृष्टिकोनामुळे कायम होते आहे, बिघडलेल्या परिस्थितीचे आपण रक्षणकर्ते होत आहोत असा विचार हिंदी न्यूज चॅनल वाले कधी करणार? वर मराठी नेत्यांना आणि नगरसेवकांना दहशतवादी म्हणणारे हिंदी न्यूज चॅनल चे पक्षपाती पत्रकार स्वतः दुसरे काय करत असतात? पण याना कोणी प्रश्न विचारायचे? कोणी जाब विचारायचे? कारण हे म्हणजे लोकशाहीचे, घटनेचे, माणुसकीचे, बंधुभावाचे, देशप्रेमाचे, देशाच्या एकतेचे एकमेव स्वयंघोषित रक्षणकर्ते आहेत नाही का! 
घटना काय ते याना माहीत, कोर्टात केस उभी राहण्याआधी माणसाला कलम कोणते लागणार, जास्तीत जास्त आणि कमीत कमी शिक्षा किती होणार तेही याना माहीत, पोलिसांनी काय करायला हवं याना माहीत, गुन्हेगार गुन्हा कुठे करणार तेही माहीत. काय माहीत नाही ते विचारा.
उत्तर प्रदेशी आणि बिहारी नेत्यांच्या काही अंगाशी यायला लागले की हिंदी न्यूज चॅनल वाले राज्यघटनेचा जरा जास्तच कसून अभ्यास करायला लागतात असे स्पष्टपणे जाणवते.अबू आझमी सारख्या राज्यघटनेचा व्यासंग(?) असलेल्या माणसाला (मार खाल्ल्यावर तेच सारखे हिंदी न्यूज चॅनल वर राज्यघटनेच्या नावाने गळे काढीत होते) २०-२५ वर्षे मुंबई महाराष्ट्रात राहून देखिल राज्यघटनेपेक्षा तुलनेने फारच सोप्या अशा मराठीचा अभ्यास करायला कधी वेळच मिळाला नाही. खरे तर मराठीत चार ओळींची नुसती वाचून शपथ घेऊन ते विधानसभेतले प्रकरण सहज मिटवू शकले असते. कारण मराठी आणि हिंदी भाषेची लिपी सारखीच देवनागरी आहे. पण हिंदी न्यूज चॅनल वाले आझमिंचे कसे बरोबर आहे हे पटवण्याच्या नादात हि साधी सरळ गोष्ट विसरूनच गेले. कोणत्याही हिंदी न्यूज चॅनल वाल्यांनी हा युक्तिवाद मांडायचे कष्ट घेतले नाहीत. इतके हुशार लोकशाहीचे, घटनेचे, माणुसकीचे, बंधुभावाचे, देशप्रेमाचे,देशाच्या एकतेचे एकमेव रक्षणकर्ते हि गोष्ट मात्र सोयिस्करपणे विसरले.
मराठीची सक्ती निदान महाराष्ट्रात तरी असायला काहीच हरकत नाही. महाराष्ट्रातील विधानसभेत मराठीत शपथ घेणे ही काही फार मोठी आणि जगावेगळी अपेक्षा नक्कीच नाही. ही सक्ती जर आपण मराठी माणसांनी आणि नेत्यांनी अमराठी आणि प्रामुख्याने युपी आणि बिहार च्या नेत्यावर वेळीच केली नाही तर मुंबई आणि महाराष्ट्रातून मराठी हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही. कारण हिंदी मीडिया हा केवळ युपी आणि बिहार च्या भल्याचे व्रतच घेऊन जन्माला आला आहे हे सहज कळते. मराठीची नाचक्की करण्यात हिंदी मीडिया ने खूप मदत केली आहे.
शेवटी, मागच्याच आठवड्यातील उदाहरण देतो. सचिनचा क्रिकेट मध्ये २० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जो सत्कार केला त्यात त्याला याच मिडियाने विचारलेला प्रश्न असा की "मुंबई कोणाची?" आता यात सचिन ने काहीही उत्तर दिले असते तरी या मीडियाची चांदीच होती. मुळात हा प्रश्न खेळासंबंधी नाही आणि प्रश्न विचारण्याची वेळही चुकीची होती. पण तरीही हा प्रश्न विचारला गेलाच. सचिनच्या उत्तरावर मनसे किंवा सेनेकडून काही तरी प्रतिक्रिया येणार हे देखिल उघडच होत. सेनेची प्रतिक्रिया आली आणि हिंदी न्यूज चॅनल वाले जगाला दाखवायला मोकळे झाले की बघा कसा मराठी माणूस मराठी माणसाचाच उद्धार करतो. पुन्हा एकदा हिंदी न्यूज चॅनल वाले फूट पाडण्यात यशस्वी झाले. आता याला जर हिंदी न्यूज चॅनल वाल्यांचे फुटीचे राजकारण म्हटले तर काय चूक आहे? 
पुन्हा हे राजकारण लोकशाहीला, घटनेला, माणुसकीला, बंधुभावाला, देशप्रेमाला ,देशाच्या एकतेला तारणारे आहे का हा प्रश्न आलाच नाही का? (हा प्रश्न नेहमी हिंदी मीडिया मराठी नेत्यांना विचारित असतो)
हे विचार म्हणजे कोणत्याही प्रकारे विधानसभेत मनसे ने जे केले त्याचे समर्थन नाही. मी राजकारणी नाही आणि कोणाचा कार्यकर्ताही नाही. एक टीव्ही पाहणारा सर्वसाधारण सुशिक्षित प्रेक्षक आहे ज्याला हे प्रश्न पुन्हा पुन्हा पडतात. अखेरीस एकच वाटत राहते की सचिन जर मुंबई मराठी माणसाची म्हणाला असता तर हेच हिंदी मीडिया वाले सचिनला आणि सेनेला दोघांना बदनाम करत सुटले असते. पण दोन्हीकडून गोची मराठीची आणि मराठी माणसाचीच होणार होती आणि हाच नेमका त्यांचा उद्देश आहे असे दिसते.