गाभा आणि टरफल

शेतात भुईमुगाचे पीक येते. भुईमुगाच्या शेंगा त्याच्यावरील टरफलामुळे सुरक्षित असतात. टरफलामुळे शेंगाचे किड्यामुंग्यापासून संरक्षण होते. आपण शेंगातील दाणे घेतो आणि टरफले फेकून देतो. गाभा घेतो आणि टरफलाचा त्याग करतो. कोणत्याही गोष्टीतून सारग्रहण करावे असा संदेश भुईमुग्याच्या शेंगा देतात.

गाभा म्हणजे वस्तूचा अंतर्भाग. टरफल म्हणजे त्याचा पृष्टभाग. फळाच्या आतील गर म्हणजे गाभा. त्याचे कवच किंवा साल म्हणजे टरफल. नारळाचे पाणी व खोबरे हा त्याचा गाभा. नारळावरील काथ्या व कवटी म्हणजे त्याचे टरफल. हा गाभा मऊ असू शकतो किंवा टणकही. टरफलसुद्धा मऊ किंवा टणक असू शकते. बदामाच्या बीचे टरफल टणक असते. आतील बी म्हणजे गाभा अर्थात बदाम तो ही टणकच असतो. केळीचे साल मऊ असते. सालीच्या आतील केळेही मऊच असते. केळ्याला रंभाफल असे म्हटले आहे. नारळ व फणसाचे आवरण कठीण असते. फणसाला काटे असतात. फणसाच्या आत गोड गरे असतात. पण या गाभ्यापर्यंत जाण्यास कष्ट पडतात. नारळाची सुद्धा किती आवरणे. नारळ उंच शेंड्यावरून खाली पडला तरी खराब होत नाही. ही खबरदारी निसर्गानेच घेतलेली दिसते.

टरफले किंवा साली निरुपयोगी म्हणून फेकून दिली जातात. पण सर्वच टरफले टाकाऊ नसतात. फळांच्या सालीत जीवनसत्त्वे असतात असे आयुर्वेद सांगते. तसेच काही साली आणि टरफले औषधी असतात. एखाद्या ग्रंथाचे बाह्य स्वरुप म्हणजेच आवरण आकर्षक असते. बालसाहित्य असे असते.

गाभा आणि टरफल हे एकमेकांना आवश्यक तसेच अनिवार्य आहेत. गाभ्याशिवाय टरफल किंवा टरफलाशिवाय गाभा याचा विचार आपण करू शकत नाही. गाभा आणि टरफल हे निसर्गाचे अविभाज्य भाग आहेत. विविध प्रकारची धान्ये आणि फळे यामध्ये हेच तत्त्व दिसून येते. यात उपयुक्त गाभ्याचे संरक्षण हाच उद्देश दिसून येतो. योग्य संरक्षण योजना नसेल तर मौल्यवान गाभा खराब होईल किंवा नष्टही होईल. अलिप्तता, निरपेक्षता आणि कर्तव्याची जाणीव इत्यादी गुण आपल्याला टरफलात दिसतात. टरफलाचा जन्म हा दुसऱ्याची सतत काळजी घेण्याकरिताच झालेला असावा. काम झाल्यावर उपेक्षा होणे अथवा केराची टोपली दिसणे हेच टरफलाच्या ललाटी लिहिलेले असावे.

एखाद्या विषयाचा मूळ मुद्दा म्हणजेच त्या विषयाचा गाभा होय. एखाद्या विषयाचे सांगोपांग विवेचन किंवा समर्थन हे त्या विषयाच्या मूळ मुद्द्याला सावरते किंवा धरून असते. हे त्या मूळ मुद्द्याचे कवचच असते. अनेक कीर्तनकार कीर्तनात मूळ विषय सोडून अन्य विषय हाताळीत अक्षरशः भरकटत असतात. यालाच कीर्तनकाराचे चऱ्हाट असे म्हणतात. कीर्तनाचा विषय किंवा मुद्दा म्हणजे गाभा. कीर्तनाच्या अनुषंगाने झालेली शब्दांची निष्कारण फेकाफेक म्हणजे टरफलेच. कीर्तन विषयाला धरून झाले तरच कीर्तनाला रंग येतो. मूळ गाभा आवश्यक इतर विषयांतर म्हणजे टरफले अनावश्यक. फळाच्या गाभ्यालाच गोडी असते. ती टरफलात नसते. देव गाभाऱ्यात इतरत्र बघ्यांची गर्दी.

आपल्या शरीराला झाकणारे कपडेलत्ते हे शरीराला दिलेले आवरण. हे आवरण किती आकर्षक करावे किंवा नटवावे ह प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. शरीराला कितीही सजावट केली तरी आतील शरीर तेच राहते. त्यात फरक पडत नाही. वास्तविक शरीर हे सुद्धा आवरणच आहे. आत असलेला जीवात्मा म्हणजे निजवस्तु. ती शरीरातच वास करीत असते आणि शरीर हे त्याचे आवरण अथवा टरफल. जीवात्मा निघून गेल्यावर शरीर निर्माल्यवत होते. देह देवाचे मंदिर असे म्हटले आहे. देवच नसेल तर मंदिराचे प्रयोजन काय?

सत्य व अहिंसा हे महात्माजींच्या जीवनाचे तत्त्व होते. हा त्याच्या आचारविचारांचा गाभा होता. त्यांची सर्व कर्मे सत्य अहिंसेवर आधारीत होती. या दोन तत्त्वापासून ते कधीही दूर झाले नाहीत. त्यामुळेच त्यांचा सत्य अहिंसेचा गाभा सुरक्षित राहिला.

उपनिषदात सर्व तत्त्वज्ञान आलेले आहे. उपनिषदांचे सार गीतेत आहे. गीता भगवंतानी अर्जुनास निमित्त करून सांगीतली. अर्जुन म्हणजे तुम्ही आम्ही सर्व. कौरव पांडवातील संघर्ष प्रत्येकाच्या मनात चाललेला असतो. पांडव म्हणजे सत्प्रवृत्ती , कौरव म्हणजे दुष्टप्रवृत्ति. सद् गुण संख्येने कमी असतात. तरी शेवटी त्यांचाच विजय होतो. कारण भगवान श्रीकृष्ण पांडवांचा मार्गदर्शक होता. गीतामध्ये भगवान श्रीकृष्णाने जीवनाचे सार उलगडून सांगीतले व सर्व संशयरुपी टरफले दूर केली.

_नारायण भु. भालेराव