वादळाची ह्या जगा चाहूल जेंव्हा लागली

वादळाची ह्या जगा चाहूल जेंव्हा लागली
भिंत सारे बांधती, मी पवनचक्की बांधली!

शेवटी आलास सवडीने वसंता हाय पण;
आज ही चर्याच आहे बघ फुलांनी झाकली!

जीवनाच्या चाचणीला निवडताना उत्तरे,
पेन्सिली झिजल्या जरा, पण खोडरबरे संपली!

चालतो मी पावसातुन एवढ्यासाठीच की,
ना कुणालाही दिसावी आसवे जी वाहली!

वर्ग ह्यांचा कोणता, ह्यांना म्हणे आता बघा;
फ्रीज येता कारचीही गरज भासू लागली?

चाल बांधू ये नव्या लावण्यगीताची, सखे!
की सुरा ताज्या सुरांची तूहि कोठे चाखली?

दूरदेशी वाहते माझ्या सदा डोळ्यातुनी,
सावली जी माय माझी सुरकुत्यांनी रापली!

अंग उघडे.. गारठ्याने कापला होता किती!
हो, कुणी त्याच्या चितेतच शाल नंतर टाकली!
                                                       -मानस६