प्रसन्नतेची पहाट

विज्ञानाने प्रगती केली आहे ते खरे आहे. परंतु एका बाजूला वैज्ञानिक प्रगतीचा आणि भौतिक समृद्धीचा वेग व गती वाढली असली तरी माणसाची नैतिकता व माणुसकी घसरली आहे. आज सर्व शहरामध्ये भव्य इमारतीची उंची वाढत असली तरी माणसाच्या मनाची उंची कमी होत आहे. विज्ञानाच्या प्रगती मुळे जग जवळ आले पण माणसे एकमेकापासून दूर जात आहेत. माणुसकी आटत चालली आहे. विज्ञानाने समृद्धि, भौतिक सुखाची किमया घडविली पण माणसांची मने बदलता आली नहीत. सुसंस्कृत माणसे घडविण्यात आम्ही मागे पडलो आहोत. त्यागातला व निस्वार्थ सेवेतला निखळ आनंद किती मोलाचा असतो हे आम्हास उमजले पहिजे. हल्लीच्या धगाधगीच्या जगातील मानवजातीचे जीवन गडबडीचे , धावपळीचे व व्यस्त झालेले आहे. प्रत्येक जण काहीतरी विवंचनेत अडकलेला असा व्यग्र झाला आहे. अशा वेळी त्याला दुसऱ्याकडे लक्ष देण्यास फुरसत आहे कुठे? परोपकार , सत्कृत्य, दानधर्म, सेवाभाव इत्यादी शब्द आता शब्दकोशातच पहावे लागतील. अशा या काळोखाच्या दाट काजळीत प्रसन्नतेची किनार शोधून सापडणार नाही अशी परिस्थिती दिसत आहे. परंतु अजूनही ती लोप झालेली नाही. तिचे अस्तित्व कुठे ना कुठे तरी दिसतेच, अशी प्रसन्नतेची किनार कुठे आढळली की मन सुखावते, आशा पल्लवीत होतात. सार्वजनिक जीवनात सचोटीने काम करणारे अनेकजण दृष्टोत्पत्तीस येतात. काहीही अभिलाषा न बाळगता कार्यरत असलेले महाभाग पाहिले की आपण आदराने नतमस्तक होतो. ही व्यक्तिमत्वे मनाला दिलासा देऊन जातात. माझे 'आठवणीतील गुरुदेव' हे पुस्तक वाचून अनेक महाभागांनी स्वेच्छेने पृच्छा करून मदत केली. माझ्या अडचणीच्या काळात मदतीचा हात देणारेही काही संतसज्जन आढळले. ही माणुसकीच्या वाटेने जाणारी माणसे पाहिली की मन गहीवरून येते.

विद्यार्थी वर्गाच्या बेशिस्त, बेधुंद, बेफिकीर वर्तनाचे वृत्त वृत्तस्तंभात वारंवार आढळते. पण ऐन गर्दीत रेल्वेत मला जागा देऊन , बस स्टॉपवर मी उभा असलो तर आपली अलीशान गाडी मुद्दाम थांबवून मला लिफ्ट देऊन , एखाद्या कार्यालयातून आपण होऊन मदतीचा हात पुढे करणारा, प्रत्यक्ष भेटून आदरभाव व्यक्त करणारा भेटला की, वर्तमानपत्रातील वार्ता विसरल्या जातात.

पुण्याहून गाणगापुरास उद्यान एक्सप्रेसने आम्ही उभयता जात होतो. दौंड स्टेशनावर गाडी जेवण्यासाठी बराच वेळ थांबते. लोकांची जेवणे झाल्यावर त्यांची उष्टी ताटे आमच्या डब्यासमोरच्या फलाटावरील झाडाखाली खानमान सेवेचे कर्मचारी रचत होते. एक लहान कोवळा मुलगा, सहा सात वर्षाचा,  धावतधावतच तेथे आला. इकडे तिकडे पाहू लागला. आणि लोकांनी मुजोरपणे फेकून दिलेले ते अन्न मोठ्या समाधानात खाऊ लागला. त्याला सपाटून भूक लागली असावी. कारण भूक लागल्याच त्याच्या डोळ्यातलं समाधान अवर्णनीय होंत. एवढ्यात त्याची बहिण तेथे आली. तो खायचा थांबला आणि बहिणीला भरवू लागला. भुकेच्या आगीनं तापलेल्या त्याच्या मनात तशाही स्थितीत मायेचा प्रौढ आणि समजूतदार ओलावा होता हे बघून मन भरून आलं.

त्याच वेळी त्या गाडीचे ट्रेनकंडक्टर, तिकिट तपासनीस एकत्र जमले. आणि रेल्वेच्या थाळ्यावर ताव मारत होते. आमच्या डब्याचा कंडक्टर मात्र शांतपणे बसून होता. त्या सर्वांच खाण आणि सोबतची बडबड संपली. ते निघून गेले. मग यानं शांतपणे कोट काढला. स्वतःचा डबा काढला. बरोबरच्या पिशवीतला थाळी कटोरा काढला. नंतर हात धुवून आला. सर्व अन्नपदार्थ आधी थाळीत मांडून घेतले. प्लॅटफॉर्मवरच्या त्या कोवळ्या बहिण भावंडांना बोलावून त्यातला वाटा त्यांना दिला आणि डोळे मिटून, नमस्कार करून कुठला तरी श्लोक म्हणून तो शांतपणे जेऊ लागला. जेवण संपल्यावर थाळी स्वच्छ धुवून सर्व पॅक केलं आणि कोट चढवून पुन्हा युद्धभूमीवरील वीरासारखा कामाला सज्ज झाला. अन्नब्रह्माच्या सोज्वळ उपासनेचा हा सोहळा आम्ही दोघंही डोळा भरून बघत होतो. आणि मनोभूमीवर साक्षात प्रसन्नता साकार होत होती.

_नारायण भु. भालेराव