डिसेंबर २००९

साक्षात्कारी डेंग्यू ?

काही दिवसापूर्वी माझ्या मुलाला ताप आला [वय वर्ष १०]. तसे निमित्त काही नव्हते. डॉक्टर म्हणाले कि व्हायरस इनफेक्शन आहे, ४-५ दिवसात बरे होईल.

आम्ही घरी आलो. २ दिवसामधे ताप उतरत होता, गोळ्या दिल्या कि कमी व्हायचा. कमी झाला तरी अंग मात्र रखरखित लागायचे. दोन दिवसांनी ताप कमी होत नाही असे म्हटल्यावर सकाळी हिमोग्राम आणि संध्याकाळी डेंग्यू अशी तपासणी झाली. दोनही रिपोर्ट चांगले होते. आता मात्र माझ्या मुलाच्या थोडे थोडे पोटात दुखायला लागले होते. जेवण जात नव्हते आणि उमासे हि येत होते.

चिंता वाढत होती. जेवण कमी आणि उलटीमुळे पाणी कमी. अजून दोन दिवस ह्यामधे गेले. ताप कमी झाला पण पोटदुखी वाढली. आमच्या फॅमिली डॉक्टर म्हणाल्या कि आता मात्र बालरोगतज्ञाला दाखवले पाहिजे. नविन ठिकाणी जाणे आले. इतके होई पर्यंत मुलगा वैतागला होता. पण नविन डॉक्टर म्हणाल्या कि इस्पितळामधे भरती व्हा. २ सलाईनच्या बाटल्या चढवल्या कि टुणटुणीत होईल. ह्या बोलांनी जरा धीर आला. इस्पितळामधे मुलाला भरती केले.

पण पोटदुखी काही थांबेना आणि जेवण काही जाईना. ६ तास गेले, ह्यामधे विडाल, छातीचा एक्सरे, हिमोग्राम, डेंग्यू अश्या तपासण्या झाल्या. काहिच निकाल लागत नव्हता. डॉक्टर म्हणाल्या स्वाईन फ्ल्यू नाहिये पण एकदा नायडू मधे जाऊन या. आता मात्र तणाव वाढत होता. वर्तमानपत्रातल्या बातम्या. चला आलिया भोगासी आम्ही नायडू मधे दाखल झालो. सर्व कर्मचारी अतिशय चांगले होते. त्यांनी सहकार्य केले आणि तपासणी न करता टॅमिफ्ल्यू दिले कारण सगळ्यांची तपासणी करणे शक्य होत नाही आणि त्याला वेळही लागतो.

दिशाहिन उपचार चालू होता. कशामुळे हे चालू आहे ते काही कळत नव्हते. टॅमिफ्ल्यू च्या औषधाने दिवस संपला. रात्र मुलाने कण्हतच काढली. सकाळी पुन्हा पहिले पाढे पंच्चावन्न. पोटदुखी सुरू आणि ताप नाही. पहिल्यापासून सर्दी आणि खोकलाही नव्हताच. नविन प्रयत्न, सोनोग्राफी. सोनोग्राफीचा निकाल असा कि डेंग्यूची शक्यता आहे. परत रक्त तपासणी पण डेंग्यू नाही असा रिपोर्ट. प्लेटलेटचा आकडा आवश्यक तेव्हडा.

नविन तपासण्या चालूच, यकृत, किडणी यांची कार्ये चालू आहेत का वगैरे... पोट दुखते आहे तर आता शल्यविशारदाला दाखवू, काहि शस्त्रक्रिया करायला पाहिजे का पोटदुखीसाठी. शल्यविशारदाने तपासणी केली, त्याच वेळी परत एकदा प्लेटलेटच्या आकड्यची तपासणी झाली, आणि प्लेटलेटचा आकडा कमालीचा घसरला होता. आणि ६ दिवसानंतर डेंग्यू सदृश आजाराचे निदान झाले. आता नविन गोष्ट ती म्हणजे प्लेटलेट मिळवणे रात्री ९:३० वाजता. शोधाशोध सुरू, सगळ्या रक्तपेढ्या पालथ्या घातल्या शेवटी प्लेटलेट चढवणे रात्री ११:३० वाजता चालू झाले.

हे सगळे इथे सांगणे एवढ्यासाठी कि तुम्हाला जर खालिल लक्षणे असतील तर तुम्हाला कदाचित डेंग्यू सदृश आजार झाला आहे का ते बघा नाहितर प्राण कंठाशी येतात, आमचा सगळ्यांचा अनुभव आहे.

डेंग्यू सदृश आजाराची लक्षणे

* प्रथम १ ते २ पर्यंत ताप, सर्दी, खोकला नाही घसा दुखत नाही.
* पोटात दुखणे.
* अंगावर रॅश येत नाही जो साधारण डेंग्यू मधे येतो.
* जेवणावरची वासना उडणे
* उलट्या होणे
* हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढणे आणि प्लेटलेटचा आकडा कमी होणे.

डेंग्यू सदृश आजाराची उपाययोजना

* डेंग्यू व्हायरससाठी का्हिही औषधे नाही आहेत.
* अंगातील पाणी कमी झाल्यास, सलाईन लावणे.
* प्लेटलेटचा आकडा कमी झाल्यास रक्तामधे प्लेटलेट चढवणे.
* सकस आहार आणि भरपूर विश्रांती.
* उलटी जरी होत असेल तरी पाणी पिणे आणि खाणे.
* प्लेटलेट वाढण्यासाठी साळीच्या लाह्या खाणे किंवा साळीच्या लाह्यांचे पाणी पिणे.

अर्थात हे सर्व डॉक्टरी सल्ल्यानेच.

सर्वात शेवटी म्हणजे सगळ्यांनी वर्षातून एकदा रक्तदान करणे. सगळ्या पुण्यात त्यादिवशी फक्त १०० बाटल्या रक्तदान झाले होते. आपल्या देशात तरी रक्ताचा तुटवडा पडू नये.

आम्हाला मदत करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे आणि नर्सेसचे आभार.

Post to Feedमाहिती
माझा मुलगा पूर्ण बरा झाला आहे.

Typing help hide