माझ्या आठवणीतील देव

"दिव्यते इति देवः।" जो प्रकाशतो, प्रकाशित होतो तो देव. प्रकाशणे हाच देवाचा प्रकट अवतार असतो. "असामान्य कृतिं कुर्वन् नरो देवत्वमाप्नू ते" आयुष्यात अलौकिक कार्य करणारा मनुष्य देवत्व या पदवीला प्राप्त होतो म्हणजेच देव होतो. म्हणजे अलौकिक गुण अंगी असणे हे देवत्वाचे लक्षण आहे. खरे पाहतां, सद् गुण हेच अलौकिक गुण असतात. म्हणून सद् गुणात देवपण आहे. यामुळे देवपण हे माणसातच असू शकते. या सद् गुणांचा विकास झाला की देव माणसाला स्वतःच्या देहात सापडतो. प्रकाश पडणे हे जर देवत्वाचे लक्षण असेल तर सद् गुणांचाही प्रकाशच पडतो. असे सद् गुण असणाऱ्या परमभक्तापुढे जग नतमस्तक होते. खरोखर देव अशा व्यक्तिंच्या आधीन असतो. हे सद् गुण कसे येतात? अशा व्यक्तिंनी आपले जीवन शुद्ध केलेले असते. अवगुणांना दूर केलेले असते. दैवी संपत्तीची जोपासना केलेली असते. असे सद् गुण असणारे संत सर्व प्राणीमात्रावर दया करणारे , उपकार करणारे , अलौकिक कार्य करणारे पृथ्वी वरचे देवच असतात.

सूर्य, चंद्र, अग्नी यांना देवता मानले आहे. कारण त्यांच्याजवळ निसर्गशक्ती आहे. सूर्य पृथ्वीवरील मानवाला प्रकाश देतो, उष्णता देतो. पावसाची देवता इंद्र - सूर्य नसताना प्रकाश वा उष्णता देणारा अग्नि. अशी ही निसर्गशक्ती माणसासाठी काहीतरी चांगले करणारी आहे. ही निसर्गशक्ती माणसामध्येही दिसू शकते आणि जेव्हा असा माणूस सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे श्रेष्ठ जनहिताचे काम करून दाखवितो त्यावेळी त्यालाही देवत्व प्राप्त होते म्हणजे लोक त्याला देव मानू लागतात. अलौकिक कार्य केल्यामुळे अयोध्येचा राम , द्वारकेचा कृष्ण यांना आपण देव म्हणून मानतो व त्यांची स्थाने म्हणजे देवालये निर्माण करतो. पण राम, कृष्ण ही देव मानली तरी देहाने ती अमर होऊ शकली नाहीत , किर्तीने अमर झाली. आणि लोंकानी त्यांच्या मुर्ती करून त्यांना अमरत्व दिले. त्यामुळे आज भारतात कुठेही एक वास्तू निर्माण करून त्यात मूर्ती ठेवली की देवालयात देवता स्थानापन्न होते. मग शिल्पकाराने मूर्तीला काही कां रुप असेना !

आमच्या या वृत्तीवर घाव घालून देवत्व नाहिसे करण्याचे प्रयत्न परकीयांनी येथे येऊन केले. त्यांना देवच नव्हता. होता तो देवदूत. तेव्हा देवता नष्ट केल्या की देवदूताची भक्ती होत राहील असा त्यांचा आडाखा असावा. पण मूर्ती भंगाने देव नाहिसा झाला कां ? बिलकूल नाही. कारण देव मूर्तीत नव्हताच. तर आमचा देव - विश्वव्यापी देव सर्व विश्वात भरून राहिलेला होता. मूर्तीचे जितके कण झाले त्या प्रत्येकातच देव होता. मूर्ती भंगली तरी देव अभंगच राहीला. तसा तो पूर्वीही होता आणि पुढेही असेल. याचे कारण काय? तर आमची मूळ कल्पना. ऐहिक आयुष्यानंतरही त्याचे कार्य शकते. मूतीने त्याची आठवण जागी राहते.

आता ही आठवण कुठे निर्माण होते ? आठवण मनात निर्माण होते. भजन, पूजन हे भक्तिचे विधी करण्याकरिता देवाला साकार व्हावे लागते. एरवी तो निराकार - विश्वाकारक. मन आज्ञा देते तेव्हा कर्मेंद्रिये हात, वाचा इत्यादी पूजन भजन करू लागतात. ज्या गोष्टी मूर्तीत दाखविलेल्या नसतात पण ज्यामुळे देवत्व मिळालेले असते त्या गोष्टी मनात भरलेल्या असतात. मनात रुजलेल्या असतात. म्हणजेच देवळे व मूर्ती असोत वा नसोत. भक्तांची दैवते असतात. त्यांच्या मनातल्या  आठवणीनी बांधलेली. त्यांना जशा वाटतात तशा त्या असतात. म्हणून शिल्पकार त्याच देवाची मूर्ती निरनिराळ्या तऱ्हेने बनवतो. देवाला पाहिलेले कोणीच नसते. रामाला आणि कृष्णाला आम्ही आजचे लोक असे पाहणार आहोत? पण त्यांची एक कल्पना मनात रुजलेली असते. तोच आमच देव असतो. डोळे मिटूनही आम्ही देवाचे ध्यान करतोच. माझ्या कल्पनेप्रमाणे माझा देव माझ्या मनात आहे. समोरची मुर्ती मनाच्या एकाग्रतेला उपयोगी असते हे पतंजलीने योगसूत्रात सांगून ठेवलेच आहे. पण डोळे मिटून घेतल्यावर पुढ्यातील मूर्ती कोणी उचलून नेली तरी कळत नाही. कळले तर एकाग्रता अजून साधली नाही. त्यामुळे देवाची मूर्ती जो ज्याला हवी असेल तशी बनवून घेऊ शकतो. विश्वातील सर्व रुपे देवाचीच. पण देव आहे हृदयात, मनात, आठवणीत - मूर्तीत नव्हे.

_नारायण भु. भालेराव