गमक

कसे जगावे सुखात ह्याचे मला कळाले अता गमक
इथे तिथे शोधणे कशाला? लगेच गाठू चला नरक

खरोखरी छंदमुक्त जगणे सदैव जर का तुला हवे?
मनाबरोबर तरी अगोदर, हवेस जुळवायला यमक

लगेच खणतील कोपराने मऊ जरा लागलास तर
टिकायचे तर जमीन वरवर तरी असावी तुझी टणक

कुठेच नामोनिशाण माझे नसेल ठेवायचे तुला
हवेस सोडायलाच तू मग फितूर अश्रूंवरी उदक

पडेलही उन्मळून माझे क्षणात अस्तित्व वाळके
निदान घावामध्ये तुझ्या पण हवी जराशी तरी चमक

उगाच रसभंग ह्यायचा जर दिलीस उत्स्फूर्त दाद तू
इथे तुला चेहर्‍यास इस्त्री करायला पाहिजे कडक

गुलाम झालास साधनांचा... दिलीस सोडून साधना
सुचायलाही लिखाण आता पुढ्यात लागेल संगणक