आदरणीय श्रीमती सुलोचना दीदींस सप्रेम

आदरणीय श्रीमती सुलोचना दीदी यांना सप्रेम नमस्कार!

"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" याची सार्थकता म्हणजे आपले जीवन. अशा या मातेला 'मातृदेवो भव' म्हणून प्रथमतः वंदन करतो. मातृत्व प्रत्येक स्त्रीला लाभलेलं निसर्गदत्त वरदान आहे. अशा या घरोघरी पोचलेल्या पवित्र मातेला "महाराष्ट्र भूषण" हा यथोचित पुरस्कार देऊन सन्मानित केलं व जी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली त्या बद्दल सरकारचे त्रिवार अभिनंदन व या गौरवास्पद कामगिरीबद्दल कृतज्ञता. आपण आपल्या सक्षम अभिनयाद्वारे मातृत्वाचे साक्षात्कारी रूप आविष्कृत करून वात्सल्य जागविण्याचे व जगविण्याचे जे महान कार्य केले आहे त्याबद्दल समाज आपला ऋणी राहील. मातेची भूमिका आपण जगत आलात. प्रत्येक घरातील वात्सल्याचा अंकुर आपण आपल्या वात्सल्यप्रेमाने अंकुरित केलात व एक आदर्श माता म्हणून लौकिक प्राप्त केलात तो निःसंशय स्पृहणीय आहे. मातृत्वाच्या अस्तित्वाची जिवंत जाणीव आपल्या अभिनयाद्वारे केलीत त्याला तोड नाही. मातृत्वाच्या सर्व छटांचे दर्शन आपले ठायी प्रतीत होते.

जया अंगी मोठेपण तया यातना कठिण हे मातृत्वाचे मोठेपण कठोरपणे यातनेसह आपण जपलेत. शालीनता, सौजन्य, सहनशीलता हा आपला स्थायीभाव आहे, ती आपली प्रकृती आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाशी, घराशी आपले नाते जुळले. मातृत्वाला आपल्या सुलोचनांनी साथ दिली, वात्सल्य आपल्या डोळ्यांतून बोलत असतं, भावपूर्ण चेहऱ्याच्या संगतीत तुम्ही मातेची ममता भाववृत्तीत अजरामर केली, सुडौल शरीरसौष्ठवाने वात्सल्याला अंगाखांद्यावर खेळवलंत, यावत चंद्र दिवाकरौ अशा तुमच्या सोज्वळ चेहऱ्याने परिपूर्ण मातृत्वाचा साक्षात्कार उदयास आला. प्रत्येकाच्या हृदयी, अंतर्यामी आरूढ झाला. काळजाला हात घालणारी, हृदयाला घरे पाडणारी, दुःखाला, आनंदाला अश्रूंनी न्हाऊ घालणारी, आर्ततेने व्याकुळ होणारी, प्रसंगी हंबरडा फोडणारी, मायेचा सल घेऊन असहाय होणारी, प्रेमानं कवटाळणारी ही माता (आई) म्हणजे प्रत्येकाच्या काळजाचा तुकडा ठरली. उशीरा का होईना, पण सरकारने या मातेच्या काळजाला हात घातला व अंतर्मुख होऊन मातेची काळजी घेतली, व या मातेला समाजाच्या सिंहासनावर बसवून तिची महती सिद्ध केली या बद्दल परत अभिनंदन. समाजातील प्रत्येक घटक या मातेचा ऋणी आहे. या मातेला उदंड आयुष्य लाभो अशी मनोभावे प्रार्थना करून, मातेच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. व्यक्त भावना स्वीकृत व्हाव्यात हीच अंतरीची इच्छा!

आपला कृपाभिलाषी,

शशिकान्त टोपकर.