मोकळे असू द्या

नकोत ओझी अर्थाची, मोकळे असू द्या
कधी कधी शब्दांनाही मोकळे असू द्या

उगाच बेड्या चरणांना घालता कशाला ?
नकोत छंदांच्या गाठी, मोकळे असू द्या

पहा किती काव्याचे शेवाळले सरोवर
खळाळती ठेवा वाणी; मोकळे असू द्या

दिसून यावा सर्वांना चेहरा कवीचा
असे कवन आरस्पानी, मोकळे असू द्या

असो मुखी यवनी वा गीर्वाण शब्दगंगा
हृदय मराठीच्यासाठी मोकळे असू द्या