आमच्या वाहनचालन कौशल्याची चित्तरकथा....

"नवीन गाडी आहे, नीट नेता येईल ना घरापर्यंत? " धडधडत्या काळजाने मीराने अनयला विचारलं.

"मला कालच लायसन्स मिळालं आहे". हातातला परवाना अनयने जाहिरातीसारखं झळकवला आणि एकदम त्याच्या डोळ्यासमोर कालची परीक्षा नाचली.

"स्टॉप! स्टॉप!! " गलेलट्ठ परीक्षक ओरडला. घाबरून त्याने खचकन ब्रेक दाबला.

"आय आस्क्ड यू टू टेक अ लेफ्ट टर्न"

"या, आय वॉज गोईंग टू... " वळून आत आल्यावरही हा माणूस का भडकलाय तेच अनयला कळेना.

"थॅंक गॉड! " त्याने एकदम मान डोलवत आपलं डोकं दोन्ही हातात धरलं. डावीकडे गाडी वळव म्हटल्यावर डावीकडे वळवली याचा एवढा गहजब? विचार मनात येतोय तोच त्याने डाव्या लेनमध्ये न जाताच गाडी आत आणली होती हे त्या परीक्षकाच्या चेहऱ्यावरून अनयने ताडलं. आता परीक्षकाच्या हातातल्या डोक्यात आपलंही डोकं टाकावं असं त्याला वाटून गेलं.

"सावकाश रे" मीराचा आवाज त्याच्या कानात एकदम घुमला.

"काय? " आवाजातला जोर पायातून ऍक्सेलेरेटरवरही गेला.

"अरेऽऽ, ब्रेक दाब" ती किंचाळलीच.

"ब्रेकच दाबतोय. " त्याने ब्रेकवर पाय दाबला तरी गाडीने एकदम नको तेवढा वेग घेतला आणि पुढे जाताच आलं नाही म्हणून समोरच्या खांबावर जाऊन तिने आपलं डोकं आपटलं.

’नवीन’ म्हणजे खरं तर जुनीच पण मीरा-अनयसाठी असलेली नवीन गाडी दोन दिवसात फार जखमी न झाल्याने दुरुस्त होवून घरी आली. अनयला गाडी चालविणं म्हणजे काय असतं ते दाखवायचं हा विडा मीराने उचलला. अनयनेही न बोलता मान तुकवली. एकदा खांबदर्शन गाडीला घडविल्याने तसाही त्याला काही पर्याय नव्हता.

"थेट फ्रीवेवरच घालीन म्हणते गाडी. "

"कुठेही घाल, पण हे बघ बरोबर घेऊ कुणाला तरी. "

तिने त्याची विनंती मान्य केली. इंडियन लग्नात ऍडजस्टमेंट महत्त्वाची हे अलीकडेच कुठेतरी तिच्या कानावर पडलं होतं. विद्यार्थीदशा नुकतीच संपली होती. ज्या घाईघाईत दोघं गाडी घ्यायला गेले होते त्याच घाई घाईत त्यांनी हल्लीच लग्न उरकलं होतं. एकतर ते कधीतरी कुणाबरोबर तरी करायचंच होतं तर मग एकमेकांशी केलं तर स्वतंत्र राहायचा खर्च वाचला, एकमेकांच्या खोलीत कधी करपलेलं, तर कधी कच्चंच राहिलेलं अन्न चिवडायचं, ते एकत्रच चिवडू हा ही हिशोब होता. आता लग्नं झालं, नंतर काय; तर दोघांनी गाडीची खरेदी उरकली. आता गाडीच ती, म्हटल्यावर तिला चालविणं क्रमप्राप्त होतच.

किल्ली बोटाच्या तालावर नाचवीत मीरा जिन्यावरून सम्राज्ञीसारखी एक एक पायरी उतरत होती. मागोमाग पावलं ओढत अनय आणि तेजसने पृथ्वीतलावर पाय टाकले.

"घाबरू नकोस, तिच्याकडे इंटरनॅशनल लायसन्स आहे. " फाशीची शिक्षा सुनावल्यासारखा तेजसचा चेहरा पाहत अनयने सहानुभूतीने त्याच्या खांद्यावर थोपटलं.

"मी सेलफोन आणलाय मित्राचा. अचानक ९११ ला फोन करायला लागला तर...! ब्रेक आणि ऍक्सेलेरेटरमधला फरक समजला नाही म्हणून ही वेळ आली तुझ्यावर. " दर्द भऱ्या आवाजात तेजसने अनयकरता गाडीचं दार उघडलं.

गाडी संथ गतीने रस्त्यावर आली, रस्त्यावरही ती संथच राहिली.

"बिलो स्पीड लिमिट म्हणून पकडतील तुला मीरा. " स्वतःच्या सारथ्याची धूळधाण अनयच्या मनाला बोचत होती.

गाडी इतकी सावकाश होती की लाल दिव्यापाशी थांबताना ब्रेकचीही गरज भासली नाही.

मीरा स्वतःच्या ड्रायव्हिंग कौशल्यावर अतोनात खूश होती. तेवढ्यात बाजूच्या गाडीतला माणूस काहीतरी खाणाखुणा करून सांगायला लागला. तिन्ही खिडक्या एकदम खाली सरकल्या.

"यू आर टू स्लो!!... शीट!!! "

"आय ऍम फॉलोईंग द स्पीड लिमिट. "

त्याने अ-फ ची भाषा करत, मधलं बोट दाखविलं तसं अनय, तेजस खदखदा हसले.

"शटअप... " तूच चालव मग आता. एकदम गाडीची किल्ली मीराने त्याच्या हातात कोंबली.

अरे, अरे रस्त्यावर काय गाडी बंद करतेस?

अनयने टूणकन ड्रायव्हिंग सीटवर उडी मारून तिला बाजूला सरकवलं.

असं एकमेकाच्या मांडीवर बसून चालवायचं असेल तर बंदा सेवेकरता हाजिर है. अनयचा आवाज घोगरा यायला लागला.

"पहिलं म्हणजे मी मांडीवर नाही बाजूला आहे तुझ्या, दुसरं म्हणजे रस्त्यावर आहोत आपण, तिसरं मागे मित्र आहे तुझा आणि चौथं गाडी किल्ली आत घातल्याशिवाय चालू होत नाही. "

"पाचवं नको काढू आता. " सरक ना आणखी थोडीशी माझ्याजवळ. किल्ली नक्की कुठे घालायची ते अनयला उमगेना.

कोण कुणाच्या मांडीवर बसलंय, की चिकटून बाजूला; तेही एकाच सीटवर हे कोडं सोडविता येईना तसा तेजसच्या तोंडाचा आ वासलेलाच राहिला. आधीच लग्नाच्या बेडीत अडकायचं की नाही ह्या गहन प्रश्नात तो आज प्रवास सुरू झाल्यापासून अडकला होता. त्यात आणखी एक प्रश्नचिन्ह. एकंदरीत प्रवास गुंतागुंतीचा होत चालला होता.

"आत्ता नको रे बाबा तू तिला धडे देऊ गाडी चालविण्याचे. " तेवढ्यात कोणीतरी दारावर ठकठक केलं.

"ट्रॅफिक जाम झालाय तुमच्यामुळे, आणि एका ड्रायव्हरसीटवर दोनजणं? ड्रायव्हर कोण आहे यातलं.? " कोपराने ढासून मीराने अनयला पुन्हा त्याच्या जागेवर ढकललं.

मीराने अंदाजेच पाय दिला कशावर तरी आणि गाडीने वेग घेतला. महामार्गावर मीराने प्रवेश केला आणि काय होतंय ते कळायच्या आत गाड्यांचे हॉर्न वाजायला लागले. गाडीत खळबळ माजली.

"सावकाश चालवत असशील फार मगाचसारखी. आता सगळ्यांच्या मधल्या बोटांशी सामना कर. भारतात चालवली आहे म्हणेऽऽऽ". अनयला चेव चढला.

मीराने वेग वाढविला पण हॉर्न काही थांबत नव्हते.

अचानक तेजसला शोध लागला.

"बहुधा तू सगळ्या गाड्यांच्या मध्ये येते आहेस. कारण मागे किंवा बाजूला गाडी दिसत नाहीये. पुढे बघ जी पांढरी रेषा आहे ना तिच्या वरूनच चालवतेयस तू. रेषेच्या थोडीशी उजवीकडे किंवा डावीकडे सरकव, म्हणजे बाकीच्या गाड्यांना बरं पडेल. "

गाडी डावीकडे, उजवीकडे कशी घ्यायची याची सल्लामसलत संपायच्या आतच मागून आलेली पोलिसांची गाडी पाहत मीराने आपला वेग आणखीनच वाढवला. पोलिसाला आपल्यामागून येत पुढे जायला उशीर नको हा सुज्ञ विचार त्यामागे होता. पण आता सायरनही सुरू झाला.

"कुणालातरी पकडायचं असणार रे त्याला. " तिच्या आवाजात उत्साह संचारला.

"अगं त्याची गाडी तुझ्या मागे आहे म्हणजे तुलाच पकडायचं असेल. आता बाजूला घेऊन थांबव. " आवाजात जेवढा खलनायकीपणा आणता येईल तेवढा अनयने आणला होता.

"अरे पण थांबवायची कशी? "

"ब्रेकवर पाय दे, मग थांबेल. ब्रेक आहे ना माहीत, कुठे असतो ते? "

"तुला माहीत असतं ना सगळं माझ्यापेक्षा, मग आता तूच सांग कुठे असतो ब्रेक ते. " झाकली मूठ सव्वालाखाची ठेवायचा मीराचा प्रयत्न असफल झाला.

"आयला काय कटकट आहे गं, मला नाही सुचत याक्षणी. तेजस ब्रेक कुठे असतो रे?, सांग बाबा तिला पटकन. "

मागून काहीच आवाज येत नाही म्हणून अनयने वळून पाहिलं. घामाघूम ओल्याचिंब तेजसची बोबडी वळलेली. थरथरते ओठ, काहीतरी बोलायचा प्रयत्न यात तो अडकला होता. अनयने परिस्थितीची सूत्र हातात घेतली.

"ब्रेक! ब्रेक!! गाडी थांबबायची तर ब्रेक दाबावा लागतो हे आधी तू लक्षात घे. एकदा एखादी गोष्ट डोक्यात बसली, नीट समजावून घेतली की शोधणं पण सोपं जातं. " अनयने कौन्सिलर व्हायला हवं हे आपलं म्हणणं किती खरं आहे याचा पुन्हा एकदा लग्नानंतरच्या चार महिन्यात मीराला सव्वीसाव्यांदा प्रत्यय आला होता, पण हे आत्ता सांगण्याची वेळ नव्हती. ती शांतपणे म्हणाली.

"ते कळतं मला, पण ब्रेक बिघडले आहेत नक्की. मी ब्रेकवर पाय देतेय, पण गाडीचाच वेग वाढतोय. "

"अगं बाई गाडी थांबव, आता नाही तर त्या सायरनच्या आवाजाने डोकं फुटेल. " तेजसच्या आवाजाने मीरा घाबरलीच. त्यातच बराचवेळ पायही न हालवलेल्या मीराच्या पायाला मुंग्या यायला लागल्या होत्या. खाली बघून ब्रेकच दाबतोय ना, ते बघायचं तर वरती गाडी कशी चालवणार हा प्रश्न होता.

"अरे पण ब्रेक बिघडलाय. मला नाही थांबविता येणार. "

"मी बेल्ट काढून खाली बसतो आणि हाताने ब्रेक दाबतो. " अनयने बेल्ट काढला.

"अरे पोलिस पकडेल तुला, बेल्ट काढला म्हणून. " तेजसचा गळा दाटत चालला होता.

"मला पकडायचं म्हटलं तरी गाडी थांबवावी लागेल बाबा. नाहीतर गाडी थांबवत नाहीत म्हणून झालेल्या गोळीबारात आपण सगळेच मरू. "

हळूहळू अनय सीटवरून खाली उतरला. आता मीराच्या पायाखालची उपकरणं नीट दिसत होती.

"तू दाब आता ब्रेक, बघू का दाबला जात नाहीये तो. "

जड झालेला पाय तिने कशावर तरी जोरात दाबला.

"शाब्बास मॅडम, याला ऍक्सेलेरेटर म्हणतात. तो दाबताय तुम्ही ब्रेक म्हणून. "

"मग तूच दाब ब्रेक. प्रात्यक्षिक करायला सांगतो आणीबाणीच्या वेळेलाही. " तिने अचानक मांडी घालून संप पुकारला.

"मीरा पाय खाली. काय दाबत होतीस ते दाब. " नाहीतर पोलिसाची गाडी आपल्यावर आदळेल. तेजसला हुंदके आवरत नव्हते.

अनयने खाली बसून हाताने ब्रेक दाबला. गाडी थांबल्यावर कर्कश आवाज करीत पोलिसाची गाडी मागे उभी राहिली. मीरा दार उघडून बाहेर पडणार तोच पोलिसाने तिला आतच बसण्याची विनंती केली.

"काय झालं, तुला बसायला का सांगितलं? "

मी खूप घाबरले आहे असं वाटलंय त्याला. या देशात स्त्री दाक्षिण्यं दाखवितात.

"मग स्त्री दाक्षिण्याबद्दल आभारच मानतो मी त्याचे. " अनयने खाडकन आपल्या बाजूचा दरवाजा उघडला. पोलिसाची एकदम तारांबळ उडाली या दाराकडून त्या दाराकडे पळताना.

"प्लीज सर, सिट डाउन. "

"पुरुष दाक्षिण्यंदेखील आहे या देशात. " त्याने कुत्सितपणे मान वळवून मीराला सांगितलं.

"व्हॉट सर? "

"नथिंग, नथिंग!, हाऊ कॅन यू मॅनेज टू बी कर्टीयस, बीइंग अ पोलिस? "

"व्हॉट? "

"यू आस्क्ड अस टू सिट डाउन. अँड यू आर नॉट रुड ऍट ऑल. "

"दॅट इज फॉर अवर सेफ्टी सर. सर प्लीज डोंट आस्क क्वेश्चन्स. आय विल हॅव टू गिव यू अ टीकेट"

"टीकेट? "

"कसलं तिकिट? आम्हाला कुठे जायचं नाहीये, आणि असलंच तरी स्वतःच्या गाडीतून जायला तिकिट कसलं? "

"फाईन! फाईन!! " मागून तेजस फुसफुसला.

"ओह! ओके फाईन सर, आय मीन टीकेट इज फाईन. " एवढ्या गडबडीत वाढलेल्या ब्लडप्रेशरमुळे तेजसला न्यायला आलेली ऍंब्युलन्सही तिथे हजर झाली. धडाधड काही माणसं त्यातून उतरली.

घाबरलेल्या तेजसला तिथेच स्ट्रेचरवर आडवं घातलं. आता आणखीनच घाबरून त्याने "ओके! ओके!! आय ऍम ओके!!! " चा घोशा लावला. पाणी पिऊन तो शांत झाला. पोलिस, ऍम्य्बुलन्स, सगळा ताफा निघून गेला आणि बाजूला सुळकन जाणाऱ्या गाड्यांकडे पाहत तेजसने विचारलं.

"तुम्हाला दोघांना माहीत आहे ना माझ्याकडे लर्निग लायसन्स आहे ते? "

दोघांच्या भुवया ताणल्या.

"आता मी गाडीचा ताबा घेतला तर तुमची काही हरकत? "

दोघांच्या डोळयांत साक्षात मरण दिसल्यासारखा भाव तरळला, पण तिकडे दुर्लक्ष करत तेजसने खर्र.... करीत गाडी परत मार्गावर आणली.

दोन चार वेळा एकाच ठिकाणी जाऊन आलेल्या पोलिसांनी शांतपणे कॉफीचे मग तोंडाला लावले तोच पुन्हा एकदा ९११ कडून पोलिसस्टेशनमधला फोन खणखणला....