कंटाळा

आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्यो महारिपुः । आळस हा मनुष्याचा मोठा शत्रू आहे. आळशी माणसे झोपाळू असतात आणि आळसामुळे सुस्त होतात. आळसाचेच दुसरे रुप म्हणजे कंटाळा. कंटाळा म्हणजे ऐदिपणा. एखाद माणूस कंटाळावाणा असतो म्हणजे त्याचा सहवास नकोसा वाटतो. एखादे भाषण कंटाळवाणे झाले म्हणजे ते श्रवणीय नसते. एखाद्या गोष्टीचा कंटाळा येणे म्हणजे ती गोष्ट करण्यास नकोशी वाटते. उत्साहाचा एक नंबरचा शत्रू म्हणजे कंटाळा. कंटाळा हा निराशेतूनही येऊ शकतो. अजीर्ण झाल्यास सुस्ती येते. त्यानंतर काही काम करण्याचा कंटाळा येतो. कंटाळा येणे हे एक अनारोग्याचे लक्षण असावे. कंटाळा येत असेल तर कोणताही छंद अथवा आवड जोपसता येणार नाही. संशोधन कार्यात कंटाळा येऊन चालणार नाही. उत्साही माणसाला कंटाळा शिवत नाही. कंटाळा नाही म्हणूनच जीवनात रस आहे. निसर्गाला जर कंटाळा आला तर झाडाला फळे, फुले येणार नाहीत, निसर्ग फुलणार नाही व सर्वत्र अनवस्था ओढवेल. जिथे कंटाळा आहे तिथे प्रगती खुंटलीच म्हणून समजा. म्हणून प्रगतीसाठी कंटाळा टाळा आणि कंटाळ्याला कायमचे टाळे ठोका. हे सर्व भाष्य ऐकून आपण कंटाळून गेला असाल ! तर मग हे पुढील विवेचन वाचाच.

माझा एक मित्र सदानंद उदास माझ्याकडे आला आणि म्हणाला - मला आता सगळ्या गोष्टींचा कंटाळा आला आहे. कोणत्याही कामात रस वाटत नाही. रोजचे स्नान वगैरे उशीरानेच करतो. हा कंटाळा कशाने येतो ? हा कंटाळा जाण्याकरिता काय करू ? माझी विनोदबुद्धी जागी झाली. मी त्यांना म्हणालो - अहो! तुम्हाला कंटाळा आलेला आहे ही फारच चांगली गोष्ट आहे. मोठमोठ्या थोर लोकांना कंटाळा आलेला होता. ज्ञानेश्वर माऊलींना वयाच्या २२ व्या वर्षीच कंटाळा आला होता आणि त्यांनी परतत्वात जाण्यास प्रस्थान केले. स्वामी विवेकानंदानाही असा लवकर कंटाळा आलेला होता आणि त्यांनी आपली इहलोकीची यात्रा लवकरच संपविली. आद्य शंकराचार्य यांना सुद्धा कंटाळा आला. त्यांनी अल्पवयातच इहलोक सोडला. विदर्भातील थोर संत व भक्त श्री गुलाबराव महाराज यांना सुद्धा लवकरच कंटाळा आलेला होता व त्यांनी वयाच्या ३५ व्या वर्षीच माऊलींच्या चरणी विश्रांती घेतली. बालकवी ठोंबरे हे सुद्धा असेच लवकर कंटाळले. तेव्हा कंटाळा येणे हे मोठेपणाचे लक्षण आहे. या वर सदानंद उदास म्हणाले - माझी चेष्टा करू नका. मला समजेल असे व्यवस्थित सांगा. मी म्हणालो - आयुष्यात सगळ्यांनाच केव्हा ना कमी अधिक कंटाळवाणे दिवस अनुभवायला लागतात. मग वेळ सरतासरत नाही. अशा साठी खरे तर 'डाळ तांदूळ एकत्र करून पुन्हा निवडत बसणे चांगले ! ' म्हणूनच कुणी कोडी सोडवत बसले , असेच काही ना काही 'नेम' करीत असेल तर त्याचा त्या माणसाच्या आयुष्यात काय उपयोग आहे ? सगळ्या मोठ्या माणसांना कंटाळवाण्या काळातून जावे लागलेले आहे. त्यातून चुटकी सरशी सुटकेची अपेक्षा न ठेवता हा वानवळा आपल्याला मिळण्यामागे काहीतरी उद्देश असला पाहिजे असा विचार केलेला चांगला. असह्य कंटाळा सहन करायल शिकताना स्वतःची जास्त चांगली ओळख होते आणि जगाची पण आधिक ओळख होते. एरवी लगेच आणि सदैव हालचालीत मग्न राहणारे मन मोकळे ठेवले, तर सुपीक जमीन मधून मधून पडीक ठेवल्यासारखे फायदे मिळू शकतील.

_नारायण भु. भालेराव