ज्योतिष आणि माझे प्रेमभंग

मी तसा ज्योतिष विषयावर विश्वास असणारा एक मध्यम वर्गीय माणूस. वर्गात असणाऱ्या मुली वर माझे प्रेम असल्याचा मला कथा कादंबऱ्या च्या वाचनावरून  साक्षात्कार झाला. आणि त्या हुरहुरी पायी मी आमच्याच लॉफीसमध्ये असलेल्या एका वयस्कर बॉस पण ज्योतिषाचा व्यासंग असणाऱ्या कडे माझी पत्रिका घेऊन गेलो. माझे वडील त्या काळी एक निष्णात ज्योतिषी असून ही मी एका तिऱ्हाईताकडे का गेलो हे एक उघड गुपित आहे. त्यांनी मला माझ्या आयुष्यात प्रेमभंग हा पर्मनंट योग असल्याचे सांगितले आणि मी हिरमुसला झालो. त्यांच्या भाकिताप्रमाणे त्या वेळचा प्रेमभंग मी पचवला आणि नंतर मात्र मी अंतर्मुख झालो.

माझे सर्वात प्रथम प्रेम माझ्या आईवर होते. ती खूप गरीब तितकीच मायाळू  होती. माझ्या वयाच्या ५ व्या वर्षापासून मी माझ्या तापट व जमदग्नी वडिलांपासून तिला होत असलेली शिवीगाळ व मारझोड पाहत आलो होतो पण त्याच वेळी ती प्रेमाने मला भरवत असलेले घास अजूनही मला आठवतात. मी नोकरीला लागून लग्न झाल्यावर ती आपल्या मोठ्या मुलीकडे जाण्याचा हट्ट धरून बसली आणि त्या हट्टापायी माझ्याकडून भाड्याचे पैसे घेऊन माझ्या डोक्यावर मायेचा हात फिरवून गेली तेव्हा माझा पहिला प्रेम भंग झाला. त्यानंतर माझी लहान बहीण जीच्यासोबत माझ्या थोड्या तापट स्वभावामुळे माझे नेहमी भांडण होत असे ती देखील मला सोडून जाईल असे मला कधीही वाटले नाही ती देखील मला सोडून निघून गेली तेव्हा माझा दुसरा प्रेम भंग झाला. त्या नंतर ज्योतिषा च्या भाकितानुसार माझा तिसरा प्रेमभंग झाला. मी मग माझ्या सुखी संसारात रमलो पण नंतर मला माझ्या पत्नी कडूनही लहान लहान गोष्टीवरून विरोध सुरू झाला या विरोधाचे पर्यवसान मग मोठ्या विरोधात झाले. त्यात माझी आवडती चिमुरडी मुलगी जिच्यावर मी जिवापाड प्रेम करत होतो ति देखील आईची बाजू घ्यावयास लागली तेव्हा माझे एकदम दोन प्रेमभंग झाले. मग मला नात झाली. मुलीवर राहून गेलेले प्रेम मग मी या नातीवर उधळणे सुरू केले पण ती शेवटी परकी मुलगी होती, ती देखील ज्योतिष्याच्या म्हणण्यानुसार मला दुरावेल म्हणून मग मी मायेचे पाश सोडून आणि पुढे येणारा मनस्ताप टाळण्याच्या उद्देशाने स्वतःला समाज कार्यात गुंतवण्यात सुरू केले. पण मुलगी आणि नात यांच्यापासून तुटत असताना मात्र माझ्या अंतरीच्या वेदना मला होतच राहिल्या.
इतके प्रेमभंग पचविल्यानंतर मात्र माझा ज्योतिष्यावरचा विश्वास बळावला. अगम्य गोष्टी सुद्धा आपल्या आयुष्यावर किती खोलवर परिणाम करतात याची प्रचिती यायला वयाची ६० वर्षे घालवावी लागतात यातच या अगम्य शास्त्राचे महत्त्व आहे हेच खरे.