सिनेमा आणि राजकारण

काल सी. एन. बी. लोकमत या कार्यक्रमात अवधूत गुप्ते या तरुण कलाकाराचा पडलेला चेहरा पाहिला आणि काय बोलावे हेच कळेना. किती हुरुपाने त्याने एक सिनेमा काढला. लोक सुद्धा सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत असताना निलेश राणे या दुसऱ्या त्याच पिढीच्या तरुणाने त्याची वाट लावली. निवेदक मात्र श्री अवधूत यांना हिंमत न हरण्याची व लढण्याची भाषा करीत होते. मूळ प्रश्न हा आहे की सिनेमा काढताना अवधूत यांचा उद्देश हा प्रेक्षक कसे खूश होतील व सिनेमा कसा लोकप्रिय होईल हाच असावा. त्यांना निलेश राणे कसे अपमानित होतील हे त्यांच्या गावीही नसेल. पण श्री निलेश यांनी ते आपल्या अंगावर घेऊन काय साधले हे समजत नाही. तसे पाहता सर्वच पक्ष एकाच माळेचे मणी आहेत हे निर्विवाद सत्य आहे आणि हे निलेशजींसकट सगळे जाणून आहेत. फक्त ते कमी अधिक वाईट असतील एवढाच फरक.

तेव्हा एका येऊ घातलेल्या करमणुकी पासून सामान्य प्रेक्षक मात्र काही काळासाठी मुकला एवढेच. देशात क्रांती वगैरे होऊन रामराज्य येईल याची आशा सामान्य माणसाने कधीच सोडली आहे. एकमेकांवर कुरघोड्या करून त्यातून आम्ही कसे चांगले हे सांगत असताना जे काही बरे घडते आणि सामान्य माणसाच्या पदरात पडते ते गोड मानून घेणे हेच काय ते बिचाऱ्याच्या नशिबात आहे असे म्हणून जे जे होईल ते ते पाहावे तुका म्हणे उगे राहावे हेच धोरण सामान्या माणसाने ठरविले आहे असे दिसते.
काल स. गो बर्वे यांनी १९५२ मध्ये केलेल्या पुण्याच्या आराखड्यापैकी एक तुकडा पूर्णं करण्यात पुणे महापालिकेला ५८ वर्षानंतर यश आल्याचे वाचले आणि बरे वाटले.