जानेवारी २०१०

पाव मार्काचा धडा !

एरवी उत्साहाने फसफसत शाळेतून परतणारी माझी लेक त्या दिवशी तिला घेऊन येणार्‍या वाहनामधून उतरली तेव्हाच तिच्या डोळ्यात आभाळ दाटलं होतं. ते ओळखूनच तिच्या आईने तिला उचलून जवळ घेतलं नि तोपर्यंत तिच्या डोळ्यातलं आभाळ वाहू लागलं. साथीला छातीचा भाताही वाजू लागला. तिच्या आईने थोपटतच तिला आधी शांत केलं, पण तरीही ते रोखता येणं तिच्यासाठी अशक्य बनलं होतं.
हमसून हमसून रडता रडता ती म्हणाली, 'टीचर'ने कमी मार्क दिले.
कशाबद्दल? आईचा प्रश्न.
'औ' चुकीचा लिहिला म्हणून- लेक उत्तरली. 
मग ठीक आहे. त्यात काय एवढं?
एवढं बोलेपर्यंत मायलेकी घरात पोहोचल्या होत्या. लेकीने रडत रडतच तिच्या दप्तरातून तिची 'बुक' काढली. वर्गपाठाच्या त्या वहीत शाळेत तिच्या 'टीचर' सराव घेतात. मुलांकडून हा सराव करून घेतला जातो. त्यानुसार त्या दिवशी हिंदीतली स्वराक्षरे लिहिण्याचा सराव होता.
त्यानुसार लेकीने 'अ आ इ ई.... ' अशी सगळी अक्षरे नीट लिहिली होती. पण तिच्या शिक्षिकेने तिचा दहापैकी पाव मार्क कापला होता. बाकी सगळ्यांना दहा मार्क मिळाले असताना माझ्या लेकीला मात्र  ९. ७५ मार्क्स मिळाले होते.
तिच्या आईने पाव मार्क कापण्याचं कारण काय? असं विचारल्यानंतर मुलीने तिला वही दाखवली.
हिंदीमध्ये 'औ'वरच्या दोन्ही मात्रा शेवटच्या कान्यातून निघणार्‍या असाव्यात अशी तिच्या शिक्षिकेची अपेक्षा होती. पण घरी अभ्यास घेताना आपण मराठीत लिहितो, त्याप्रमाणे लेकीने 'अ'च्या दांडीतून एक आणि दुसर्‍या कानातून एक अशा दोन मात्रा दिल्या होत्या. पण त्या चुकीच्या असे सांगून तिच्या शिक्षिकेने हा पाव मार्क कापला. त्यांच्या मते दोन्ही मात्र शेवटच्या कान्यातूनच वर जायला हव्यात.

कशीबशी समजूत घालून नि तिचं लक्ष दुसरीकडे वेधून तिचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न तिच्या आईने केला. चार तासांनंतर मी घरी आल्यानंतर त्या पाव मार्काचे माझ्या पुढेही आवर्तन झाले. तोपर्यंत ते तिच्या डोक्यात धुमसत होतेच.

'औ'ची मात्रा पहिल्या काय किंवा शेवटच्या काय कुठल्याही कान्यातून निघाल्याने अक्षराचा, शब्दाचा अर्थ बदलला नक्कीच नसता. पण अचूकतेच्या नादात किंवा ती चूक मार्कांतून दाखविण्याच्या नादात त्या कोवळ्या मनावर किती परिणाम झाला या भावनेनेच मी हेलावलो. दहापैकी पाव मार्क मिळाला नाही आणि इतरांना तो मिळाला याचं दुःख तिला सहन होत नव्हतं. वास्तविक तिला अमुक मार्क्स मिळावेत या अट्टहासाचे आम्ही नव्हतो नि नाहीत. पण स्पर्धेचा भाव तिच्या मनात मात्र नक्कीच होता. व्यवस्थेने चार वर्षाच्या वयातच तिच्यात निर्माण केला होता.

ज्युनियर केजीमध्ये जाणार्‍या माझ्या मुलीला कमी मार्क मिळाल्याचे दुःख नि त्यामुळे येणारा ताण एवढा असेल तर गेल्या काही दिवसांत आत्महत्या केलेल्या त्या उमलत्या कळ्यांवरचा ताण किती असेल याची कल्पनाच केलेली बरी. तो सहन न झाल्यामुळे या कळ्या फुलण्याच्या मार्गावर असतानाच कोमेजल्या. हुशारी मोजण्याची मार्काधारीत मोजपट्टी या ताणाला जन्म घालते. ही पद्धती बदलून एखाद्याची सृजनशीलता, हुशारी मोजण्याचा नवा निकष आपण तयार करू शकणार नाही काय? या मुलांना आपण असेच ताणाखाली राहायला लावणार काय? शिक्षण हे पुढच्या जीवनाला आधार देणारे, बळ देणारे असावे ते बलहीन करणारे नसावे यासाठी काय करता येईल? हे आणि असंख्य विचार आमच्या डोक्यात पिंगा घालू लागले.

तिकडे आई-बाबांपाशी रिती होऊन माझी मुलगी झोपी गेली पण, तिचा तो पाव मार्काचा धडा आम्हाला मात्र खूप काही शिकवून गेला...Post to Feedअवघड आहे
सहमत
रैट रेस !!
अ'च्या दांडीतून एक आणि दुसर्‍या कानातून एक
मलाही
मराठी आणि हिंदीतला औ सारखाच.
'तोत्तो च्यान'
समाजाच्या विचाराधीन असायला हवा.
हयाचे उत्तर मात्र राज्यकर्तेच देऊ शकतील ?
लेख आवडला
दोष पोटभरू शिक्षिकेचा .....
जग खूप मोठं आहे!
सुरुवात कोण करणार?
सुरुवात तर झालीये...
नविन पिढि
वाईट वाटून घेऊ नका..

Typing help hide