फणसाचे लोणचे

  • मेथी ५० ग्रॅ.
  • मोहरीचे तेल
  • ओवा ५० ग्रॅ.
  • कलौंजी (कांद्याचे बी) ५० ग्रॅ.
  • हिंग ५० ग्रॅ.
  • हळद ५० ग्रॅ.
  • तिखट ५० ग्रॅ.
  • बडीशेप ५० ग्रॅ.
  • मीठ ५० ग्रॅ.
  • आणि फणस
६ तास
२ किलो लोणचे होईल. वाटल्यास पुरवून पुरवून खा. एका जणाकडून महिन्याभरातच फडशा पडू शकतो.

पूर्वतयारी
एखाद्या नुकत्याच वयात आलेल्या किंवा सुकुमार आठळ्यांच्या फणसाचे अर्ध्या बोटाएवढे तुकडे  करून उकळत्या पाण्यात टाकावे. एक वाफ काढा. त्यानंतर चाळणीतून फणस चाळून घ्यावा आणि दिवसभर उन्हात सुकवावा. त्यानंतर मेथी, बडीशेपची पूड बनवा.

कृती
आता कढईत १ लिटर मोहरीचे तेल चांगले कढवून थंड होऊ द्यावे. त्यात मेथी व बडीशेपेच्या ताज्या पुडीसहित सगळा मसाला  व फणसाचे तुकडे टाकावे. काचेच्या बरणीत लोणचे काढून ती बरणी उन्हात ठेवा. चांगले १० दिवस उन्हात काढले की  लोणचे अगदी तयार.

लोणचे खराब होऊ नये म्हणून सोडियम बेनज़ोएट वापरतात.  शेवटी स्वादा-सुगंधासाठी लवंग व दालचिनी ह्यांची भुकटी वरून घालावी. मसाला जास्त झाल्यास शिजवलेले फणसाचे तुकडे वरून टाकावे. फणसाचे तुकडे करण्याआधी हाताला तेल चोपडून घ्या.

फणसाच्या ह्या लोणच्यापुढे मटणाची सागुती किंवा मटणाचे लोणचे झक मारते. 

मातोश्री