प, प, पेनातला ...

हल्ली नाऽऽ.. कागदावर लिहायची अशी वेळ फारशी येतच नाही खरी.. ईमेल, एस. एम. एस. वगैरेंमुळे टंकायलाच जास्त लागतं..

परवा असाच कुठलातरी नंबर टिपून घ्यायला पेन स्टॅंड मधलं पेन उचललं, त्यानी असेच एक दोन वाळके फरकाटे उमटवून झाल्यावर त्यात शाई नसल्याचा साक्षात्कार होऊन त्याच्याच बाजूचं दुसरं पेन घेतलं तर त्यानेही ताबडतोब असहकार पुकारला..

आणि एकामागोमाग एक अशी असंतोषाची चळवळच मला सामोरी आली.. पॉईंट फाईव नावाच्या प्रकारातील आतील शिसे ही संपली होती.. सगळ्यात शेवटी निळी काळी आणि लाल अशा तीन कांडी एकदम बसवलेल्या आणि वरील खटका वापरून त्यातील एका वेळी एकच कांडी बाहेर येणाऱ्या अश्या जाड-जूड पेनातील लाल शाईने साथ दिली आणि नंबर उतरवला..

त्यानंतर ताबडतोब मी पेन स्टॅंड साफ करायला घेतला. आत जवळ जवळ पाच ते सात न चालणारी पेनं आणि दोन चार टोके मोडलेल्या पेन्सिली आणि बाहेरून धुळीचे पातळसे आवरण बसून त्याची रयाच गेली होती.. निम्म्या पेनांची टोपणे कोठेतरी हरवली किंवा मोडलेली.. उरलेल्यात आत रिफीलच नाही अश्या सगळ्यांची उचलबांगडी करून दोन नीट चालणारी पेने आणि पेन्सिली आत ठेवल्या.

हा पेन स्टॅंड मला शाळेत असताना बक्षीस म्हणून मिळाला होता त्यावेळी त्याची शान काय वर्णावी.. हल्लीच्या शाळेत बालवाडीत काय वापरतात याची पुसटशी ही कल्पना सध्या नाही पण माझ्या वेळी दगडी पाटी आणि रूळाची पेन्सिल असायची.. आणि लिहून झालेले पुसायला स्प्ंज ची डबी.. तो रूळ न फुटता लिहायला छान वाटायचे. त्यात रंगीत रूळ मिळाले तर फारच मजा यायची.. शुद्ध लेखन स्पर्धेत रूळ स्पंजातल्या पाण्याने भिजवून वळणदार अक्षरे घोटायचे सगळे.

नंतर आल्या पेन्सिली.. पन त्यावेळी पॉईंट फाईव्ह नसायची.. त्यातल्या त्यात "नटराज" ची लाल पेन्सिल आठवते? ती एकदम फेमस झाली होती आणि त्यासोबत टोकयंत्र..   माझ्या वर्ग-मैत्रिणींप्रमाणेच मी ही टोक करताना जमलेली कलाकुसर नीट कुठेतरी साठवून ठेवलेली आहे.. आणि घर आवरताना ही काय घाण साचली आहे म्हणून ती कोणाकडूनही फेकून दिली गेल्यानंतर सोन्या-मोत्यांचे दागिने हरवल्यासारखी उदास पण झालेली आहे.. खोडरबराचेही अनेक प्रकार आठवतात. सेंटेड, पांढरी शुभ्र, रंगीत..

त्यावेळी शाईपेन वापरायची काय हौस होती म्हणून सांगू.. पाचवीनंतर ते आम्हाला वापरायची परवानगी होती.. ती "कॅमलिन" ची शाईची दौत आठवतेय? आणि शेजारी उभा असलेला ड्रॉपर? त्यानी ती शाई भरायचे केलेले उद्योग म्हणजे हात निळे करून मिळण्याची हमीच असायची.. आणि पेनाचं नीफ ही साफ करावं लागायचं.. कधी कधी आवडत्या पेनाचं नीफ तुटलं की अक्षर काही केल्या नीट यायचं नाही.. नव्या नीफची सवय होईपर्यंत..

पण या सर्वाला फाटा मिळाला तो पुढे "हीरो" च्या पेनाने.. काळं पेन आणि त्याला असलेलं सोनेरी टोपण.. काय पण हवा होती त्या वेळी त्या पेनाची... त्यात पांढरा, हिरवा असे दोन तीन रंग होते पण टोपण मात्र सोनेरीच.. ते नावाप्रमाणेच हीरो होतं.. कधी गळायचं नाही, ड्रॉपर ची कटकट नाही, नीफ तुटायचे चान्सेस फारच कमी.. त्यातून शाई ही ओघवती बाहेर यायची आणि शुभ्र कागदावर मोत्यांची अक्षरे उमटायची.. मी तर त्याच्या तुफानी प्रेमात होते.. कधी त्यात शाई भरलेली नसेल तर मला अगदी चुकल्याचुकल्या सारखे वाटायचे. नंतर मग मार्बल चं आणि डिसाईन असलेलं हीरो पेन मिळायचं.. ते ही फारच सुबक होतं..

त्यावेळी बॉलपेनची ही क्रांती झालेली होती.. सगळ्यात पोप्युलर बॉलपेन म्हणजे " रेनॉल्डस".. पांढरं पेन आणि निळं किंवा काळं टोपण.. ते ही सगळ्यानी उचलून धरलं होतं..

त्याच काळात "पायलट" पेन म्हणून बॉलपेन सारखं चालणारं पण शाईपेनासारखं उठणारं असं हायब्रीड पेन फारच फेमस होऊ घातलं होतं.. तत्कालीन श्रीमंत मुलामुलींकडे ते दिसायचं.. संपूर्ण पांढरं अंग आणि आतील शाईप्रमाणे टोपणावर निळा अथवा काळा गोल असं त्याचं डिसाईन होतं.. नंतरही अनेक पेनं आली आणि गेली पण लिहीणार्यांच्या मनावर अनेक वर्षे वरील समस्त मंडळीनीच साम्राज्य गाजवलं खरं....

टाक बोरू यानीही लिहायचा निष्फळ प्रयत्न मी करून पाहिला होता.. फारच कष्टदायी अनुभव..

कधी अशी वेळ होती की शाळेत असताना कधी एकदा पेनाने लिहायला मिळते याची उत्सुकता होती.. पेन्सिल नि लिहून लिहून कंटाळा आला होता. आज अशी वेळ आहे की सुंदर सुंदर पेनं पडून आहेत आणि लिहायलाच मुहूर्त लागत नाही.. कालौघ.. शब्द गंभीर आहे ना पण कालाचे सामर्थ्य खूप आहे.

कधी एके काळी हिंदूंच्या विहीरीत ब्रेड टाकला की बाटले असं म्हणायचे.. आज प्रत्येक हिंदू घरात ब्रेड किती चवीने खाल्ला जातो..

कधी काळी ज्ञानेश्वर महाराज व भावंडांच्या मुंजी होत नाहीत म्हणून दुःखी कष्टी होऊन विठ्ठलरावानी सपत्नीक देहान्त प्रायश्चित्त घेतलं.. आज अनेक हिंदू ब्राम्हण लोकानी आमचा देवावर विश्वास नाही म्हणून आम्हाला मुंजी करायच्या नाहीत असे म्हणून मुलांच्या मुंजी केल्या नाहीत आणि तरीही आनंदातिरेकात कालक्रमणा करत आहेत...

गोष्ट एकच पण कालानुरूप किती तफावत..

छोट्याश्या पेन स्टॅंड ने इतके विचार मंथन होईल असे वाटले नव्हते  .. तरी हा लेख प्रपंच...