व्हर्च्युअल रिऍलिटी

सर्च: 'आभास' + मैत्र =
काही चॅट्स (आणि मेल्स)
काही अटॅचमेंटसह,
अनंत ओळींची मोजणी.
सिलेक्ट ऑल... म्यूट,
(ताजेतवानेपणा
स्क्रीनचा, स्क्रीनचाच...)
अदृष्याचा "आभास"!
दीर्घ संवाद, एकाच कमांडमुळं,
'म्यूट'ल्याच्या आभासातून
वास्तवात आणणारी
एक बदललेली प्रतिमा;
काचेमागच्या पार्‍यानेच
स्थिरावत पुढं आणलेली!!
---
संवाद अन् सुसंगती,
बोल आणि भांडणे...
वाद अन् विसंगती,
बडबड आणि मोजणे...
प्रतिवाद अन् युक्तिवाद,
स्पष्टता आणि हसणे...
संताप अन् अबोला,
हताशा आणि समजावणे...
खुलासे अन् सबबी,
आर्तता आणि खचणे...
केवळ
आभास आणि वास्तव
---
फिर्यादी, तपासी,
अभियोक्ता,
अन् न्यायाधिशाचीही भूमिका
एकाकी वठवत
"आरोप सिद्ध, सजा,"चा
निकाली पुकारा.
एण्टर... @मेल.कॉम,
सर्च: is:muted =
आभासी "अस्तित्त्व"
अन्,
अस्तित्त्वाचे वास्तव -
पार्‍यानेच परतवलेल्या
प्रतिबिंबातून टोचत येणार्‍या
केवळ प्रतिमेचे!!!