विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन

गेल्या अनेक दिवसांमधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या दुर्दैवी बातम्या पाहता ह्या कोवळ्या वयातील विद्यार्थ्यांत सकारात्मक दृष्टिकोन कसा निर्माण होईल व वाढेल ह्याविषयी चर्चा झाल्यास त्यातून चांगले उपाय, विचार निष्पन्न होतील असे वाटते. इतर वाचकांनाही आवाहन, की त्यांनी ह्या संदर्भातील आपली मते जरूर नोंदवावीत.

विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन वाढविण्यासाठी काही गोष्टींची पूर्तता आवश्यक वाटते. आपल्या पाल्याला ह्या गोष्टी मिळत आहेत ना, ह्याची शहानिशा करण्याची जबाबदारी अखेर पालकांचीच व काही अंशी शिक्षकांची! त्यातील, मुलांमध्ये सकारात्मक मानसिकता निर्माण होणे व ती टिकविणे ह्यासाठी सुचणाऱ्या गोष्टी ह्या अशा :

१. सुयोग्य, पोषक, संतुलित, वक्तशीर आहार व व्यायाम (मैदानी खेळ, सूर्यनमस्कार, योगासने, कराटे/ ताएक्वोंदो इत्यादी)
२. पुरेशी झोप
३. दिवसातील काही काळ तरी मोकळ्या हवेत, निसर्गाच्या समवेत वावर
४. अतिरिक्त टी. व्ही. / व्हिडियो गेम्स/ संगणक वापरावर निर्बंध
५. मुलांशी त्यांच्या दिनक्रमाविषयी, त्यांना सतावणाऱ्या प्रश्नांविषयी खुली चर्चा, त्यांच्यासमवेत हास्यविनोद
६. उत्तमोत्तम व्यक्तिमत्वांचे आदर्श
७. मुलांना वेगळे छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन.
८. फक्त स्पर्धात्मकतेवर भर देण्याऐवजी आपल्या मुलाची क्षमता ओळखून त्याला त्याप्रमाणे मार्गदर्शन
९. शाळेतील शिक्षकांशी पालकांचा नियमित संपर्क व संवाद.
१०. दिनक्रमात उत्तम दर्जाच्या संगीताची साथ
११. मुलांना आयुष्य सुंदर आहे, आपला जीव अनमोल आहे, रागावणारे - ओरडणारे लोक आपल्याच भल्यासाठी तसे वागतात ह्याची जाणीव करून देणे.

काही खबरदारी घेण्यासारख्या गोष्टी :

१. घरात वादावादी, बेबनाव झाले तरी ते मिटतात, किंवा त्यातून बाहेर पडता येते ह्याची मुलांना जाणीव करून देणे.
२. बाहेरच्या जगात वावरताना कसे वावरावे ह्याचे मार्गदर्शन व त्याविषयी मुलांशी चर्चा.
३. अपयश पचविण्यास, त्यातून बाहेर पडण्यास मुलांना मार्गदर्शन.
४. मुलांना भरपूर मित्र-मैत्रिणी, साथी - सवंगडी बनविण्यासाठी उत्तेजन. 

ह्याखेरीज अन्य उपाय सुचत असतील तर ते अवश्य कळवावेत. तसेच वर सुचविलेल्या उपायांवर काही भाष्य करावयाचे असल्यासही स्वागत! अर्थात त्यातून सकारात्मकता कशी वाढेल किंवा जोपासली जाईल व मुले निराशेला बळी पडणार नाहीत यावर संवाद घडण्याची आशा आहे.

धन्यवाद!

-- अरुंधती कुलकर्णी

दुवा क्र. १