सुटका (एक छोटीशी गोष्ट)

तो उठला, पंख झटकले, आपलं घरटं आणि त्या सभोवतालची ती दाट जंगलातली तुटकी-पडकी विहीर बघत बघत, थोडासा आळस देत तो बाहेर पडला.
सकाळी सकाळी सुंदर सोनेरी कोवळ्या उन्हाची तिरीप अंगावर घेत प्रसन्नतेने तो उडू लागला.
स्वतःच्या लाल चुटुक ओठ, हिरवे गार पंख, दिमाखदार तोरा आणि एकूणच समग्र सृष्टीत नावाजलं जाणारं रुपडं घेऊन,
आपल्याच आनंदात स्वच्छंदात गाणी गुणगुणत तो जंगलातून आला बाहेर आणि समोरच्या शेतावर झेपावू लागला.
त्याला मोठीच मौज वाटत होती. इतक्या उंचावरून माणसही मुंगीइतकी छोटिशी दिसत होती.
अरेच्च्या, पण हे मागून,....
कुणीतरी येतंय. मला वाटलं त्या धवल-पक्ष्याच्या येण्यानं हालणारी ती हवा असेल. पण... वास तर शिकारी पक्ष्याचा आहे. "
त्यानं वळून पाह्यलं. हा तर खासा ससाणा! ह्याच्याच पिच्छ्यावर असणारा. तो वेगाने इकडेच येत होता.
पण... हा इकडे कसा? ह्या जंगलाच्या परिसरात, आत-बाहेर, शेतापाशी कोण-कोण आहे कुणाचा नेम आपल्यावर आहे ह्याचा
पोपटाला चांगलाच अंदाज होता. आजवर हा होता कुठे? आला कुठून?
आता आणखी किती दिवस ह्याच जंगलात हा फिरणारे कुणास ठाऊक?
ह्या शंका पोपटाच्या मनात क्षणभरात येऊन गेल्या. पोपटाला काहीच कळेना.
हा ससाणा तो आज प्रथमच ह्या भूभागात पाहत होता.
पण आता विचार करत बसून उपयोग नव्हता. सुटायचं होतं. त्यासाठी उडत सुटायचं होतं. वेगानं उडायचं होतं.
त्यानं जीव एकवटून उडायला सुरुवात केली. वेगानं उडणं सुरू झालं. दिशा बदलून, चकवा देऊन पाह्यलं.

पण हा ससाणाही भलताच चपळ होता. अंतर कमी कमी करत तो अगदी जवळ पोचला, अगदी पंखभर अंतरावर त्याची चोच होती.
पोपटापासून. आणि एवढ्यात...
एवढ्यात पोपट घुसला जंगलात. घनदाट, दिन-काळोखी असणाऱ्या जंगलात; निबिड वनात तो शिरला. जंगल त्याच्या ओळखीचं, जणू त्याचं दुसरं, मोठ्या रूपातलं घरटंच होतं.
इथल्या दाट वनातल्या वाटा ससाण्याला नव्हत्या माहीत. पण पोपट सफाईनं इथनं अंग चोरून उडू शकत होता.
पोपट शिताफीनं सटकला, झाडातून, फांद्यांतून मिळणाऱ्या फटीतून त्यानं अंग चोरून वाट काढून घेतली.
आणि तो ढोला, अवजड, आकारानं फताडा ससाणा मात्र वाट चाचपडत बसला. आणि तशातच एका फांदीवर आपटून जखमी झाला. पोपट झाला दृष्टी आड. आणि इथं तर उलट परत जायचे वांधे झाले ससाण्याचे आता वाट शोधत बसताना.
इकडे पोपट पोचला बरोबर त्या पडक्या विहिरी पासच्या झाडावरल्या आपल्या घरट्यात.
ह्या दगदगीनं थकला होता तो आता, शारीरिक आणि मानसिकही. इतका की स्वतःला डुलकी कधी लागली,
हे ही त्याला कळलं नाही. आणि स्वप्नात होतं त्याच्या एक शेत, हिरवं गार शेत, शिकारी-ससाणारहित शेत,
माणूस नामक अन्नात आडकाठी करणाऱ्या फडतूस प्राण्यारहित शेत. डाळिंबानं भरलेलं शेत. पेरूनं मढलेलं शेत.
नंतर हळूच कधीतरी त्याचे डोळे उघडले. पोटात अन्नाचा कण नाही. भूक अख्खं शरीर जाळू लागलेली.
बहुदा अती थकव्यानं तो दीर्घकाळ झोपूनच होता. दोन-तीन सूर्य तरी उजाडून गेले असावेत झोपेदरम्यानच्या काळात.
विश्रांती झाल्यानं आता किंचित बरं वाटत होतं; भीतीचं दडपण कमी झालं होतं. अंग हलका वाटत होतं.
तो उठला आणि विहीर ओलांडून पुन्हा शेताच्या दिशेला वळणार इतक्यात............

इतक्यात बाजूलाच त्यानं पाहिलं.... तीच... तीच ती त्या दिवशीची भेदक नजर त्याचा वेध घेत होती.
ह्यानं नुकतंच जंगल ओलांडून शेताच्या हद्दीत प्रवेश केलाच होता; तेव्हढ्यात त्याला हे दिसलं.
ससाण्याला सुगावा लागला असावा; जंगलात राहणाऱ्या पोपटाचा. जंगलाच्या बाहेरच तो लक्ष ठेवून होता.
पुन्हा तेच.....
तीच धावपळ..... जीवघेणा पाठलाग.......
ससाण्यानं ह्यावेळेस तर जवळ जवळ धरलंच होतं त्याला.....
पण पुन्हा एकदा पोपट जंगलात शिरून, दाट वाटांतून पसार.
पुन्हा एक लांब झोप.
पुन्हा एक स्वप्न... सुखाचं स्वप्न... विनासायास मिळणाऱ्या मस्त आयुष्याचं स्वप्न.
पुन्हा दोन-चार सूर्यांनंतर तो उठला आणि यावेळेस तो विहिबाहेर पडायचा अवकाशच होता की...
ससाण्याच्या नजरेने त्याचा वेध घेतला... ससाणा वेगानं त्याच्याकडे झेपावला.
म्हणजे दर दिवसागणिक ससाणा त्या पोपटाच्या निवासाच्या अधिकाधिक जवळ येत होता तर.
आणि आता तर चक्क त्या विहिरीपर्यंत तो पोचला! पोपटाचं निवास असुरक्षित झालं.
पण आता? आता काय? पोपट विचार करत होता.
जीवाच्या आकांतानं उडतही होता. इथून तर आता जावं लागणार.
पण नवीन जागाही हा ससाणा शोधणारच. मग? पुन्हा पाठलाग....

जगायची स्पर्धा.... अफाट संघर्ष...... तो ह्याला कंटाळत चालला होता...
रोज उडण्याचे कष्ट त्याला फार वाटू लागले. त्यापेक्षा एखादी सुरक्षित, जिथं फार कष्ट करायची गरज नाही,
अशी जागा त्याला हवी होती. "

आणि इतक्यात....
इतक्यात खालून जाणारा एक माणूस दिसला; हातात काही तरी घेऊन....
ह्याआधीही आपले बांधव त्यानं नेलेत त्या पिंजऱ्यात....
हो. पिंजरा होता त्याच्या हातात.....
मोकळा, सताड उघडा आणि रिकामा पिंजरा.

पोपटाला सुटकेचा मार्ग मिळाला. त्यानं झटकन खली जाऊन पिंजऱ्याच्या अरुंद दारातून आत प्रवेश केला.
पाठोपाठ ससाणाही शिरायचा प्रयत्न करू लागला, पण हाय रे दैवा.
ससाणा त्याच्या मोठ्या आकारामुळं शिरू शकेना आणि म्हणून तत्काळ माघारीही फिरला.
आणि आपल्या डोकेबाजपणावर बेहद्द खुश होऊन तो पिंजऱ्यातला पोपट (स्वतःशीच) म्हणाला
"हुश्श..... झाली बुवा एकदाची सुटका!!!! "