अतिक्रमणांची अंत्ययात्रा

सकाळची वेळ. मी निवांतपणे वर्तमानपत्र हवे तसे पसरून वाचण्यात गर्क. अचानक ठाकाठोकीचे आवाज सुरू होतात. ह्या जागेत आल्यापासून ते आम्हाला आता सवयीचे झालेत. शेजारचे इमारतीचे बांधकाम, वरच्या मजल्यावरच्या दुरुस्त्या, त्यांचे संपते न संपते तोच समोरच्या सदनिकेत रंगकाम, दुरुस्ती इत्यादी इत्यादी. पण ही ठाकाठोक तळमजल्यावरून ऐकू येत होती. आमच्या इमारतीच्या तळमजल्यावर एक भलेमोठे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे दालन आहे. त्या दालन-मालकानेच आमच्या शेजारील पहिल्या माळ्यावरची सदनिका विकत घेऊन खालच्या मजल्यावरून (त्याच्या दालनातून) वरच्या सदनिकेत येण्यासाठी (अनधिकृत) अंतर्गत जिना काढला आहे. 

त्यामुळे हा आता नवीन काय करतो, म्हणून किंचित चिंतित मनाने मी खालच्या मजल्यावर डोकावले.

समोर दिसणारे दृश्य बऱ्याचशा दुकानजागांच्या बाबतीत नेहमी आढळणारे होते.

दुकानाचा प्रवेश इमारतीच्या आतील भागातून असूनही केवळ 'रोड फ्रंटेज' चा फायदा हातचा जाऊ द्यायचा नाही म्हणून दुकान-मालकाने रस्त्याच्या बाजूला ग्रॅनाईट मार्बल ओटा व पायऱ्या बांधणे सुरू केले होते. त्यासाठी त्या बाजूला रस्त्याकडे उघडणारे काचेचे दार आधीच बसलेले होते. दोन मजूर त्या पायऱ्यांच्या कामात गुंतले होते, बाजूला घमेली - फावडी - ओले सिमेंट वगैरे पसरलेले व त्यांच्यावर नजर ठेवत दुकानमालकाचा तरुण मुलगा उभा होता.

अर्थात हे सर्व बांधकाम बेकायदेशीर होते हे उघड आहे. गेल्या वर्षी त्या दुकानमालकाचे अगदी अस्सेच बांधकाम पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तोडून - फोडून काढले होते. त्या अजस्त्र मशीनच्या धडकांनी सगळी इमारत हादरत होती नुसती! राडारोडा पडला होता तो वेगळाच!
पण जेमतेम एक वर्ष उलटून जाते न जाते तोच पुन्हा दुसऱ्यांदा अगदी तस्सेच अतिक्रमण करायला हे दुकानदार महाशय तय्यार!
वर पुन्हा टिप्पणी : समद्यांचे हप्ते वेळेवर पोचवलेत ह्या खेपेस. कोणी येणार न्हाय तपासायला.... समदं स्येटिंग करून ठेवलं हाय... गेल्या खेपेसारखं व्हणार न्हाय!

आणि तो काही ह्या सर्व प्रकारात एकटा नाही! समोरचे अजून एक भव्य दालन, कोपऱ्यावरचा हॉटेलवाला.... अतिक्रमण तर त्यांनीही केलं आहे रस्त्यावर! दर महिन्याला महापालिकेत, पोलिसांना हप्ता पोचवला की झाले ह्यांचे काम! बरं, स्थानिक राजकीय पुढाऱ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवून असतात ही मंडळी! आणि त्यातून जर अतिक्रमणविरोधी आले तर होईल ते थोडेफार नुकसान सोसायचे, दंड भरायचा, थोडे थांबायचे आणि पुन्हा बेकायदेशीर बांधकामास सुरुवात!

आता त्या पायऱ्यांवर बसायला रात्री अजून टोळभैरव येणार! चकाट्या पिटणार. रात्रीतून कोणी दारुडा त्यावर मुक्काम ठोकणार! किंवा भटकी कुत्री
तिथं जमा होणार! महापालिकेत तक्रार केली तरी ह्या लोकांची 'सेटिंग्ज' आहेत. कोणाला पैसे चारायचे, कोणाला खंबा नेऊन द्यायचा, कोणाचे इतर लाड पुरवायचे हे ह्या दुकानदारांना चांगले ठाऊक आहे.

आणि मग आमच्यासारख्यांनी काय करायचे? दरवेळी ह्यांची अतिक्रमणे तोडताना - फोडताना इमारतीला बसणारे हादरे - धक्के सहन करायचे? त्यांच्या विरोधात तक्रार करूनही कोणीही त्याची दखल घेत नाही हे पाहायचे? की अजून काही? ह्याला काही उपाय आहे काय? तीनपेक्षा जास्त वेळा एखाद्या दुकानदाराने अतिक्रमण केलेले आढळले तर त्याचा दुकान परवाना कायमस्वरूपी रद्द करणे अशा तऱ्हेची काही तजवीज आहे काय?  ह्या अतिक्रमणांची अंत्ययात्रा कशी बरे काढावी?     

-- अरुंधती कुलकर्णी

Sing, Dance, Meditate, Celebrate!
दुवा क्र. १