मिलीभगत?

आजकाल उठसुट "अमुक कलाकाराविरोधात/ चित्रपटाविरोधात  निदर्शन", "अमुक चित्रपटाचा खेळ बंद पाडला", "अमुक चित्रपटाच्या प्रदर्शनास स्थगिती", "अमुक चित्रपटातील संवादांना/दृश्यांना कात्री लावण्याची जोरदार मागणी", "चित्रपटाच्या शीर्षकास अमुक संघटने ने आक्षेप घेतला. शीर्षक बदलण्याची जोरदार मागणी"  अश्या बातम्या वाचायला व ऐकायला मिळत आहेत. "सरकार", "झेंडा", "शिक्षणाच्या आयचा घो", "लंगडं मारतंय तंगडं", "माय नेम इज खान", "तारें जमीन पर", "थ्री इडियटस" हे व असे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच असे मुद्दे कसे उफाळून वर येतात? ते आपणहून येतात की मुद्दाम आणले जातात?

मला तर असे वाटते की "निगटिव्ह पब्लिसिटी" चे हे एक तंत्र आहे. जेणेकरून चित्रपटाची जास्तीत जास्त हवा निर्माण व्हावी आणि बघण्या सारखे विशेष काही नसले तरी उत्सुकतेपोटी प्रेक्षकांनी तो पहायला गर्दी करावी.

"झेंडा" मध्ये म्हणे एका व्यक्तिरेखेचे नारायण राणेंशी साधर्म्य दाखवल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्या विरोधात आंदोलन केले. (विविध वाहिन्यांवर जेव्हा पुरस्कार सोहळे दाखविले जातात तेव्हा कितीतरी वेळा कित्येक राजकारणी लोकांची नक्कल केली जाते. त्याला कधी कोणी आक्षेप घेतल्याचे व तो पुरस्कार सोहळा बंद पाडल्याचे ऐकीवात नाही. नेमके चित्रपटांनाच कसे लक्ष्य बनवले जाते? )

"शिक्षणाच्या आयचा घो" या शीर्षकामुळे म्हणे लोकांच्या भावना दुखावल्या कारण हे शीर्षक शिवीवाचक आहे. (दादा कोंडके यांनी जन्मभर वाह्यात शिव्या असलेले संवाद अनेक चित्रपटांमधून म्हटले. तेव्हा त्या काळी त्या दृश्यांना कात्री लावली जावी म्हणून एखाद्या संघटने ने आंदोलन केल्याचे ऐकीवात नाही. )

"लंगडं मारतंय तंगडं" या शीर्षकामुळे म्हणे अपंग लोकांच्या भावना दुखावल्या कारण हे शीर्षक व्यंगवाचक आहे. ("आंधळा मारतोय डोळा" असा एक जुना चित्रपट असल्याचे आठवतेय. तेव्हा असे काही झाले होते का? )

अशी बरीच लांब यादी देता येईल. खरे पाहता कधी कधी चित्रपटाच्या कथेमध्ये काहीच दम नसतो. परंतु सामान्य प्रेक्षकांना मूर्ख बनवण्याच्या कित्येक क्लृप्त्या आजकाल हे निर्माते वापरताना दिसतात. चित्रपटांना उठाव मिळावा म्हणून हे सारे मुद्दाम घडवून आणले जात असेल का?

एखाद्या संघटने बरोबर निर्मात्याने हातमिळवणी करायची. त्यांच्या कार्यकर्त्यांना निषेध वगैरे करायला लावयचा. त्या संघटने ने मग त्या संबंधित निर्मात्याला किवा कलाकाराला माफी मागायला भाग पाडायचे आणि मगच त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट मोकळी करायची. हे म्हणजे "तू मला मारल्या सारखे कर. मी ओरडल्यासारखे करतो" असा प्रकार झाला. यात दोघांचाही फायदा! संघटने ला फुकटची प्रसिद्धी आणि चित्रपटाला उठाव मिळाल्यामुळे व एरवी चित्रपटाने जितका धंदा केला नसता तितका झाल्यामुळे निर्मात्याचे उखळ पांढरे !

(मनसे चा उदय झाल्यापासून शिवसेनेची चलती कमी झाल्यामुळे की काय अश्या प्रकारच्या उपक्रमांमध्ये हल्ली शिवसेना आघाडीवर दिसते. सतत चर्चेत राहण्यासाठी असे उपक्रम मुद्दाम घडवून आणले जात असावेत अशी दाट शंका वाटते.)

मनोगतींची या विषयावरील मते जाणून घ्यायला आवडेल. त्याचप्रमाणे मी दिलेल्या उदाहरणांव्यतिरिक्त तुम्हाला असे अजून काही चित्रपट आठवत असतील तर त्यांच्याशी संबंधित किश्श्यांसकट नोंदवावेत ही विनंती.