तांदुळाच्या पिठाचे धिरडे

  • तांदुळाचे पीठ ४ ते ५ डाव
  • चवीपुरते मीठ
  • तेल
  • पाणी ३-४ ग्लास
१० मिनिटे
२ जण

 तांदुळाच्या पिठात चवीपुरते मीठ घालून पीठ पातळ भिजवा. गुठळी होऊन देऊ नका. पीठ आमटीसारखे पातळ भिजवा. नंतर मध्यम आचेवर तवा तापत ठेवा. तो जरूरीपुरता तापला की त्यावर चमच्याने तेल घाला व कालथ्याने तेल तवाभर पसरवून घ्या. आता तांदुळाच्या पिठाचे धिरडे तव्यावर घाला. हे पीठ डावेने वरून घालावे. पीठ सैल असल्याने ते आपोआप जितके पसरेल तितकेच पसरू दे. हे पीठ तव्यावर घातल्यावर डावेने पसरू नये. डावेला ते चिकटते. काही सेकंदाने धिरड्यावर व धिरड्याच्या सर्व बाजूने तेल सोडा व काही वेळाने धिरडे कालथ्याने उलटा. उलटल्यावर परत एकदा तेल घालून मग ते तव्यावरून काढा. हे पीठ पातळ असल्याने तव्यावर पसरून त्याला जाळी पडते. दुसरे धिरडे घालताना परत एकदा पीठ डावेने ढवळून घ्या. पीठ घट्ट वाटल्यास परत एकदा थोडे पाणी घाला.

हे धिरडे बटाट्याच्या काचऱ्या किंवा उकडून बटाट्याच्या भाजीबरोबर चांगले लागते. ओल्या नारळाची चटणी किंवा लसूण खोबरे, लसूण दाणे यांची झणझणीत चटणीही छान लागते. सोपे व पटकन करतायेण्यासारखे आहे.

सौ आई