सचिन पिळगावकर - कोण होतास तू काय झालास तू !

होय ! ही प्रतिकिया आहे आम्हा तमाम तुझ्या चाहत्यांची !

राजा परांजपेंसारखा गुरू ! कलागुणांना उत्तेजन देणारे, कलेचे व्यासंगी, बालपणी तुझी आवड वेळीच ओळखून तुझ्यातली कला फुलविणारे असे तुझे वडील शरद पिळगावकर ! या सर्वाचं चीज केलंस !

आजही तुझे जुने बालपणीचे, तरुणपणीचे हळुवार, सुसंस्कृत (राजश्री प्रोडक्शन्स), सारिकासोबतचे सोज्वळ चित्रपट पाहताना अभिमान वाटतो की हा मराठी मुलगा मराठी व हिंदी दोन्ही भाषांच्या माध्यमांत कसा मस्त, स्वच्छंदपणे वावरला....!

त्याच अनुभवाने, आत्मविश्वासाने, जिद्दीने तु दिग्दर्शक बनलास ! आणि तेथेही बाजी मारलीस !
अशी ही बनवाबनवी , नवरी मिळे नवऱ्याला, गम्मत जम्मत, आमच्यासारखे आम्हीच, भुताचा भाऊ, असे अनेक दर्जेदार, उत्तम व निर्भेळ करमणूक करणारे चित्रपट काढलेस !

ह्या सर्व चित्रपटांच्या यशाचं सुत्र तुला पक्क ठाऊक होतं ! ते म्हणजे - तुझे आधीचे ('नवरा माझा नवसाचा' च्या आधीचे) सर्व चित्रपट हे साहित्यीकांनी लिहीले होते ! वसंत सबनीसांसारखा उत्तम विनोदी लेखक तुझ्या साथीला होता !

मग तु हिंदी मालिकांकडे वळलास ! तू तू मै मै सारखी हास्यस्फोटक मालिका बनवून तू यशाचं आणखी एक शिखर पार केलंस ! 
(या काळात तू काढलेल्या हिंदी चित्रपटांबद्दल मी सहानुभुती दर्शवतो
- प्रेम दिवाने, इतनी भी क्या जल्दी है - चांगले होते, पण यशस्वी होऊ शकले
नाहीत ! )
क्षितीज सारख्या गंभीर पण उत्तम हिंदी मालिकाही तू धाडसाने यशस्वी केल्यास !
या हिंदी टेलीविजनच्या यशाने तुझं इंडस्ट्रीमध्ये पक्क, आदराचं स्थान निर्माण झालं ! - आम्हाला त्याचं काय कौतुक ! व्वा !

या मधल्या ८ - १० बर्षांच्या काळात तू मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवलीस तरी त्याचं दुःख कधी झालं नाही कारण हिंदीत तू जे काही करत होतास ते छान होतं..... तू, तुझं चांगलं काम आमच्या नजरेत होतं !

आणि मग ! तो टप्पा आला ! - हाय !

१.
संतोष पवारला तुझा नवीन चित्रपट लिहायला दिलास ! आणि फसलास ! त्याचा बाज, ढंग हा नाटकांना जास्त योग्य होता हे तुला कळू नये ? बरं त्याच शैलीत त्याने चित्रपट लिहिल्याने - अतिशय कच्चा आणि फक्त भरपूर पीजे असलेला चित्रपट झाला !

वसंत सबनीसांच्या उत्कृष्ट संहितांना तुला हाताळण्याची सवय !
म्हणूनच काय की एकदम संतोष पवारी बाज तुझ्यातल्या दिग्दर्शकाला झेपला / मान्यच नसावा !

ही लेखकांमधली दरी तुझ्या लक्षात येऊ नये ? निदान मुकुंद टाकसाळेंना तरी ट्राय करायचंस !

२.
यानंतर तू जे काही केलंस त्याने माझ्यासारख्या तुझ्या पक्क्या समर्थकालाही रुचंल नाही !
अरे, तू त्या नाचाच्या कार्यक्रमात चक्क स्पर्धक म्हणून नाचलास !??! मला वाटंत तेव्हापासून तुझी क्रियेटिव घसरण सुरू झाली !

अरे, तू त्या कार्यक्रमात असलेल्या सर्वांचा बाप होतास ! तुझ्या परीक्षकांची तुझ्यासमोर उभे राहण्याची लायकी नव्हती ! तुझा अनुभव काय ? तुझी गुणवत्ता काय ? तुझे कर्तुत्व काय ? त्या इतर सवांची शाळा घेऊ शकला असतास !

अशा कार्यक्रमात नाचल्याने तू स्वतःच्या कर्तुत्वाचा, स्थानाचा, स्वतःच्या उत्तमोत्तम कलाकृतींचा व मुख्य म्हणजे आमच्या प्रेमाचा अपमानच केलास !

बऱ्याच मराठी पब्लिकला म्हणे अभिमान वाटला तू जिंकल्यावर ! पण तू कोण होतास हे माहित असणाऱ्यांना कपाळावर हात मारायची पाळी आली !

३.
आणि मग नाच या गोष्टीने तुला इतंक घेरंलं की काय सांगू !
स्वतःला महागुरू म्हणवून घेतंलंस ? अरेरे ! ही नैतिक घसरण ? राजा परांजपे हयात असते तर तुला शिष्य म्हणवून घेतले नसते !
आणि या सगळ्या नाचाच्या गोंधळात तू स्वतःची ओळख विसरलास की काय ? असं वाटतंय ! नाच हीच तुझी ओळख का ?

४. मग 'आम्ही सातपुते' आला - या विषयावर न बोलणे लगे ! तू बघ तुझेच आधीचे चित्रपट ! काय झालंय काय तुला ?

५.
आता तू लहान, कोवळ्या, निष्पाप मुलांना नाचायला लावतोयस ? नकोरे !

त्या नाचाच्या विळख्यातून बाहेर पड, अरे तुझ्या मधल्या काळातल्या कलाकृतींशिवाय मराठी, हिंदी कलाक्षेत्राचा इतिहास अपूरा असेल !
तुझ्या सर्व कलाकृती पाहा आणि ठरंव !

सचिन - कोण होतास तू, काय झालास तू !!!