जर्मन बेकरी

मी तसा अमरावतीचा, म्हणजे नागपुरला जन्म व शिक्षण, पण कर्मभुमी अमरावतिची. निवृत्तीनंतर मुलगी पुण्याला स्थाईक झाल्याने आमचे स्थलांतर. नागपुरचे व अमरावतीचे कट्टे चांगलेच परिचीत पण पुण्याबद्दल काहिच फारशी माहिती नाही. जर्मन बेकरी ही पुण्यातील तरुणाईचे भावविश्व होते हे ते उध्वस्त झाल्यावर कळले तेही प्रसिद्धी माध्यमाकडुन. 

९ जीव तेथील कारवाईत तडकाफडकी गेले. माध्यमासाठी ते जीव होते पण ज्या कुटुंबातून ते आले होते ती कुटुंबे मात्र उध्वस्त झाली आहेत कारण त्यांचे देखील भावविश्व उध्वस्त झाले आहे. कलकत्त्याचे आनंदी व अनिक धर हे बहिण भाउ आणि तिथलीच शिल्पा गोयनका, बंगलोरची पी सुंदरी, मुंबईची विनीता गदानी आले कशाकरिता व झाले काय? काय वाटले असेल त्यांच्या आई वडिलांना. पुण्याचा शंकर पानसरेचे तर कुटुंबच उघड्यावर पडले. परदेशातले सयीद व नादिया आणि नेपाळचा बिचारा वेटर गोपाल. त्याच्या घरच्यांना तर त्याला शेवटचे पाहता देखील आले नाही. हे कमी झाले कि काय जखमींपैकी ८ जीव त्या वेदना अखेर सहन न होउन शांत झाले.
जाणारे निघून जातात मुक्त होतात अगम्य अशा प्रवासासाठी पण त्याच्या निकटच्या कुटुंबीयांना मात्र आता त्यांच्या जिवनापर्यंत त्यांच्या विरहाच्या यातना सहन करत जगावे लागणार. लाडाने वाढविलेले, त्यांच्या थोड्याशा ही कष्टाने कासाविस होणारे पालक कोणत्या परिस्थीतीतून जात असतील या कल्पनेनेच अंगावर शहारे येतात.
समाज त्यांच्या दुःखात सहभागी असतोच पण त्याने या मरण प्राय यातना कमी होत नाही. वेळ हेच यावर औषध असे कितीही म्हटले तरी ते खरे नसते. रात्रीच्या निरव एकांतात त्या यातना आयुष्यभर त्रास देत असतात.