उपदेशामॄत

सदबोध संतांचा सेवित अखंडित
जाणावे द्वैतांतले ब्रम्ह प्रकाशित
साधन आराधने समाधीत
भोगावे आपण आनंदाने...

अनुसंधान मात्र नित्य,
असावे साधकाचे आर्त जागॄत,
सावधमने सदा सत्य,
शोधावे पुन्हा, हृदयातची...

न शोधावे गुरुस आपण,
करीत राहावे ठायीच साधन,
घडता विभुतिंचे पथात दर्शन,
घ्यावे मात्र तळमळीने...

खरे सद्गुरू करुणावत्सल,
परिपक्व पाहता साधना सुफल,
कराया धावती शिष्याजवळ,
असे श्रद्धा बलवत्तर जरी..

श्वासोश्वासी घ्यावे,
हृदयतालावरी दंग व्हावे,
टाहो फोडोनी हाकारावे,
सदुरुंसी आपल्या उत्कटपणे...

उदरार्थ करणे कर्तव्य नियत,
एरवी एकांती शांत चित्त,
वॄत्ती एकवटोनी जगांत,
खेळते चैतन्य पाहावे भावे...

धुंडाळाल जितुके वेदशास्त्रासी,
तितुके पहाल विधीनिषेधासी,
सर्व सोडूनी हृदयाकाशी,
सद्गुरू शोधावा मायबाप..

परमगुरू ब्रम्हलीन श्री नानामहाराज तराणेकर यांचे ओवीबद्ध चरित्र "मार्तण्ड महिमा" या ग्रंथातून या ओव्या घेतल्या आहेत. ग्रंथरचनाकार श्री विजय पागे यांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना पूज्य श्री नानांच्या मुखातून आलेले हे उपदेशामॄत आहे.

असे वाचन करत असताना जो बोध आणि सात्त्विक आनंद मिळतो, त्यात इतराना सहभागी करावे या सद्भावनापूर्वक - हरिभक्त