डॉ श्रीकांत चोरघडे

 डॉ
श्रीकांत चोरघडें नागपुरातील निष्णात बालरोगतज्ञ, लेखक व सामाजिक कार्यकर्तेही. आज त्यांचा सत्तरावा वाढदिवस. वय
वर्षे सत्तर जरी असले तरी तरुणांना लाजवतील अशी कामसू व अभ्यासू वृत्ती
आजही टिकून आहे. थकवा किंवा कंटाळा हे शब्द जणू त्यांच्या शब्दकोशातच
नाही. त्यांच्याशी गप्पा मारताना ते आपल्या बालपणात हरखून गेले. 'बालपण
देगा देवा मुंगी साखरेचा रवा' असं काहीसं ते त्यांच्या बालपणाबद्दल म्हणत
होते आणि असंच सगळ्या बाळांच जावं त्यासाठी त्यांनी 'तारांगण' या नावाचं
निरामय शिशू चिकित्सा केंद्र सुरू केलं. ह्या केंद्रात 'उद्याची चाहूल आज'
हा उपक्रम गेली चाळीस वर्षे ते राबवीत आहेत त्याचबरोबर ऍडोलसंट चॅप्टरचे
ते मार्गदर्शनही करतात. दैनिक लोकसत्ता व इतर वृत्तपत्रात ते स्तंभलेखन
करतात. अडगुलं मडगुलं व अन्नसंस्कार ही त्यांची अत्यंत गाजलेली पुस्तके.

प्रः सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! सर तुमच्या आठवणीतला एखादा खास वाढदिवस सांगा.

डॉः माझा नववा वाढदिवस होता. आईबरोबर पंडित जवाहरलाल नेहरूंना भेटायला
गेलो. मी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यांनी आशीर्वाद दिला 'बडे हो के
देशकी सेवा करो'.

प्रः स्वातंत्र्यपूर्व काळात वर्ध्या सारख्या गावात तुमचं बालपण गेलं त्यावेळच्या काही खास आठवणी व शालेय जीवन कसे होते ते सांगा.

डॉः मला त्यांवेळचं वातावरण फारसं काही आठवत नाही. पण पंडित नेहरूंचं
भाषण, त्यांचा आवाज आजही आठवतो. त्यावेळेला ते वर्ध्यात आले असताना लोकं
राजा आलाय असं म्हणत होते, गांधीजी सेवाग्राम आश्रमात खांबाला टेकून
बसलेले व माझ्यासाठी खास दूध मागवलं होतं तसेच स्वातंत्र मिळाल्यावर
निघालेली प्रभात फेरी अश्या काही ठळक पण धूसर आठवणी आहेत. माझं बालवाडीच
शिक्षण माँटेसरी पद्धतीने मीराबेन मुंदढा ह्यांच्या शाळेत झालं. दगडी
इमारत होती शाळेची. माझ्यावर जे चांगले संस्कार झाले ते शाळेच्या दगडी
इमारती प्रमाणे आजही घट्ट व मजबूत आहेत. माझी अभ्यासाची तयारी चांगली होती
म्हणून पहिली व दुसरीची परीक्षा एकदम देऊन थेट तिसरीत प्रवेश दिला गेला.
त्या शाळेतले तांदळे गुरुजी आजही आठवतात. शाळेत पायी जावं लागायचं म्हणून
कधी-कधी रडारड व्हायची बाकी बालपणाचा काळ सुखाचा होता. त्यानंतर माझी शाळा
बदलल्या गेली ती आठव्या वर्गात. मी स्वावलंबी विद्यालयात जाऊ लागलो. तेव्हा मी अगदी
लहानखुरा होतो. एका मुलाने मला बदडले. पीटी शिक्षक अंबुलकर गुरुजींने हे
पाहिले व त्या मुलाला दम दिला की दोन वर्षात ही तुला बदडतो की नाही ते
पाहा, तेव्हा जपून राहा. ते म्हणाले तसं खरोखरच दोन वर्षात मी आडदांड झालो
पण कुणावरही दादागिरी केली नाही. त्या शाळेची एक आठवण सांगतो. त्या शाळेत
एक नियम म्हणा किंवा पद्धत म्हणा जी आजही शाळेत राबवायला हरकत नाही. ती
पद्धत अशी की आम्हाला दिवसभरात काय काय कामे केली त्याचं एक वेळापत्रक
भरावं लागे. महिन्याच्या शेवटी ह्या वेळापत्रकावर पालकांची सही आणावी
लागे. त्यामुळे आपोआपच स्वावलंबन व शिस्तीचे धडे मिळत गेले. राम मेघे
नावाचे आदर्श व हाडाचे शिक्षक मराठी व इंग्रजी शिकवत. मी मराठी माध्यमातून
शिकलो त्यामुळे मराठी विषयाची तयारी उत्तमच होती. इंग्रजी भाषाही चांगली
अवगत झाली ती राम मेघे सरांमुळे. त्याकाळी आय गो, यु गो, ही गोज अश्या
पद्धतीने भाषांतरित इंग्रजी शिकवल्या जायचं. पण मेघेसर इंग्रजीतूनच
शिकवायचे आणि पूर्णवेळ इंग्रजीतूनच संभाषण करायचे. एवढंच नाहीतर ते स्वतः
इंग्रजीत नाटक लिहायचे व आमच्याकडून करूनही घ्यायचे. ते सगळ्या
विद्यार्थ्यांना शिक्षक न वाटता मित्रच वाटायचे. कधी कधी तर घरी बोलवूनही
शिकवायचे.

प्रः तुमच्या घरातलं वातावरण कसं होतं?

डॉः माझे वडील शिक्षक होते व आई डॉक्टर. आम्ही चार भावंड. एक मोठी बहीण व
दोन लहान बहिणी, मी व आई वडील असं आमचं मध्यमवर्गीय खाऊन-पिऊन सुखी
कुटुंब. मुलगा मुलगी असा भेदभाव नव्हता. बहिणींप्रमाणे मलाही घरातली कामे
करावी लागायची. आमच्या घरी गाई-म्हशी होत्या. त्यांचा चारा-वैरण करावं
लागे. घरापुढे बाग होती. बाबांबरोबर बागेतही काम करायचो. वडिलांना
व्यायामाची आवड होती. त्यांचं बघून बघून मलाही गोडी लागली अन माही
त्यांच्या बरोबर व्यायाम करू लागलो. ते काही कामानिमित्त नागपुराला जायचे.
येताना ते आमच्यासाठी खेळणी व चांगली पुस्तक आवर्जून आणायचे. त्यामुळे
लहानपणीच वाचनाचा छंद जडला जो आजगायत जोपासला आहे आणि म्हणूनच ह्या
छंदामुळे लेखन करू शकलो असं वाटतं.

प्रः  हुशार विद्याथ्याने डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं असं त्याकाळीही होतं का? आई डॉक्टर होती म्हणून डॉक्टर व्हावे अशी आईची किंवा वडिलांची अपेक्षा होती का?

डॉः तसं काही नव्हतं. तसेच आईवडिलांनीही त्यांच्या अपेक्षा लादल्या नव्हत्या.'वासरात लंगडी गाय शहाणी'.वर्धेत शिकत असताना वर्गात नेहमी पहिला
क्रमांकच असायचा. पण नववीत मी नागपुरला शिकायला आलो. पटवर्धन शाळेत प्रवेश
घेतला. तिथे आला माझा सोळावा क्रमांक. मॅट्रिकची परीक्षा प्रथम श्रेणीत
पास झालो चार विषयात प्रावीण्यासह. प्रथम श्रेणीत पास झाल्यामुळे विज्ञान
शाखेत सहज प्रवेश मिळाला. बारावीचं आजच्यासारखं टेन्शन नव्हतं. बारावीत
अहुजा मॅडम होत्या. त्या वर्गात येताना इंग्रजी पुस्तकांची चळत आणायच्या.
दर आठवड्याला पुस्तकांवर चर्चा व्हायची. बारावीनंतर नागपूरच्या मेडिकल
कॉलेजात प्रवेश घेतला. कॉलेजला सायकलनेच जायचो. फक्त परीक्षेला जाते वेळी
बससाठी पैसे मिळायचे. एमबीबीएस झाल्यावर मुंबईला हाऊस जॉब करायचा निर्णय
मात्र मी स्वतंत्रपणे घेतला आणि तो निर्णय अगदी योग्य होता. तिथे मला खूप शिकायला
मिळाले. तिथे खूप काम करावं लागायचं. रात्रीचे बारा वाजायचे. जेवायलासुद्धा
वेळ मिळायचा नाही. एक दिवस राउंडवर गेलो. एका रुग्णाचं चेकअप झालेलं
नव्हतं. डॉ कामतांनी सगळ्यांसमोर रागावलं. ते अतिशय शिस्तप्रिय होते. मी
त्यांना काम संपल्यावर भेटायला गेलो व मी कामात कसलीही कसर ठेवत नसल्याचे
त्यांना सांगितले. डायग्नोसिस साठी आवश्यक असलेल्या सगळ्या टेस्ट केल्या
होत्या व बाकी नंतर करणार असल्याचे सांगितले. त्यांना माझ्यातला
प्रामाणिकपणा आवडला. त्यानंतर आमच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं.

प्रः एखादी लक्षात राहिलेली केस?

डॉः तश्या अनेक केसेस आहेत पण पहिली केस सांगतो. एक टायफॉईडचा रुग्ण होता.
त्याला पोटात दुखायचे. औषध मिळत नव्हते. मी त्या रात्री जागून खूप पुस्तकं
वाचून काढली. पोटाचा एक्सरे काढला. त्याला अल्सर झाला होता. ऑपरेशन केलं.
रुग्ण वाचला. ही मी स्वतंत्रपणे हाताळलेली यशस्वी केस. माझं खूप कौतुक
झालं. नंतर मी नागपूरला आलो. त्यावेळेला डॉ चौबे होते. त्यांच्याकडून खूप
शिकायला मिळाले. मुंबईप्रमाणे त्यांनी इथे सुधारणा करून घेतल्या. आठ-नऊ
रुग्णाचं योग्य निदान केलं त्यामुळे पेडियाट्रिक्सला ऍडमिशन मिळाली. डीसीएचची परीक्षा होती. बस थांब्यावर उभा होतो. धन्वंतरी हॉस्पिटलच्या डॉ
कमलाताई जोशींनी कार थांबवून माझी चौकशी केली व धन्वंतरीत येण्याचं
प्रेमाचं आमंत्रण दिलं. तेव्हापासून धन्वंतरीशी जुळल्या गेलो.

प्रः लेखनाकडे कसे वळलात?

डॉः एक अवघड केस होती. आई निगेटीव्ह रक्तगटाची, वडील पॉझेटीव्ह व मुलाचा
निगेटीव्ह रक्तगट असेल तर ब्रेन डॅमेज होण्याचा धोका असतो. अश्या केसमध्ये
रक्त बदलावं लागत. ही प्रक्रिया वाचून माहीत होती, पण प्रात्यक्षिक केलं
नव्हतं.त्याकाळी आजच्या अद्ययावत सोयी उपलब्ध नव्हत्या. पुस्तकं वाचून
तयारी केली. मुलं वाचलं. आईवडीलांनी, सहकाऱ्यांनी खूप कौतुक केलं. माझे
स्नेही मधुकर हुद्दार मात्र रागावले. ही केस तू पेपरमध्ये का नाही देत. 'मी'
केलं असं न लिहिता लोकांमध्ये जागरूकता यावी, योग्य उपाय योजना केली तर
मुलं वाचू शकतं हे लोकांना कळावं, म्हणून लिही. 'पिवळा मृत्यू' ह्यानावाने
पहिला लेख 'तरुण भारता'त प्रसिद्ध झाला. माझ्या वैद्यकीय व्यवसायातील
अनुभव लिहू लागलो. एकदा एका पेशंटने लेखाचे कात्रण एकत्रित आणून दिले आणि
त्याची संकलित आवृत्ती निघाली 'अडगुलं मडगुलं' जे आज बारसं, डोहाळजेवणाला
भेट देतात असे बरेच लोक आवर्जून सांगतात. पूर्वी काही झालं तरच
डॉक्टरांकडे जायचे. पण लहान मुलांची नियमित तपासणी, प्रतिबंधात्मक लसी
लावल्या गेल्या पाहिजे या सगळ्या सोयी आपणच द्याव्या ह्या हेतूने
'तारांगण' शिशू चिकित्सा केंद्र सुरू केलं.

प्रः वैद्यकीय पदवी असतानाही मानसशास्त्राचा अभ्यास का करावासा वाटला?

डॉः माझ्या असं लक्षात आलं की एखादा रुग्ण यायचा तो शारीरिक व्याधी घेऊन
पण त्याचं मूळ कारण असायचं ते मानसिक म्हणून मानससास्त्राचा अभ्यास केला.
त्यामुळे मला एक नवीन दृष्टिकोन मिळाला. प्रत्येक रुग्ण मी दोन्ही स्तरावर
तपासून पाहू लागलो.

प्रः आयुष्यावर प्रभाव टाकणारी व्यक्ती?

डॉः तश्याच बऱ्याच आहेत पण नाव घेईन डॉ मनू त्रिवेदीच. परदेशातील नोकरी
सोडून वर्ध्या सारख्या खेड्यात त्यांनी वैद्यकीय सेवा दिली. सायकलने गावात
फिरायचे. शिस्त व स्वावलंबन भक्त. चरखा चालवायचे मीही त्यांच्याबरोबर सूतकताई करायचे.

प्रः आयुष्यातील एखादी राहून गेलेली गोष्ट?

डॉः हो, मला आजही वाईट वाटतं ते गाणं शिकायचं राहूनच गेल्याचं. मी तसा
शिकायचा प्रयत्न केला पण ह्या वैद्यकीय अभ्यास, नंतर प्रॅक्टिस ह्या
सगळ्यात राहूनच गेलं.

पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!