रात्र

सुमनांचा नाहीच घेतला विचार रात्रीने
शिंपडले स्वच्छंद कोरडे तुषार रात्रीने

नुकती कोठे सांज लाजरी विसावली होती
बघता बघता पूर्ण उडवली बहार रात्रीने

उरली नाही भीड, भास्करा, तुझी तिला आता
हृदयातिल अंधार घेतला उधार रात्रीने

ना तिजला नावीन्य त्यात अन् नसे रुची काही
शृंगाराचे सर्व पाहिले विकार रात्रीने

अविरत मागोमाग फिरतसे उगा प्रकाशाच्या
अजुनी त्याचा का न पचवला नकार रात्रीने ?