हा देश कृषीप्रधान कसा?

हा देश कृषीप्रधान कसा?
- सोनिया गांधी या जागतिक राजकारणाच्या केंद्रबिंदू आहेत.
- अमिताभ बच्चन शतकातील सर्वोत्कृष्ट गायक आहेत.
- रवि शास्त्री क्रिकेटचा प्राण आहे.
- लातुर हे जागतिक दर्जाचे शहर आहे.
                                मी जर असे म्हणायला लागलो तर ते कुणालाही झेपण्याची शक्यता नाही. बेंबीच्या देठापासून ओरडून सांगीतले तरी कोणी पटवून घेईल? नाहीच घेणार. कारण स्पष्ट आहे. वर उल्लेखिलेल्या व्यक्ती आपापल्या क्षेत्रात श्रेष्ठ असल्यातरीही त्यांच्या कौतुकासाठी मी वापरलेली शब्दविशेषणे अतिशयोक्तीपुर्ण आहेत. या तर्‍हेच्या भाषाप्रयोगाने संबधित व्यक्तिचे कौतुक होण्यापेक्षा उपहासच होत असते. आणि असे गुणगौरव करणारा एकतर वेडसर किंवा निष्कारण गोडवे गाणारा "भाट" ठरतो.
                              मग जर हे खरे असेल तर जेंव्हा जेव्हा "भारत हा कृषीप्रधान देश आहे" किंवा "शेती ही भारतिय अर्थव्यवस्थेचा कणा आहे" असे म्हटले जाते तेव्हा नेमके काय अपेक्षीत असते? कौतुक की उपहास?
भारत हा कृषिप्रधान देश आहे,शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे, शेतकरी देशाचा पोशिंदा आहे वगैरे-वगैरे बरेच काही बोलले जाते पण…..
या देशाला कृषीप्रधान मानावे अशा कुठल्याही पाऊलखुणा प्रतीबिंबीत होतांना दिसत नाहीत, या देशातल्या राजकिय नेत्यांच्या डोक्यात शेतकरी प्रथमस्थानी कधिच नव्हता,आजही नाही. बुद्धीप्रामाण्यवादी,थोर-महान विचारवंताच्या वैचारिक बैठकीचा केंद्रबिंदु "शेती आणि शेतकरी" कधिच नव्हता, आजही नाही. मग हा देश कृषीप्रधान कसा?.
टीव्ही मध्ये शेती हा विषय किती? या विषयाचा नंबर कितवा?
वृत्तपत्रात शेती हा विषय किती? या विषयाचा नंबर कितवा?
लोकसभा/राज्यसभा अधिवेशनात शेती हा विषय किती? या विषयाचा नंबर कितवा?
संसदेत पुढार्‍यांच्या भाषणामध्ये शेती हा विषय किती? या विषयाचा नंबर कितवा?
अंदाजपत्रकीय एकुन खर्चामध्ये मध्ये शेती हा विषय किती? या विषयाचा नंबर कितवा?
एवढे जरी लक्षात घेतले तरी भारत हा कृषिप्रधान देश आहे,शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे,असे म्हणण्याचे कोणी धाडस करेल असे मला वाटत नाही.
भारत हे कृषीप्रधान राष्ट्र आहे असे मी सुद्धा म्हणायचो.एक दिवस विचार केला की मी असे का म्हणतो…..?
तर उत्तर मिळाले की पुस्तकात वाचले म्हणुन म्हणतो. पुस्तकात लिहिणार्‍यानेही कुठे तरी वाचले असणार म्हणुन लिहिले असणार, त्याच्या आधीच्यानेही कुठे तरी वाचले असणार म्हणुन लिहिले असणार…. ही यादी किती लांब आहे देवच जाणे.
"कोणीतरी म्हणतय म्हणुन मीही म्हणतो" असेच ना?
देशाचे चित्र डोळ्यासामोर ठेवुन स्वयंप्रेररणेने ‘भारत हे कृषीप्रधान राष्ट्र आहे’ असे ज्याला वाटते त्याच्या वैचारीक बैठकीमध्ये आणि कृतिशील हालचालीमध्ये हे प्रतिबिंब नक्कीच उमटायला हवे. पण तसे होत असतांना दिसत नाही.
"कृषीक्षेत्राला भारतिय अर्थव्यवस्थेचा कणा" मानले गेले. गेली अनेक वर्षे मी हा  अर्थव्यवस्थेचा कणा’ शोधायचा प्रयत्न करतोय परंतु गवसतच नाहीये. अर्थव्यवस्थेचा "दिवाळीचा सन" म्हणजे केंद्रिय अर्थसंकल्पच ना? तिथे तर ह्या ‘कण्या’पेक्षा रेल्वेसुद्धा जास्त महत्व खावुन जाते. रेल्वे इतका मान सुद्धा या ‘अर्थव्यवस्थेच्या कण्याला’ मिळतांना दिसत नाही. धोरणात्मक निर्णयांमध्ये शेती विषयाचा शेवटून पहिला नंबर लागतो.
आणि जर का हे खरे असेल तर शेतकर्‍याला "देशाचा राजा" म्हणणे म्हणजे शेतकर्‍यांची क्रूर थट्टाच नाही काय?
ही शेतकर्‍यांची मानसिक छळना आहे असे मला वाटते.
या देशात जसे काही लोक शेतीवर उपजिविका करतात तसेच या शेतीमुळेच अनेकांना आत्महत्याही करावी लागते.
असा विचार करता "भारत हा कृषिमरण देश आहे" हे जास्त संयुक्तिक नाही का?
मग
"सोनिया गांधी या जागतिक राजकारणाच्या केंद्रबिंदू आहेत" हा जर उपहास/व्यंग असेल तर "भारत हा कृषिप्रधान देश आहे" हे सुद्धा उपहास/व्यंगच.
आणि
"भारत हा कृषिप्रधान देश आहे" हे जर खरेच असेल तर "सोनिया गांधी या जागतिक राजकारणाच्या केंद्रबिंदू आहेत"
हेही खरेच.
उगीच वेगवेगळे मापदंड नकोत.
…गंगाधर मुटे