रंग संह्याद्रीच्या पर्वत रांगाचे!

सह्याद्री च्या रांगा बघून, त्यांचा प्रत्यक्ष सहवास अनुभवून, सह्याद्री च्या प्रेमात न पडलेला माणूस, निदान मराठी माणूस तसा सापडणे कठीणच.! आजवर अनेकदा दूरून आणि कधी कधी जवळून सह्याद्री च्या रांगा सोबत करत आल्या आहेत प्रवासात. कोंकणात काही न काही निमित्ताने होणाऱ्या वाऱ्या सह्याद्रीदर्शनाचा योग घडवून आणतातच. शिवाय पुण्याच्या जवळचे सिंहगड तर सतत खुणावत असतेच. आज काय खूप ढग आले आहेत.. बघू सिंहगडावर कसे वाटते ते, आज चांदणे किती स्वच्छ पडले आहे, बघू बर सिंहगडावरून कसे दिसते ते, पाऊस कसला भरून आला आहे.. सिंहगडा वरचे छोटे छोटे धबधबे बघितलेच पाहिजेत, आज काय.. केवढे उन आहे.. सिंहगडावरचे गार ताक आणि दही घेतलेच पाहिजे.. अशी कितीतरी करणे आपल्याला सिंहगडा कडे खेचत असतातच! पुण्या बाहेर पडले कोकणात जाण्यासाठी तर केवढे मार्ग! प्रत्येक मार्गावर सह्याद्री च्या रांगा कोणत्या न कोणत्या वळणावर स्वागताला हजर!! पसरणी च्या घाटातून वर चढताना पाचगणी पर्यंत कृष्णे च्या पाण्याचे मनोहारी रूप डोळ्यात आणि मनात साठवणे हा हि खूप आनंददायी अनुभव आहे. पुढे पाचगणी महाबळेश्वर मार्गे पोलादपूर चा घाट उतरताना होणारे पर्वत रांगांचे दर्शन हि विहंगम! तर चांदणी चौकातून ताम्हिणी मार्गे माणगाव पर्यंत चा सह्याद्री च्या रांगा मधून केलेली वाटचाल हि तेवढीच सुंदर आणि आनंदमयी! उन पाऊस आणि थंडी या तीनही काळात कोल्हापूर ओलांडून आंबा घाटात प्रवेश केल्या केल्या सह्याद्री च्या रांगा, उंचच उंच पर्वत कडे आणि खोल खोल दऱ्या आपल्या डोळ्यांवर आणि मनावर अलगद पणे कधी कब्जा करतात ते कळत सुद्धा नाही. नागमोडी वळणांवर गाडीच्या चाकाचा होणारा आवाज, सर्वात उंच ठिकाणी पोचल्यावर गाडी कडेला घेऊन दरीत वाकून पाहताना चुकलेला काळजाचा ठोका, आणि भन्नाट वारे अंगावर झेलत फोटो साठी पोझ देताना होणारी तारांबळ! मनात साठवून ठेवायचे हे अनुभव सतत आनंद देणारेच! कात्रज आणि खंबाटकी च्या पर्वत रांगा तश्या हि पुणेकरांच्या जिव्हाळ्याच्या! ट्रेकिंग
च्या निमित्ताने, कोल्हपुर सातारा या ठिकाणी जाता येताना हे दोन्ही घाट सवयीचे होऊन जातात. कात्रज च्या नवीन बोगद्याने जाताना आणि खंबाटकी च्या बोगद्यातून येताना पर्वत रांगा मधून गेल्याचा अनुभव मात्र काही तरी राहून गेले बघायचे हि हुरहूर लावून जातो खरा. वेळ खूप वाचतो आणि ट्राफिक जॅम मधून सुटका होते हे खरे असले तरी पूर्वीचा कात्रज घाट आणि पूर्वीचाच खंबाटकी घाट जास्त भारी वाटायचा न! टिपूर चांदण्यात न्हालेला पोलादपूर चा घाट असाच एकदा अनुभवयास मिळाला होता. तर तुफान पावसात पसरणी च्या घाटातून पाचगणी आणि पुढे महाबळेश्वर चा जीव मुठीत धरून गाडी चा वायपर बंद पडतो कि काय या काळजीत केलेला प्रवास सुद्धा असाच रोमहर्षक! एकूण काय.. सह्याद्री च्या प्रेमात पडायला कारणे अनेक आहेत!