बाशो चे हायकू

दुवा क्र. १ 

   दुवा क्र. १ या  या स्थळावर काही माझे, तर काही जपानी अनुवादित हायकू देण्याचा विचार आहे. अनुवाद या पूर्वीच्या एखाद्या अनुवादाशी मिळते जुळते असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा..

बाशो चे हायकू...

1.

तू बघणार नाहीस
हे अथांग एकाकीपण
किरी झाडाचं एखादं गळणारं पान

2.

शिशिरातल्या या संध्याकाळी
मी एकटाच
चालत जातोय

3.

वर्षातला पहिला दिवस
विचारांमध्ये गुरफटलेलं एकाकीपण
शिशिरातली संध्याकाळ दाटून आलेली

4.

एक जुनाट तळं
एका बेडूक उडी मारतो
छपा़क!

5.

विजा चमकताहेत
हेरॉन पक्षांचं रडणं
अंधार भोसकून जातंय

6.

सिकाडा किड्यांची किरकिर
सांगत नाही
ते किती दिवस जगणारेत अजून

7.

चांदणं न्याहाळतंय
तांदूळ दळता दळता
गरिबीचं मूल

8.

देवळांच्या घंटा विझल्या तरी
संध्याकाळ ताजीच ठेवून आहेत
हे सुगंधी बहर

9.

आज समुद्र खवळलेत
साडो बेटावर झाकोळून आलेत
तारकांचे ढग

10.

कशासाठी झुरतंय, हे सुकलेलं मांजर
उंदरांसाठी, माश्यांसाठी
की परसबागेतल्या प्रेमासाठी

11.

हे दवबिंदूंनो
मला तुमच्या लहानशा गोड्या पाण्यात
धुऊ देत हे जीवनाचे धूमिल हात...

12.

मी
आपली न्याहारी उरकतो
पहाटेची प्रभा बघत बघत

13.

शांत पहुडलेलं जुनं गाव
फुलांचा सुगंध दरवळत जातोय
दूर कुठेतरी सायंकाळची घंटा वाजतेय....

मुक्त अनुवाद : अनंत ढवळे