पुण्यावरच्या विनोदांत भर!

परवा बऱ्याच दिवसांनी एक फार धमाल झाली.

म्हणजे काय झाले काही मराठी मंडळी एकत्र जमून एका आपसातल्या संमेलनाचा बेत होता. तसा तो बऱ्याच वेळा असतो. मराठी लोक वर्षातून दोन-चारवेळा एकत्र जमतात. सारे वातावरण हास्यविनोदात मश्गुल झालेले असते. अश्या वेळी एकमेकाला पुण्यावरचे विनोद सांगायला फार बहार येते. पुण्यावर पुणेकरांच्यावर विनोद करण्यात काहीच अडचण नसते. पुण्यावरचे विनोद पुण्याबाहेरच्या बहुतेकांना तसे चांगले परिचयाचे असतात. पुण्यात राहणाऱ्यांना एक तर ते माहीत तरी नसतात, किंवा पुण्यात ते आनंदाने राहत असल्याने कदाचित त्यांना त्या विनोदातली खुमारी तरी कळत नाही! अंताक्षरीत ज्याप्रमाणे गाणी माहितीची असली तरी पुन्हा पुन्हा गाण्याचा कंटाळा येत नाही, तसेच पुण्यावरच्या विनोदांचे आहे! शिवाय सरदारजीच्या विनोदांप्रमाणे केवळ विनोद म्हणून त्रयस्थपणे पुण्यावरचे विनोद सांगण्यात गंमत येत नाही. "माझा आत्तेभाऊ पुण्यात असतो... ", किंवा "परवाच पुण्याला माझ्या मावशीकडे गेलो..." अशी आपुलकीने सुरवात करून, वास्तवतेची झालर लावून, चवीने सांगण्यातच पुण्यावरच्या विनोदांची खरी लज्जत असते! मोठ्या मोठ्या विनोदी लेखकांनी न चुकता एकदातरी पुण्यावर विनोद केलेला दिसतो ते उगीच नव्हे.

कुणाच्या घरी काही खासगी समारंभात जेवायला मंडळी जमली, की अश्या विनोदांना सहसा उधाण आलेले असते. अश्या वेळी लोकांत मिसळायला बरे पडते, म्हणून मीही असे चार-दोन विनोद जवळ बाळगून असतो.

पण त्या दिवशी मात्र मला धक्काच बसला.

मी नेहमीप्रमाणे अश्या मौजेच्या अपेक्षेने तेथे पोहोचलो, तर काय एरवी जिथे हास्याचे फवारे उडत असतात तेथे हॉस्पिटलमधल्यासारखी शांतता पसरली होती! कोणी डोक्याला हात लावून बसला होता, कोणी विषण्णपणे शून्यात नजर लावून होता, कोणी अस्वस्थपणे हात चोळत होता, तर कुणी वैफल्याने खालच्या कार्पेटवर बोटाने रेघा मारत होता!! नैराश्याच्या काळ्याकुट्ट ढगांनी सारे वातावरण अंधारून गेले होते.

चपलांबरोबर माझा उत्साहही मला बाहेर काढून ठेवावा लागला.

काय झाले असावे बरे? बरे दारातून एकदम विचारणेही बरे वाटेना. हळू हळू दबकत आंत गेलो आणि एकाला भुवया उंचावून "काय?" असे (नजरेनेच) विचारले. त्याने काही न बोलता मधोमध पडलेला त्या दिवशीचा पेपर माझ्या पुढे धरला. बापरे!! त्यातला मजकूर वाचता वाचता मला माझ्या पावलाखाली कार्पेट ओले वाटायला लागले.

बातमी साधारण अशी होती:


परीक्षांच्या निकालातील अलीकडच्या काळातले घोळ

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत जवळजवळ सर्व सरकारी शाळांतल्या विद्यार्थ्यांची दरवर्षी मूलभूत कौशल्यांची परीक्षा घेतली जाते. हे परीक्षांचे काम खासगी कंपन्यांना काही दशलक्ष डॉलर्सच्या कंत्राटाने देण्यात येते. कॅलिफोर्नियातली एक अशीच कंपनी गेली ७२ वर्षे हे काम करीत आहे.

मात्र अलीकडच्या वर्षात निकालांत चूक झाल्याने अनेक विद्यार्थी अडचणीत आले. इंडियानात ९८ मध्ये २६००००, न्यूयॉर्क शहरात ह्या वर्षी ८०००, मिसौरीत ९८ मध्ये एका महिन्यात दोन बॅचेस, फ्लॉरिडात ९८ मध्ये ११००० इतक्या विद्यार्थ्यांना निकालातील चुकांमुळे परीक्षेला पुन्हा बसावे लागणे किंवा वर्ष गमवावे लागणे ह्यासारख्या अडचणींना तोंड द्यावे लागले.

ह्या कंपनीला कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग मध्ये काही चूक सापडली आहे......

हे शेवटचे वाक्य वाचताच मला सारा उलगडा झाला.

ही सारी मंडळी जवळपास माझ्याच बॅचची. आमची ७५ ची एस एस सी ची बॅच, म्हणजे अकरावी एस एस सी ची शेवटची बॅच. त्याच वर्षी दहावी एस एस सी ची पहिली बॅचही होती. त्या वर्षी बोर्डाने प्रथमच कॉम्प्युटर वापरला होता. निकालात बऱ्याच चुका झाल्या होत्या आणि त्या बोर्डाने नंतर निस्तरल्याही. नेमका कुठल्या कामासाठी आणि कसला कॉम्प्युटर वापरला होता, ते कुणालाच माहीत नव्हते. तरी ही आम्हाला वर्षभर जिकडे जावे तिकडे कॉम्प्युटर बॅच असे विनोदाने म्हणत! त्या वर्षी महाराष्ट्रभर 'जो तो सांगे ज्याला त्याला' असे पुण्याच्या कॉम्प्युटरवरच्या विनोदाचे पेव फुटले होते. (कुणा एकाने तर खरे खोटे जाणून घेण्यासाठी 'एस एस सी बोर्ड, सदाशिव पेठ, पुणे' अश्या पत्त्यावर पत्रही टाकले होते म्हणतात... हो पुणे म्हणजे सदाशिव पेठ! दुसरे काय असणार? ) असो. तर हे सारे ह्यांना पक्के आठवत होते.

अमेरिकेसारख्या प्रगत देशातही पुण्यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही, हे पाहून मंडळींचा हिरमोड झाला होता. आता करायचे तरी काय? पुण्यावरचे ते सारे विनोद विसरून जायचे? इतके दिवस प्राणपणाने उराशी जपलेले तेव्हाचे सारे विनोद एका फटक्यात खलास करायचे? बरे, ते सारे विनोद आता अमेरिकेतल्या शहरांवर आणि नागरिकांवर करावेत, तर पुण्यावरच्या विनोदांतला ठसका आणि रसिकांची दाद न्यूयॉर्क वगैरे शहरांबद्दल कशी येणार? इतका अनमोल सांस्कृतिक ठेवा क्षणार्धात उधळला जावा? छे! छे! छे! हे मला सहन होणे शक्यच नव्हते.

सुदैव बघा कसे. संकटकाळात जास्तच प्रखर झालेल्या माझ्या प्रतिभेने मला त्यावेळी हात दिला.

"हाः हाः हाः हाः...." मी मोठ्याने हसलो.

चमकून सारे माझ्याकडे पाहू लागले.

"ह्या गोष्टीचे तात्पर्य काय?" मी म्हणालो. सारे कानांत प्राण आणून ऐकायला आतुर झालेले पाहून मी म्हणालो, "तात्पर्य हे, की ह्या कंपनीने सारी पुण्याची कॉम्प्युटर बॅचची मंडळी प्रोग्रॅमिंगला ठेवलीत! त्याचा व्हायचा तो परिणाम झाला...."

पुणेकरांवरच्या माझ्या विनोदाची वीज चिंतेच्या ढगांनी काळवंडलेल्या त्या वातावरणात लख्खकन चमकली! साऱ्यांच्या हास्याच्या सरीवर सरी कोसळू लागल्या आणि सारे वातावरण क्षणार्धात आनंदाने प्रफुल्लित झाले.

आणि मग एकंदरच साऱ्या मैफिलीला नेहमीचा उत्साह गवसला. कुणी 'पुणेकर चहा घेऊन येतो' त्याचा तर कुणी 'एक पोळी खाणार की अर्धी' असे पुण्यावरचे हुकमी हशाचे- पारंपरिक विनोद एकामागून एक सांगू लागला.

फारच धमाल झाली त्या दिवशी!!


सुमारे दहा वर्षांपूर्वी जालावरच्या मराठी वार्तालापात लिहिलेला लेख. (अनेकपदरी लिप्यंतरांतून गेल्यामुळे राहिलेल्या चुकांबद्दल क्षमस्व.)