सदैव स्त्रियाच टिकेचे लक्ष्य का ???

आजकाल सर्वत्र ( बहुतेक ई. वृत्तपत्रातील लेख तसेच आंतरजालातील लेख ई. ) मधून स्त्रियांवर टीकेची झोड उठवलेली दिसते. स्त्रिच्या कर्तुत्वाचे कौतुक तर लांबच परंतु तिच्या  'स्वतंत्र' विचारांची हेटाळणीच करण्यात अनेकांना धन्यता वाटते. काही विषय जे सध्या सर्वत्र चर्चेत दिसतायेत ते मांडते

१. 'मनोगत' वरच सध्या हा विषय चर्चेस आहे.   तो म्हण्जे   'मुलींच्या अपेक्षा  ' ही चर्चा.

मुलिंप्रमाणेच मुलगे ही अनेक फालतू कारण सांगून लग्नाला नकार देतात तरीही मुलीच टीकेचे लक्ष्य का??

मला तर याचे कारण असे वाटते की  या पुरुषप्रधान समाजात पुरुषांना 'नकार' ऐकायची सवय नाही. आणि एका मुलीने त्यांना नकार देणे हे त्यांना खुपच अपमानास्पद वाटत असावे.   त्यामुळे स्वतःच्या गुणा अवगुणांचा विचार न करता सरधोपटपणे त्यांनी उपवर मुलीं बद्दल जाहीररीत्या टीका सत्र सुरू केलेले दिसते.

मुलीची पात्रता आहे किंवा नाही, तसेच तिला याहून चांगले (मनाप्रमाणे ) स्थळ मिळेल किंवा नाही याची उठाठेव इतरांनी का करावी? तिला हवे असेल तर करेल ती लग्न नाहीतर राहील लग्नाशिवाय. तिने तडजोड केलीच पाहिजे हा आग्रह का ? आणि अर्थातच असा आग्रह धरणारे तुम्ही कोण ??   

२. नोकरी करणाऱ्या स्त्रिया घराकडे नीट लक्ष देत नाहीत. ही अशी टीका तर प्रत्येक नोकरी करणाऱ्या स्त्रिला ज्याचा तिच्या संसाराशी काहीही संबध नाही त्याच्या कडुनही ऐकून घ्यावी लागते.

३.   उलटपक्षी घरी बसणाऱ्या बायका काय नवऱ्याच्या जीवावार ऐश करतात. घरातच तर बसून असतात नुसत्या काय काम असते यांना अशी टीका घरी बसणाऱ्या बायकांना सहन करावी लागते. शिवाय त्यातून घरी बसणारी स्त्री उच्चशिक्षित असेल तर विचारायलाच नको. एव्हढे शिक्षण घेउन पण घरीच बसली आहे असे टोमणे सतत ऐकावे लागतात.

४. बायकांना गाडी चालवता येत नाही, ही अजून एक अतिशय हस्यास्पद अशी टीका. तसे बघता सर्व अपघाताच्या बातम्यांमध्ये चालक हा बहुतेक करून पुरुषच असतो तरीही.

५. अता अजून एक अतिशय संवेदन्शील विषय. लिहावे का नाही असा विचार करत होते पण लिहुनच टाकते. हल्ली बलात्काराच्या बऱ्याच बातम्या येतात.   अशा वेळी सुद्धा पुरुषाचा गुन्हा उघड दिसत असुनही, मुलीचीच काही चुक आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. जसे की ती एकटीच कशाला हिंडत होती? असे कपडे का घातले होते? ई. अनेक.

अशाप्रकारे काहीही केले तरी स्त्रियांच्या वाट्याला समाजाकडून केवळ टीकाच येत असते. पुरुषाना मात्र कोणीही असे फारसे जज करताना दिसत नाही. भले मग ते  अशिक्षित समाजातले व्यसनाच्या आहारी गेलेले पुरुष असो, बायकोला मारहाण करणारे असो किंवा सुशिक्षित समाजातील घरात अजीबात काम न करणारे पुरुष असो. पुरुष असे वागणारच हे गृहीत धरले जाते आणि एखादा जर हे सर्व करत नसेल तर त्याचे कौतुक केले जाते. ही विषमता आपल्या समाजात आहे हेच खरे.