स्पष्ट व्यक्तिरेखाटनकार

     महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात अभिनय करताना एक प्राध्यापक  प्रमुख पाहुणा दिलिपकुमारच्या नजेरेने हेरला आणि त्याला 'बैराग' मध्ये छोटीशी भूमिका मिळाली. येथूनच प्राध्यापकाची अभिनय कारकीर्द सुरु झाली.

     या प्राध्यापकाला अभिनयाची आवड उपजत होती. दिलिपकुमारच्या निवडीमुळे हे प्राध्यापकबुवा अचानक चमचमत्या दुनियेत आले. ओळखी वाढत गेल्या. चौऱ्ह्यात्तर साली मनमोहन देसाई 'रोटी' बनवत होते. त्याच्या शेवटच्या प्रसंगातील संवाद लिहिण्याचे काम बुवांना मिळाले, बुवांनी तो लिहिला आणि तो संवाद देसाईंना इतका आवडला की, त्यांनी खिशात असतील नसतील तेवढ्या नोटा काढून बुवांच्या खिशात कोंबल्या. सगळीकडे हेच उद्गार काढले जाऊ लागले.
"क्या डायलॉग लिखा है कादरखानने!"
     अभिनेते कादरखान संवादलेखक झाले. देसाईंनी पुढचे सगळेच कादरखानकडे सोपवले. अमर-अकबर-अँथनी, परवरिश, कूली, नसीब, सुहाग. चमकदार संवाद लिहिणारा माणूस सापडला म्हटल्यावर प्रकाश मेहराही, टिनू आनंदही मागे राहिले नाहीत. मुकद्दर का सिकंदर, नमक हलाल, शराबी, कालिया, शहंशाह या सगळ्या व्यक्तिरेखा कादरखान यांच्याकडेच गेल्या. अमिताभच्या यशाचे श्रेय स्वतःच्या अभिनयाबरोबरच लेखक-दिग्दर्शकाकडेही जाते. सलीम-जावेद यांच्या जोडीने कादरखान यांनीही अमिताभला कसदार संवाद दिले. मुंबईया हिंदी लोकप्रिय करण्यात कादरखान यांचा वाटा आहे. "ए भिडू..आपुन के साथ पंगा नही लेने का, क्या ?" हा त्याचा एक मासला. तर्क आणि कल्पनाशक्तीची उत्तुंग झेप, हा त्यांच्या संवादाचा महत्वाचा भाग.  दिग्दर्शकाच्या मनात व्यक्तिरेखा कशी आहे, हे ते समजावून घेत. कित्येकदा व्यक्तिरेखांचा आकृतीबंध ठरवण्याचे स्वातंत्र्य दिग्दर्शक त्यांना देत. म्हणूनच एकाच चित्रपटातील खूप व्यक्तिरेखा स्वतंत्र वाटतात, ते त्यांनी लिहिलेल्या संवादांमुळे. 'सत्ते पे सत्ता' हे सुंदर उदाहरण.
     "रिश्तेमें तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहंशाह" हे तुफान गाजलेले पालुपद त्यांच्याच लेखणीतून उतरले आहे.  
     मूळची आवड अभिनयाची असल्यामुळे कादरखान संवादांबरोबरच भूमिकाही साकारत गेले. सदुसष्ट ते पंचाहत्तर किरकोळ व्यक्तिरेखा, पंच्याऐंशीपर्यंत खलप्रवृत्तीच्या व्यक्तिरेखा असा त्यांचा प्रवास सुरु होता. मग त्यांनाही खलनायकीचा कंटाळा आला. घरचेही लोक म्हणू लागले की, वाईट वागणे आता खूप झाले. थोडे वेगळे काहीतरी करा. त्यांनीही ते मनावर घेतले आणि शक्तिकपूरसह जोडी जमवली. या दुक्कलीने पडद्यावर धुमाकूळ घातला. विनोदी खलनायक हा प्रकार या द्वयीने लोकप्रिय (!) केला. नव्वदनंतर गोविंदासह विनोदी आघाडी उभारली आणि तीही यशस्वी करुन दाखविली. जबरदस्त लक्षात राहावी अशी त्यांची एकही भूमिका नाही, कारण भूमिकांची संख्याच भरपूर. त्यातील बऱ्याचशा तद्दन देमार हिंदी चित्रपटातील ठरावीक. पण योग्य मार्गदर्शन करणारा आणि येता जाता पाचकळ विनोद करणारा असे दोन्ही प्रकारचे बाप त्यांनी रंगविले आहेत.
    कादरखान यांनी एकोणीसशे पंचाहत्तर नंतरच्या सर्वच अभिनेत्यांसाठी संवाद लिहिले आहेत आणि त्यांच्याबरोबर कामही केले आहे. वास्तविक, कादरखान मायावी नगरीतील प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे. अतिशय बहुश्रुत असणाऱ्या या माणसाने संवादात भूत-वर्तमान-भविष्याचे उत्तम संदर्भ, म्हणी, वाक्प्रचार, शायरी यांचा प्रभावी वापर केला आहे. हे न जाणणाऱ्या लोकांनी त्यांच्यावर 'शब्दबंबाळ' हा शिक्का मारला आहे. दुहेरी अर्थाचे संवाद लिहिण्यात ते हिंदीतील दादा कोंडके आहेत, हीही टीका त्यांच्यावर झाली आहे. अव्वल दर्जाच्या अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना कधीच होत नाही. 
     वार्धक्यामुळे या बुजुर्ग अभिनेत्याने गेली आठ वर्षे काम थांबवले आहे. अलीकडचीच बातमी अशी आहे की, ते एका प्रकल्पासाठी काम करत आहेत. वृध्दत्व प्रत्य़क्षात त्यांना आलेलं असलं तरी ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. त्यांच्याच शब्दात- म्हातारपण आलं होतं पण मला काम करताना पाहून तसंच हात हलवत परत गेलं...
     संवाद असो वा भूमिका व्यक्तिरेखेचं सुस्पष्ट आकलन, हे त्यांच्या रुपेरी पडद्यावरच्या वावराचे वैशिष्ट्य होते, आहे.