भारतात दहशतवादी हल्ल्याचा अमेरिकेचा इशारा : ईसकाळ

ईसकाळमध्ये वाचलेली बातमी सर्वांच्या माहितीसाठी येथे उतरवली आहे :

ईसकाळमधील मूळ बातमी : भारतात दहशतवादी हल्ल्याचा अमेरिकेचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, एप्रिल २२, २०१० स. ०९ : ४२ वा. (भा. प्र. वे. )

वॉशिंग्टन - भारतातील काही शहरांमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता
असल्याचा इशारा, अमेरिकेने पुन्हा एकदा दिला आहे. या संदर्भात गोपनीय
माहिती मिळाल्याचा दावाही करण्यात आला आहे. अमेरिकेच्या नवी दिल्लीतील
दूतावासामार्फत भारतातील अमेरिकी पर्यटकांनाही सावधगिरीची सूचना देण्यात
आली आहे, असे अध्यक्ष बराक ओबामा प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने
गुरुवारी (ता. २२) येथे सांगितले.
 
मिळालेली माहिती भारत सरकारलाही
देण्यात आली आहे, असे सांगून हा अधिकारी म्हणाला, की दोन्ही देशांमध्ये
दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत गुप्तचरांमार्फत मिळालेल्या माहितीचे
आदान-प्रदान करण्यासंदर्भात सहकार्याचा करार करण्यात आला आहे. मात्र,
अमेरिकी नागरिकांचे अधिक्य असलेल्या भागात हा हल्ला होणार, की अन्य परदेशी
नागरिकांचा वावर असलेल्या भागांत तो होईल, याची माहिती मिळू शकलेली नाही.
 
दिल्लीतील
चांदनी चौक, कॅनॉट प्लेस, ग्रेटर कैलाश, करोलबाग, महरौली आणि सरोजिनीनगर
या भागात परदेशी नागरिकांचा वावर असल्याने, या भागांत दहशतवादी हल्ला करू
शकतात, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दैनंदिन पत्रकार परिषदेत ही
माहिती देताना अमेरिकेचे सहायक जनसंपर्कमंत्री पी. जे. क्राऊली यांनी या
संदर्भात मिळालेली अधिक माहिती देण्यास गोपनीयतेच्या कारणावरून नकार दिला.