साठीतलं "झपाटलेपण"!

दहा-पंधरा वर्षांहून अधिक काळ आपण सातत्यानं भेटत असलेल्या व्यक्तीची पहिली भेट केव्हा झाली हे आठवायचं ठरवलं तर आठवेल?

माझ्यापुरतं उत्तर "मुश्कील" असंच आहे. त्यात अशा आठवणी जाणीवपूर्वक पटलावर आणावयाच्या असतील तर आणखीनच मुश्कील. पण तरीही हा एक खेळ होतो. मनाशीच, मनाचा. या निमित्तानं चार मंडळी जेव्हा एकमेकाशी बोलू लागतात अन् त्यातून त्या व्यक्तीची एक नवीनच ओळख समोर येते तेव्हा हा अनुभव विलक्षण ठरत जातो.

सुरवात साधीच होती. 'आंदोलन'च्या कार्यकारी संपादक सुनीती सु. र. यांचा फोन आला. "उद्या आपण एकत्र भेटतोय. सुहासचा वाढदिवस आहे, साठावा, त्यानिमित्त..."

गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ मी सुहासला ओळखतो. सुहास साठीची? बापरे! या व्यक्तीला आपण सातत्यानं, सुहासताई म्हणून का असेना, पण एकेरी संबोधतोय... ती साठीची? माझ्यातल्या टिपिकल 'मूल्यांची' जाग! सुहासताई म्हणजे असेल पन्नाशीच्या आसपासची इतकीच कल्पना. त्या फोनवर पहिला धक्का बसला. पुढच्या धक्क्यांना सरावण्यासाठी तो पुरेसा नव्हता.

---

सोळा-सतरा वर्षांपूर्वीची ही घटना असावी. मी तेव्हा धुळ्यात होतो. केव्हा तरी एकदा माझे मित्र प्रा. शाम पाटील यांचा संदर्भ घेऊन सुहास मला भेटली. पाच फुटांच्या आसपासची उंची. सावळी, कृष अंगकाठी. आवाजात एक मजेशीर खर. अत्यंत सौम्य, मृदू बोलणं. परिचय झाला. परिचय म्हणजे काय तर फक्त नाव कळलं. नर्मदा बचाव आंदोलनसाठी काम करते हे अर्थातच होतं आणि त्या काळात पुरेसं होतं. धुळ्याचे माजी नगराध्यक्ष डॉ. रा. भ. चौधरी यांच्या नगरपट्टीतील दवाखान्यात संध्याकाळी एक बैठक बोलावली होती स्थानिक कार्यकर्त्यांची. मीही तिथं यावं असा आग्रह पहिल्याच भेटीत तिनं धरला होता. मी एरवीही गेलो असतो. त्या काळात नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधितांची बैठक म्हणजे अर्थातच बातमी. त्यामुळं. असं कधी व्हायचं नाही, पण त्या दिवशी त्या बैठकीला कोणीच आलं नाही. स्वतः डॉक्टर, सुहास, शामदादा, आणि मी. सुहास गावात नवीन होती, अशी माझी समजूत (आपण तिला पहिल्यांदाच भेटतोय हा त्या समजुतीचा आधार त्यावेळी योगायोगाने बरोबर होता). त्यामुळं बैठकीचा असा बोजवारा उडाला तर एखादा नवागत खचून जाऊ शकतो अशी मलाच भीती. उगाचच. पण तसं घडलं नाही आणि सुहास रजिस्टर झाली डोक्यात. आणखी एक कारण होतं, त्या रजिस्ट्रेशनचं. पुण्या-मुंबईहून येणारी मंडळी म्हणजे "डोक्यावर तुरा आणि पाठीवर पिसारा" हे वर्णन आम्ही करायचो. त्याला कारणही तसंच. या मंडळींकडून आमच्याच भागाविषयी आम्हाला "ज्ञान"संपादन करावं लागायचं. त्यामुळं तो टोमणा असायचा. सुहास त्यात बसत नव्हती हे त्या संध्याकाळी लक्षात आलं. डोक्यातली नोंद पक्की व्हायला ते पुरेसं होतं.

परवा सुहासच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी दोनदा सांगितलं जाऊनही मला ही आठवण काही सांगता आली नाही. कारण ती आठवतच नव्हती. नंतर झालेल्या या आठवणीचं कारणही सुहास हेच होतं. मला पहिल्यांदा आठवण सांगण्यास सुचवलं गेलं तेव्हा मी काही आठवत नाही असं सांगून गप्प झालो. तेव्हा सुहासनंच या आठवणीच्या अलीकडची माझी - तिची पहिली खरी भेट सांगितली. त्या बैठकीच्या आधी सुहास मला भेटली. त्यावेळी तिच्यासमवेत मी धुळ्याच्या कलेक्टर ऑफिस परिसराचा फेरा केला होता, ही तिची आठवण. त्याला कारण होतं. सुहास आली त्याच्या काही दिवस आधी नर्मदेच्या संघर्षातील पहिला हुतात्मा झाला होता - रेहमल वसावे. आत्ताच्या नंदुरबार जिल्ह्यात अत्यंत दुर्गम अशा चिंचखेडी परिसरात पोलीस गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ विस्थापितांनी धुळ्यात मोर्चा काढला आणि कलेक्टर ऑफिससमोर त्या मोर्चावर बेछूट लाठीमार झाला. आजही ती घटना आठवली की मी क्षणभर चरकतो. त्या घटनेची माहिती सुहासला हवी होती. त्यामुळं त्या परिसरात आम्ही दोघं फिरलो होतो. सुहास म्हणते की, आमच्याकडून त्यावेळी मिळालेले त्या घटनेचे सारे तपशीलच नंतर तिनं प्रत्यक्ष घाटीत भाषणं देताना सांगून तिथल्या समाजमनात प्रवेश केला.

पहिल्याच भेटीत बैठकीला येण्यासाठी मला आग्रह करणं किंवा पहिल्याच दौर्‍यात घाटीतील लोकांशी थेट नातं स्थापित करणं हे सुहासचं वैशिष्ट्य. सुहासच्या झपाटलेपणाचं मूळ. तेच वैशिष्ट्य मग त्या दिवशी एकेकाच्या बोलण्यातून बाहेर येत गेलं. मग कळत गेलं, तिथं अनेकांची ती सुहास होती, माझ्यासारख्यांसाठी सुहासताई होती, बर्‍याच जणींसाठी सुहासमावशी होती, आणखी कोणासाठी आणखी काही. या व्यक्तिमत्वात दडलेल्या एकेका पैलूच्या निमित्तानं बहुदा प्रत्येकाला तिची एक नवी ओळख त्या दिवशी झाली असावी. सुहासनं पीएच.डी. केली आहे, त्यापुढंही संशोधन केलं आहे; तिच्या संशोधनाचा विषय हेपाटायटीस बी हा आहे, हे मला नव्यानंच कळलं. आधी अनेकदा तिचा उल्लेख या डॉक्टरसह व्हायचा. माझी समजूत इतकीच होती की असेल वैद्यकीय डॉक्टर. तो एक भ्रम दूर झाला.

सुहासविषयी बोलणार्‍यात त्या दिवशी बारावीतील तन्वी होती, ते अगदी साठी ओलांडलेल्या विद्या पटवर्धन होत्या. त्यांच्या बोलण्यातून संघर्षातील प्रसंगात दिसणारी सुहास होती, मुलांसाठी मूल होणारी सुहास होती. तन्वी, चैत्राली, ओजससारख्या मुली तिला मावशी म्हणत असल्या तरी बहुदा ती त्यांची एक मोठी मैत्रीण असावी असंही चित्र येत गेलं.

संशोधन, शैक्षणिक प्रगती या दोहोंसंदर्भात माझी जी स्थिती झाली ती नेमकी व्यक्त केली चैत्रालीनं आणि प्रीतानं. पहिल्या भेटीच्या आधी तिच्यासमोरचं सुहासचं व्यक्तीमत्त्व म्हणजे काहीच्या काहीच असावं. डॉक्टरेट, त्यापुढचंही संशोधन, तेही अमेरिकेत, तिथून परत भारतात येणं, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीतील काम या सगळ्यामुळं सुहासची प्रतिमा थोडी भारीच असावी. प्रत्यक्षात सुहासचं वागणं तिच्या मैत्रिणीसारखंच होतं हे सांगताना तिला स्वतःच्याच या स्टिरिओटाईपचं हसू आल्याशिवाय राहवलं नाही. सुहास तर म्हणालीही, "मला पाहिल्यावर भ्रमनिरास झाला असेलच."

सुहासच्या घरातील मुलांसाठीच्या खेळण्यांची आठवण डॉ. संजिवनी कुलकर्णी यांना आहे. विद्या पटवर्धनांना सुहास आठवते ती अक्षरनंदनच्या संदर्भातील घडामोडींतील. पण संदर्भ आंदोलनाचाच असतो. सजीवन तर तिच्याशी झालेलं 'भांडण' रंगवण्याचा प्रयत्न करतो. ते भांडण आणि त्यानंतर काही क्षणातच ते भांडण विसरून पुन्हा सुहास कशी नेहमीचीच भेटते आपल्याला हे तो सांगतो. भीमसिंग किंवा मगन यांना नेमका प्रसंग सांगता येत नसला तरी, त्यांच्या जगण्यात सुहास कशी असते हे मात्र सांगता येतं. विनय यांना सुहासची पहिली भेट आठवते.

रोहननं उभी केली ती आंदोलनातली सुहास. सोमावल येथे सरदार सरोवर धरणग्रस्तांचं पुनर्वसन (म्हणजे जे काही असेल ते) झालेलं आहे. तिथं काही वर्षांपूर्वी रोहन गेला होता. त्या भागात, त्या समुदायात जाण्याची त्याची पहिली वेळ. कडाक्याच्या उन्हाळ्यात सत्याग्रह सुरू होता. एके दिवशी सारी मंडळी सोमावलहून अक्कलकुवा या तालुक्याच्या ठिकाणी आली. जीपमधून प्रवास. तरंगत, लटकत वगैरे. रोहन म्हणाला, "घोषणा वगैरे देण्याची शक्तीच नव्हती आमच्यात. भागही नवाच. अक्कलकुवा साधारण पंधराएक किलोमीटर असेल. तेवढा प्रवासच कसाबसा केला. अक्कलकुव्यात आलो आणि 'नर्मदा बचाव, मानव बचाव' अशी दणदणीत घोषणा ऐकू आली. एकाच व्यक्तीची. पाहिलं तर एक स्त्री. मग ओळख झाली, सुहासची."

सुहासची ही चिकाटी आहे, साठीतही टिकलेली. सुनीती यांनी सांगितलेली आठवण पुण्यातल्या एका आंदोलनाची. तिथंही सुहासच्या घोषणा देण्याच्या ताकदीनंच ती रजिस्टर झाल्याचं त्या सांगत होत्या, तेव्हा सुहासकडं पाहताना माझा त्यावर विश्वास बसणं अंमळ अशक्य होतं. त्या पाच फुटी कृष मूर्तीत अशी घोषणा देण्याची ताकद असेल हे पटणं थोडं कठीणच. हाही आपला एक स्टिरिओटाईप. आपलं काहीही असो, सुहासनं बहुदा या सार्‍या वर्तनविषयक स्टिरिओटाईप्सवर मात केली आहे. म्हणूनच मग ती अगदी आरामात पुण्यातील अत्याधुनिकता दुर्गम नर्मदाकाठच्या एखाद्या मुलाला, त्याच्या आई-बापांना तितक्यात समतानतेने समजावून देऊ शकते, जितक्या समतानतेनं त्यांचं तिथलं जगणं इथल्या शहरी अत्याधुनिकाला समजावून देते. यातली अत्याधुनिकता आणि तिच्या सापेक्ष असणारा मागासपणा आपल्याच मनात असतो. सुहासच्या तो फारसा गावी नसतो अशावेळी.

प्रत्येक प्रक्रियेमध्ये काही शेवटाचे सैनिक असावेच लागतात. हे सैनिक असतात शेवटाला, पण त्यांचा वावर असतो तो या टोकापासून त्या टोकापर्यंत. अशा सैनिकांची संख्या फार मोठी असत नाही. नव्हे, बहुतेकदा हे सैनिक अगदी मोजकेच असतात. म्हटलं तर ते लढतात, कधी ते लढाया घडवतात, कधी ते लढाईसाठी सामग्रीचा पुरवठा निरंतर करत राहतात, कधी त्यांच्याकडं असते ती कामगिरी अशा प्रक्रियांना विचारांची बैठक देण्याची. सुहास ही प्रत्येक भूमिका वठवत असते. मग विनायक सेनांची सुटका व्हावी यासाठी सुरू असलेली लढाई असो - तिथंही ती पुढं असते. नर्मदेच्या खोर्‍यातील जीवनशाळांचे काम असो - तिथं तर त्या मुलांत ती असतेच असते, नर्मदेच्या प्रत्येक सत्याग्रहावेळची आधीची बांधणी असो - सुहास त्या काळात तिथंच असते...

शिक्षण आणि आरोग्य हे सुहासचे हट्टाने हक्काचे विषय. सुहास वेळोवेळी भेटत गेली तसं हे एकेक कळत गेलं. मग ती सातपुड्याच्या सातव्या पुड्यातील गावांत भेटली. सातपुड्याच्या पहिल्या पुडाच्या कुशीत वसलेल्या गावांमध्ये भेटत गेली. जीवनशाळांच्या कार्यक्रमात भेटत गेली. पुण्यातील घडामोडींमध्ये भेटत गेली. कशीही भेटली तरी ती पहिल्या भेटीत डोक्यात जशी रजिस्टर झाली, तशीच राहिली आहे. सैनिक. म्हणूनच ती पुण्यात जशी असते तशीच सातपुड्यात असते. तिथल्या प्रत्येक गावात ती जाते. त्या गावांची माहिती झटकन सांगू शकते. बालेवाडीत येऊन शिकणार्‍या मुलांची ती स्थानिक पालक आहेच. गावातही तिची नोंद तशीच होत असते. कार्यकर्त्यांच्या समुहात ती तिची मतं मांडते तेव्हाही तशीच असते, त्या सैनिकासारखी. लढणार्‍याच्या भूमिकेतून सारं काही पाहणारी.

सैनिकांमध्ये एक झपाटलेपण असतं, असावंच लागतं. ते झपाटलेपण त्या-त्या इश्यूजच्या संदर्भात असतं. या झपाटलेपणातून हे सैनिक बाहेर येत नाहीत कदापिही. मग ते कुठंही भेटले तरी त्या झपाटलेपणातूनच त्यांच्या त्या इश्यूविषयी प्राथमिक स्तरापासून बोलणं सुरू करतात. अनेकदा हे बोलणं अनावश्यक असतं. पण ते तसं मांडल्याशिवाय या सैनिकांना राहवत नाही. ते आपलं म्हणणं तसं मांडण्याबाबत आग्रही असतात. सुहास त्याला अपवाद नाही. ती नियम आहे. कदाचित तिच्यासारख्यांमुळं त्या अपवादांना महत्त्व प्राप्त होत असावं. सुहासचं हे झपाटलेपण आज साठीतही कायम आहे. त्या दिवशीच्या कार्यक्रमात म्हणूनच तिचा आग्रह होता तो गुलाबसिंग आणि मगन या आता बालेवाडीत शिकणार्‍या नर्मदेच्या दोन धावपटूंना अलीकडच्या घडामोडींची सीडी दाखवण्याचा. कार्यक्रम तिच्यासाठीचा आणि तिचा आग्रह त्यांना काही नवे लॅपटॉपवर दाखवण्याचा असा हा प्रसंग. एरवीच्या शहरी, व्यावसायीक शिस्तीमध्ये त्या कार्यक्रमाचं भान डोक्यात टोचत राहिलं असतं कुणालाही. सुहाससारख्यांना ते नसतं. नसावंही. त्यांच्यातलं हेच झपाटलेपण तर त्या लढ्यांना, प्रक्रियांना तेलपाणी करत असतं...

सुहास म्हणजेच डॉ. सुहास कोल्हेकर! गुगल करा, तिथं तिची आणि तुमची पहिली भेट नक्कीच होईल!!!