नारी जीवन

'मुलींच्या अपेक्षा' हा 'कुशाग्र' यांचा लेख एक चांगल्या चर्चेचा विषय ठरला. त्या अनुषंगाने फक्त मुलींवरच अन्याय कां? असाही प्रश्न उभा राहिला. मुळातच विवाह आणि शरीर-संबंध यामागील भूमिकेत पायाभूत फरक असल्याचे दिसते. एक संस्कार आहे तर दुसरा केवळ उपभोग. संस्कारामागे समाजाच्या स्वास्थ्याचा विचार असतो. काळाच्या कसोटीवर सुलाखून, अनुभवांचा मागोवा घेत निश्चित केलेल्या व पिढ्यानुपिढ्या स्वीकार केल्या गेलेल्या नीतिनियम, रूढी, परंपरा आदींना बदलावयाचे ठरविले तर तीव्र दूरदृष्टी ठेवूनच निर्णय घ्यावे लागतील, हे उघड आहे. आजच्या सोयीसाठी उद्याच्या पिढीचा बळी हा अविचार ठरेल.
             

मध्यंतरी कांही कामानिमित्त पत्नीसह पुण्यास गेलो होतो. तेथे साडूंकडे टेबलावर एक कागद पडलेला होता. वाचला. पत्नीलाही वाचायला दिला. तिला त्यातील आशय भावला. त्याची छायाप्रत तिने घेतली. 'मनोगत'वर चाललेल्या चर्चेच्या संदर्भात त्याची आठवण झाली. भारतीय स्त्रीच्या विचारांचे दर्शन घडविणारे हे पद कोणी कधी रचले, त्याबद्दल कळले नाही. पण त्याने कांही फारसा फरक पडत नाही. हे पद 'नारी-त्रयोदशपदी' या नांवाने खाली देत आहे-

नारी-त्रयोदशपदी

श्रीराम जयराम जय जय राम । श्रीराम जयराम जय जय राम ॥धृ॥

मातापित्याची सोनुकली, बाल्यामधली भातुकली
आजीनातीची लाडीगोडी, कौमार्यातिल फुलवेडी
मधुनच स्मरायची थोडी थोडी, पण नाही कशातच गुंतायचं
हळूच त्यातून सटकायचं अन् श्रीराम जयराम म्हणायचं ॥१॥

मिळत बक्षिसे विद्यार्जनी, कौतुक केले आप्तजनी
जग जिंकायची ईर्षा मनी, पण नशिबाने टोला देता क्षणी
निराशेतून आशेला जागवायचं, अन् जिद्दीने नशिबाला घडवायचं
पण नाही कशातच गुंतायचं नाही कशातच गुंतायचं
हळूच त्यातून सटकायचं अन् श्रीराम जयराम म्हणायचं ॥२॥

यौवनातील आकांक्षा, पतीप्रीतीची अभिलाषा
समान हक्कांची अपेक्षा, पदरी पडता पण उपेक्षा
मनीचं खंतावणं झाकायचं अन मानाचा तुरा लावून मिरवायचं
पण नाही कशातच गुंतायचं नाही कशातच गुंतायचं
हळूच त्यातून सटकायचं अन् श्रीराम जयराम म्हणायचं ॥३॥

गृहस्थाश्रमी करीत पदार्पण, करायचे सर्वस्व समर्पण
मग विवाह-बंधनी शिरायचं, नशिबावर सर्वकांही सोपवायचं
मिळेल त्यात समाधान मानायचं अन आनंदानं जीवन फुलवायचं
कर्तव्यकर्म निभवायचं पण नाही कशातच गुंतायचं
हळूच त्यातून सटकायचं अन् श्रीराम जयराम म्हणायचं ॥४॥

आता वंशवृद्धीची वेळ आली, जीवघेणी यातना अनुभवली
स्त्रीजन्माची कसोटी दिली, पण बाळाच्या दर्शनाला आसुसली
आता त्यागातच जीवन जगायचं अन् जन्माचं सार्थक मानायचं
पण नाही कशातच गुंतायचं नाही कशातच गुंतायचं
हळूच त्यातून सटकायचं अन् श्रीराम जयराम म्हणायचं ॥५॥

गृहिणीधर्माचे पालन, करायचे आतिथ्याचे अवलंबन
आबालवृद्धांचे समाधान करीत शेगडीपासून देवडीपर्यंत धावायचं
पण केलं केलं असं नाही म्हणायचं, मूकपणे सर्वकांही सोसायचं
अन तटस्थ जीवन जगायचं पण नाही कशातच गुंतायचं
हळूच त्यातून सटकायचं अन् श्रीराम जयराम म्हणायचं ॥६॥

आता प्रौढत्वाची जोखीम सांभाळायची, करायचे मुलाबाळांचे संवर्धन
त्यांना मायेच्या बोलांनी गोंजारायचं पण शिस्तीच्या धाकानं लोटायचं
सर्वस्व ओतून करायचं, करता करता झिजायचं
पण नाही कशातच गुंतायचं नाही कशातच गुंतायचं
हळूच त्यातून सटकायचं अन् श्रीराम जयराम म्हणायचं ॥७॥

आता कन्यादानाची वेळ आली, पोटातली खळगी रिती झाली
काळजाची कळ ठुसठुसली तरी हुंदक्यांना आतच दडवायचं
आणि स्वागत करायचं अन् कर्तव्याला नाही चुकायचं
पण नाही कशातच गुंतायचं नाही कशातच गुंतायचं
हळूच त्यातून सटकायचं अन् श्रीराम जयराम म्हणायचं ॥८॥

आता आयुष्याच्या माध्यान्ही, व्याहीविहिणींची देणीघेणी
किती केलंत तरी पडतील उणी, दुर्लक्षून योग्य तेच करायचं
बोलून टाकून श्रेय नाही घालवायचं, गोड बोलून सर्वांना जिंकायचं
निरपेक्ष जीवन जगायचं पण नाही कशातच गुंतायचं
हळूच त्यातून सटकायचं अन् श्रीराम जयराम म्हणायचं ॥९॥

संसाराच्या सारीपाटावर खेळायचं, पडलं दान कसबानं लावायचं
अंथरुणातच पायांना पसरायचं, काडीपासून हळूहळू तोडायचं
गाडी भरून दानधर्मी खर्चायचं, भोग सोडून त्यागी बनायचं
मग परमार्थाकडे वळायचं अन् अलिप्त जीवन जगायचं
म्हणून नाही कशातच गुंतायचं नाही कशातच गुंतायचं
हळूच त्यातून सटकायचं अन् श्रीराम जयराम म्हणायचं ॥१०॥

आता बघता बघता साठी आली, सुनांची राज्ये सुरू झाली
आणि जीवनमूल्येच बदलली, आता दुय्यम स्थानी सरकायचं
डोळे उघडे ठेवून सारं बघायचं, खटकल्या बाबींना टाळायचं
गुणांचं कौतुक करायचं, कुणी विचारलं तरच सांगायचं
अन् निवृत्त जीवन जगायचं पण नाही कशातच गुंतायचं
हळूच त्यातून सटकायचं अन् श्रीराम जयराम म्हणायचं ॥११॥

आता दिसू लागला पैलतीर, मनी दाटे हुरहुर,
आसवांचा वाहे महापूर कारण मायेचा गुंता अनिवार
तरी विवेकानं भावनांना आवरायचं, षड रिपूंना जिंकायचं
ईशचितन करायचं सन्यस्त जीवन जगायचं
पण नाही कशातच गुंतायचं नाही कशातच गुंतायचं
हळूच त्यातून सटकायचं अन् श्रीराम जयराम म्हणायचं ॥१२॥

आता ठरलेलं विधिलिखित ओळखायचं, झालं गेलं विसरायचं
चुकल्याचं क्षमस्व म्हणायचं अन् सर्वांना सांभाळा सांगायचं
सुकृताचं गाठोडं बांधायचं मग परतीच्या प्रवासाला निघायचं
आता नाही कशातच गुंतायचं नाही कशातच गुंतायचं
कृतार्थ जीवन संपवायचं अन् आनंदानं अनंतात विसावयाचं
मग परक्यांनी श्रीराम जयराम म्हणायचं, श्रीराम जयराम म्हणायचं ॥१३॥

अगदी ठामपणे सांगता येत नाही, पण ही रचना कुणा भगिनीची असावी, असे वाटते. तसे नसेल तरीही नारी जीवनाचा हा आलेख कुठेच स्त्री-जन्माबद्दल निराशेने सांगत नाही. शेवटी दिलेला  सार्वजनिक सल्ला साऱ्यांनाच भिडणारा आहे.