आ.बा.चा ढाबा...

आबा, बाबा, दाजिबा जमले की ढाब्याला जोर चढतो. तंदूर रोट्या कमी पडतात, गिलासावर
गिलास वाढतात, कोंबडीच्या तंगड्या त्यांच्या पोटात उडतात! आमचा बाप, बायलीचा बाप,
दाजीचा बाप अशी थोर बापमाणसं ढाब्यावर गेली की ती परत येईपर्यँत आमच्या घराला
निस्ता घोर लागतो. बोलून चालून ही एकमेकांची ईवायी मंडळी! घोटानंतर घोट वाढला की
आवाजसुद्धा चढू लागतो. जोतो दुसऱ्‍यावर ओरडू लागतो. एक तोळा कमीच दिला,
पावण्यारावळ्यांची चांगली सोय झाली नाही, खायला बक्कळ होतं पण प्यायची ठेप जमली
नाही असे आरोप प्रत्यारोप होऊन गिलासावर राग निघू लागला की ढाब्यावाल्याचं धाबं
दणाणतं! आणखी नुकसान होऊ नये म्हणून दोन चार वेटर ह्या त्रिकुटाच्या दिमतीला उभे
राहतात. ज्या बानं जरा कमी घेतलीय त्याच्या लक्षात हा चक्रव्यूह
येतोच.
'जावूनद्या ईवायी, निघायचं बगा. रात लै चढलीय. उठा आता.' असं म्हणत तो
बिल मागवतो. ते कधीच तयार करून ठेवलेलं असतं, कधी एकदा ही तीनतिगडी निघत्यात असं
वेटरांसकट मालकालाही वाटत असतं. एकमेकांचे खिसे उलथे पालथे करून शेवटी एकदाचा
बिलातला आकडा जुळवला जातो आणि बडीशेपीचा बकणा भरून त्रिकूट गावाकडे भेलकांडत
निघतं...
घरी आल्यावरही गुमान झोपतील ती मंडळी कसली? पावण्याच्या घरीही चारदोन
शिव्या हासडल्याशिवाय अन् काहीतरी फोडल्याशिवाय त्यांच्या व्यसनी जिवाची शांती होत
नाही. सकाळच्यापारी राती जे बोल्लो ते पदरात घ्या अशी दिलगिरी व्यक्त करून पाव्हणं
निघतात. जाता जाता 'आमच्याबी गावाभायिर एक चांगला ढाबा झालाय तवा म्होरच्या इतवारी
यावा बरं का.' अशी प्रेमळ गळ घालायला विसरत नाहीत. आमचा बा पुढच्या रविवारची वाट
बघत कामाला जुंपून घेतो...
तर अशी ही आमच्या बापजाद्यांची ढाबा संस्कृती!