महाराष्ट्राची पन्नाशी


 
आनंदी वाढदिवस तुला, आनंदी वाढदिवस तुला, आनंदी वाढदिवस तुला लाडक्या महाराष्ट्रा आनंदी वाढदिवस तुलाsss
[वि. सू. हे गाणे भाषांतरित असले तरी चालीतच म्हणावे अशी अपेक्षा आहे! ]
         आमच्या [तो दुसऱ्या कोणाचाही नाही हे ध्यानात ठेवा! ] महाराष्ट्राला ५० वर्षे पूर्ण झाली आणि मुंबई आमची [ती आमची म्हणालात तर दात पाडणे, हात-पाय तोडणे यासारखे काहीतरी नक्कीच घडू शकते! ] झाली त्यालाही ५० वर्षे पूर्ण झाली. त्या मोऱ्याला ती त्याच्या धोतरात पाहिजे होती पण आमच्या १०६ नि ती त्याच्या हाती लागू दिली नाही. त्याने शर्थीचे प्रयत्न केले, प्रसंगी अतिशय खालच्या पातळीला जाउन गोळीबार करवला, त्यात आमच्या शूर १०६ नि प्राणाहुती दिली. त्यांनी जे आमच्यासाठी मिळवलं ते आज आमच्यासाठी अत्यंत मोलाचं ठरलं आहे. मुंबई आमची झाली आणि आमची राहिली. तिच्या आमच्याकडे असण्याने जो काही फरक पडला तो वादातीत आहे. आज ५० वर्षे पूर्ण झाल्यावर मागे पाहून सिंहावलोकन केला तर मात्र असं लक्षात येत कि हा सिंह रोडावत चालला आहे. त्याची शान असलेली त्याची आयाळ आज त्याच्यावरचं ओझं बनत चालली आहे. सिंह जाळ्यात गुरफटतच चालला आहे आणि असहाय्य होऊन एखाद्या मदतीची वाट पाहत बसला आहे.
        गेल्या ५० वर्षात काय कमावलं आणि काय गमावलं याचा हिशेब आज सारेच पक्ष, मिडिया यांनी मांडला आहे. ग्रेट माणसाचं ग्रेट यश आणि प्रत्येक क्षेत्रातले दिग्गज यांनी महाराष्ट्राचं नाव जरी जगाच्या कानाकोपऱ्यात उज्ज्वल केलं असलं तरी सामान्य माणसाला कुठे तरी जागा आहे का असा प्रश्न पाडवा अशी आज स्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातले सोयीसुविधा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न तर सर्वश्रुतच आहेत, पण शहरी भागातल्या पांढरपेशा समाजाची स्थितीही फारशी आल्हाददायक नाही. आयुष्याचे प्लानिंग करताना नेहमीच लाँग  टर्म विचार करणाऱ्या सर्वसामान्याला प्रत्यक्षात मात्र हर एक दिवसाचे प्लानिंग करतानाच मेटाकुटीचा सामना करावा लागतो आहे. आशा, लालूच, आश्वासने, वचने या सगळ्या गोष्टींचा पाठलाग करत राहणे हेच त्याचे आयुष्य झाले आहे. त्याच्या या अशा आयुष्यावर सारासार विचार करण्याइतका वेळ आणि इच्छाही त्याच्याकडे नाही. तो आला दिवस अक्षरशः ढकलत राहतो आणि आनंदाला अगदीच काही नाही म्हणून सचिनचे शतक, भारताचा विजय, ट्रेन मध्ये खिडकीची जागा, मराठी चित्रपटांची वाढती संख्या, कोण्या अमराठी सेलेब्रिटी ने मराठीतून बोललेली ३-४ वाक्ये, एका नेत्याने दुसऱ्या नेत्यावर केलेली कोपरखळी आणि राजकारणावर कुठेही सार्वजनिक स्तरावर करण्यात आलेली टीका यांसारख्या गोष्टींमध्ये आनंद शोधात जगत राहतो. त्याचा आजचा दिवस व्यवस्थित संपणे ही त्याची अचीवमेंट असते आणि उद्याचा दिवस हे त्याचे चार्जिंग असते. मेट्रोच्या कल्पनेने तो सुखावतो तर एसी ट्रेन च्या स्वप्नात तो रोज लोड शेडींग मध्ये घाम गाळत झोपी जातो. तो सरावला आहे. तो शिकला आहे आणि आता त्याची काहीच तक्रार नाही. तो मागण्या करून थकला आहे आणि हळू हळू मागायचंही विसरत चालला आहे. त्याला वाचवण, सुखमय जीवन देण या साऱ्या गोष्टी  विचाराधीन असण्यापेक्षा निद्राधीन आणि कागदाधीन आहेत. आशाळभूत सामान्य माणसाला जोरजोरात गर्जना करून आणि इकडे तिकडे बोट दाखवून  भूलवणे जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत तो बिचारा असाच वाऱ्यावर भरकटत राहणाऱ्या पानाप्रमाणे भरकटत राहील. ५० वर्षात खूप काही बदलले आहे हे निश्चित पण बदल हा नवसुर्योदयाकडे घेऊन जाणारा असेल तर तो स्वागतार्ह आहे पण ते जर उगवू पाहणाऱ्या सूर्याला परत आत ढकलणारे असतील तर ते काय कामाचे? हे तपासून पाहणे फार गरजेचे आहे! असो! 'आशा ही न संपणारी शृंखला आहे'  असं म्हटलेलंच आहे. तेव्हा १०६ हुतात्म्यांचे पुनश्च स्मरण करून आपण उद्याच्या उज्ज्वल भविष्याला साद घालूया.
जय महाराष्ट्र!